शास्त्री, अजय मित्र : (२६ फेब्रुवारी १९३४–११ जानेवारी २००२). विख्यात भारतीय प्राच्यविद्या संशोधक व प्राचीन संस्कृत साहित्याचे अभ्यासक. त्यांचा जन्म मध्य प्रदेशातील गुणा या जिल्ह्याच्या ठिकाणी झाला. त्यांचे मूळ नाव महेंद्रकुमार उपाध्याय. अयोध्या येथील गुरुकुलात प्राथमिक शिक्षण घेत असताना त्यांना ‘मित्र’ हे उपनाव मिळाले (१९४५), तर वाराणसी येथील ‘संपूर्णानंद संस्कृत विश्वविद्यालय’ येथून मिळालेल्या ‘शास्त्री’ या पदवीचे रूपांतर त्यांच्या आडनावात झाले (१९५३). तेव्हापासून ते ‘अजय मित्र शास्त्री’ या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यांना सामाजिक शास्त्रामध्ये उच्च शिक्षण घ्यावयाचे होते; परंतु त्या काळी या विषयाचा विभाग बनारस हिंदू विद्यापीठात नसल्याने प्रा. राजाराम शास्त्री यांनी त्यांना प्राचीन भारतीय इतिहास व संस्कृती या विषयांत पदव्युत्तर शिक्षण घेण्यास सुचविले. या विषयांत ते एम. ए. झाले. त्यांची इतिहासाचे अभ्यासक म्हणून भक्कम पायाभरणी याच काळात झाली (१९५७). नागपूर विद्यापीठातून (आताचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ) डॉ. वा. वि. मिराशी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी बृहत् संहिता ऑफ वराहमिहिर या विषयात पीएच. डी. प्राप्त केली (१९६२). पुढे याच विद्यापीठातून त्यांना डी. लिट. या सन्मान्य पदवीने गौरविण्यात आले (१९८६).

शास्त्री यांनी नागपूर विद्यापीठात प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्त्व या विभागात अधिव्याख्याता (१९५७–६५), प्रपाठक (१९६५–७७), प्राध्यापक व विभागप्रमुख (१९७७–९४) या पदांवर राहून प्रामुख्याने पुराभिलेखविद्या व नाणकशास्त्र या विषयांशी निगडित अध्यापन व संशोधन केले. सेवानिवृत्तीनंतरही (१९९४) ते या विषयांत संशोधन करीत राहिले. त्यांची २४ पुस्तके, सु. ४५० संशोधनपर लेख आणि पौनी (१९६८-६९), भोकरदन (१९७४), मांढळ (१९७६-७७) इ. उत्खननवृत्तांतांमध्ये नाणी व पुराभिलेखांशी निगडित पुराव्यांसंदर्भातील संशोधनपर स्वतंत्र प्रकरणे प्रसिद्ध आहेत. याव्यतिरिक्त शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली मांढळ, आर्णी (१९७८-७९), तारसा (१९८०-८१) व श्रीकण्डा (१९८७-९०) या ठिकाणी उत्खनने झाली. मांढळ उत्खननात सापडलेले वाकाटक काळातील विटांचे बांधकाम असलेल्या दोन आद्य मंदिरांचे अवशेष; डझनाहून अधिक, प्रामुख्याने शैव (आठ तसेच बारा मुखे असलेल्या अनोख्या शिवाच्या मूर्ती) तसेच वैष्णव संप्रदायांतील मूर्ती, वाकाटक राजवंशाच्या ताम्रपटांचे तीन संच आदी वाकाटककालीन वैभव निर्देशित करणारे अवशेष विदर्भाच्या प्राचीन ऐतिहासिक काळाच्या सांस्कृतिक इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरले आहेत. या उत्खननांचा वृत्तांत भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या सहकार्याने प्रकाशनाच्या मार्गावर आहे (२०१८).

