वारे, श्रीधरशास्त्री : (१६ सप्टेंबर १९०३ – २४ऑगस्ट १९६४). महाराष्ट्रातील थोर संस्कृत अभ्यासक आणि लेखक. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील नासिकमध्ये झाला. वैदिकतिलक अण्णाशास्त्री वारे हे त्यांचे पिता आणि राधाबाई या माता होत. राधाबाई यांची श्रीधरशास्त्रींच्या आधीची सात अपत्ये दगावली म्हणून श्रीधरशास्त्रींच्या खेपेला नासिकस्थित चंद्रात्रे यांच्याकडे बाळंतपण केले गेले. या आठव्या अपत्याने समस्त भारतात आपल्या कर्तृत्वाची पताका फडकावली. त्यांचे मूळ गाव प्रवरासंगमाजवळचे जांबगाव, तालुका-गंगापूर, जिल्हा-औरंगाबाद. यांचे पूर्वीचे उपनाम खोचे होते. परंतु यांच्या पूर्वजांपैकी मुकुंदभट गंगाधर खोचे यांनी शके १५९० च्या सुमारास नासिक येथे शिक्षणासाठी येऊन, वार लावून जेवण केले आणि ख्यातनाम झाले यावरून त्यांना वारे हे आडनाव मिळाले अशी आख्यायिका सांगितली जाते.
त्यांनी संस्कृतातील अनेक ग्रंथ आणि विषयांचा पारंपारिक पद्धतीने अभ्यास केला होता. श्रीधरशास्त्री यांनी वैदिकभास्कर नारायण केशव देव यांच्याकडे शुक्ल यजुर्वेदाचे घनान्त अध्ययन केले. श्री. १००८ स्वामी हृद्यानंद (कैलास मठ) यांच्याकडे पूर्वमीमांसा, पं. अनंत रघुनाथ वेलदे उर्फ शिवानंद सरस्वती यांच्याकडे वेदांत-प्रस्थान-त्रयी, पं. काशिनाथ सदाशिव शौचे, कृष्णशास्त्री पद्मनाभी, वैयाकरणी सखारामशास्त्री दीक्षित, कविकौस्तुभ त्र्यंबक कुलकर्णी, गणेशशास्त्री भेंडके यांच्याकडे काव्य, व्याकरण, नाटक-चम्पू, छंद, अलंकार याविषयांचे शिक्षण घेतले, तर वडिलांजवळ श्रौत-स्मार्त कर्मकांड, धर्मशास्त्र, मंत्रशास्त्र या विषयांचे अध्ययन केले. त्यानंतर निरनिराळ्या परीक्षा देऊन काव्यतीर्थ, मीमांसकवद्याभरण, श्रौत-स्मार्त व धर्मशास्त्र कोविद या पदव्या देखील संपादन केल्या.
वारे शास्त्री यांनी शुक्ल व कृष्ण यजुर्वेद यांचे सूक्ष्म विवेचन केले, धर्मशास्त्र आणि कर्मकांड यावर सखोल ज्ञान प्राप्त करून घेतले. या विषयांवर इतके सखोल ज्ञान असणारे शास्त्री तसे विरळाच असतात. धर्मशास्त्र तसेच यजुर्वेद या विषयांवर अनेक ठिकाणी व्याख्याने दिली. नासिकच्या भद्रकाली मंदिरात महिनाभर धर्मशास्त्रीय विवाद्य विषयांवर प्रवचने दिली. पुणे येथील याज्ञवल्क्य आश्रमात सहा दिवस शुक्ल यजुर्वेदावर व्याख्याने देऊन जिज्ञासूंना तृप्त केले. मद्रास, कलकत्ता, दिल्ली, मुंबई, उज्जयनी, कानपूर, वर्धा, विदर्भ, खानदेश, बऱ्हाणपूर, पैठण, पंढरपूर, पुणे, नासिक इत्यादी ठिकाणी झालेल्या विद्वत्परिषदेत चर्चासत्रांच्या वेळी ‘विजयीमल्ल’ म्हणून प्रसिद्धी मिळाली. भारतात झालेल्या अनेक यज्ञांमध्ये अध्वर्यूचे स्थान यांच्याकडेच असायचे. एकदा त्यांना धर्मशास्त्रासंबधी महात्मा गांधी यांच्याबरोबर चर्चा करण्याची संधी त्यांना मिळाली. जव्हार, सुरगाणा या ठिकाणी झालेल्या राज्याभिषेकाच्या विधीमध्ये प्रमुख स्थान श्रीधरशास्त्री यांना होते. बनारस हिंदू विश्वविद्यालय, गव्हर्नमेंट संस्कृत कॉलेज, जयपूर येथे वेदांतशास्त्राचे परीक्षक म्हणून त्यांनी काम पहिले. वैदिकमंत्र जागरात त्यांना मानाचे स्थान असायचे.
साहित्यरचना – अनेक उत्तम संशोनात्मक ग्रंथ वारे शास्त्री यांनी लिहिले. दत्तकनिर्णयामृत (संस्कृत धर्मशास्त्रीय प्रबंध), याज्ञवल्क्य चरित्र (मराठी), कुंडार्कावर सुप्रभाटीका, सूर्योपस्थान सूत्रभाव दर्शन व्याख्यान, शतपथब्राह्मण सायणभाष्यासह टीका, विहारचित्र, विषयानुक्रम, शब्दानुक्रमसह संस्करण, चातुर्वेदिक शतमुख गायत्री कोटीहोमशास्त्रार्थ व पद्धती, ब्रह्मकर्मप्रदीप भाग १-२, पं. सातवळेकर यांनी प्रकाशित केलेल्या मैत्रायणी, काठक व माध्यंदिन संहितांसाठी संस्कृतमध्ये प्रस्तावना, धर्मशास्त्रप्रबंध, यजुर्विधान, याजुर्मंजरी, शुक्लयजुर्वेद स्वाहाकार पद्धतीमंत्रभ्रांतिहरसूत्र यांचे टिप्पणीसह संस्करण, गणेशाथर्वणभाष्य, कातीयभाष्यावर विवरणटीका, प्रत्यंगिराभाष्य, शत-सहस्रचंडीप्रयोग, सूर्यभागपद्धती ,भागवतस्वाहाकार पद्धती , विष्णुयागपद्धती ,राज्याभिषेकपद्धती, संस्कृतसाहित्याचे महत्त्व (प्रबंध) इत्यादींचा त्यात समावेश आहे.
वारे शास्त्री यांची शिष्य परंपरा मोठी असून त्यात गोविंद लक्ष्मण पंढरपूरकर, शंकर गणेश जोशी, मोरेश्वरशास्त्री जोशी, चुनीलाल फलोदी, जगदीश प्रसाद, भवानी शंकर शर्मा, दत्तात्रय टोककर, लक्ष्मीकांत दीक्षित, सुंदरलाल शास्त्री, पुरुषोत्तम दामोदर चंद्रात्रे याचा समावेश आहे. विसाव्या शतकात प्रकांड पंडित म्हणून समस्त भारतात ख्याती असणाऱ्या या आधुनिक ऋषींनी शरीराने जगाचा निरोप घेतला असला तरीहि आपल्या शास्त्रीय साहित्यकृतींनी अजरामर होऊन विद्वज्जनांना ते आजही उपकृत करीत आहेत.
संदर्भ : म.मो. श्रीधरशास्त्री वारे गौरवग्रंथ
समीक्षक : श्रीकांत बहुलकर
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.