पुराभिलेख, नाणकशास्त्र व प्राचीन संस्कृत साहित्य ही शास्त्रींची प्रमुख कार्यक्षेत्रे त्यांचे गुरू डॉ. वा. वि. मिराशी व डॉ. वि. भि. कोलते यांच्या प्राच्यविद्या संशोधन परंपरेतील होती. या परंपरेचा परमोच्च बिंदू म्हणजे शास्त्रींचे संशोधनकार्य आहे, असे वाकाटक काळाशी निगडित संशोधन करणारे पाश्चात्त्य विद्वान हॅन्स बेकर (Hans Bakker) यांनी म्हटले आहे. शास्त्रींच्या प्रदीर्घ संशोधनकार्याचे फलरूप त्यांनी प्रस्तुत केलेल्या ‘सातवाहन-क्षत्रप’ या राजवंशांच्या कालानुक्रमावर नवा प्रकाश पाडणारे ठरले आहे. त्याचप्रमाणे सातवाहनांच्या ‘शॉर्टर क्रॉनॉलाजी’चे [सातवाहन राजवंशाचा संस्थापक सिमुक याच्या (श्रीमुख) कारकिर्दीची सुरुवात इ. स. पूर्व पहिल्या शतकातील उत्तरार्धात असल्याच्या विचारांना पाठिंबा देणारा संशोधकांचा वर्ग] ते पुरस्कर्ते होते. विदर्भातील मनसर उत्खननातील उपलब्ध पुराव्याच्या आधारावर हॅन्स बेकर यांनी सध्याचे मनसर ही वाकाटकांची राजधानी प्रवरपूर व येथील मंदिराचे अवशेष (भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने उजेडात आणलेले) प्रवरेश्वराचे असावेत, असे तर्कसंगत विधान एका चर्चासत्रात केले होते; त्याला दुजोरा देत शास्त्रींनी तेथे सापडलेल्या चार शिक्क्यांवरील लेखांच्या अर्थनिष्पत्तीतून हे सिद्ध होत असल्याचे जाहीर केले होते, असे बेकर म्हणतात.

शास्त्रींनी आपले लेखन प्रामुख्याने इंग्रजीत, तर काही हिंदीत केले. त्याचप्रमाणे मराठीतही त्यांचे लेखन प्रसिद्ध झाले आहे. त्यांचे काही महत्त्वपूर्ण ग्रंथ असे : बृहत्संहिता ऑफ वराहमिहिर (१९६९), कौशांबी होर्ड ऑफ मघ कॉइन्स (१९६९), कॉइनेज ऑफ द सातवाहनाज ॲण्ड कॉइन्स फ्रॉम एक्सकॅव्हेशन्स (१९७२), भारत के सांस्कृतिक केंद्र : अजंता (१९८७), द अर्ली हिस्ट्री ऑफ द डेक्कन (१९८७), द एज ऑफ द वाकाटकाज (१९९२), इन्क्रिप्शन्स ऑफ द सरभपुरीयज, पांडुवंशिन्ज ॲण्ड सोमवंशिन्ज (भाग १-२; १९९५), वाकाटकाज : सोर्सेस ॲण्ड हिस्ट्री (१९९७), द सातवाहनाज ॲण्ड द वेस्टर्न क्षत्रपाज : ए हिस्टॉरिकल फ्रेमवर्क (१९९८), द एज ऑफ द सातवाहनाज (खंड१-२; १९९९).

भारतातील पुराभिलेख व नाणकशास्त्राशी निगडित अनेक नियतकालिकांचे काही काळ मुख्य संपादक, सहसंपादक तसेच संस्थेचे अध्यक्ष वा उपाध्यक्ष होण्याचा बहुमान शास्त्रींना लाभला. न्यूमिझ्मॅटिक सर्व्हे ऑफ इंडिया (१९७०–८३), एपिग्राफिकल सोसायटी ऑफ इंडिया (१९७४–८३), न्यूमिझ्मॅटिक डिजेस्ट (१९८१–२००२) या नियतकालिकांचे त्यांनी दीर्घकाळ संपादन केले. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (युजीसी) इतिहासाचे राष्ट्रीय अधिव्याख्याता (१९८५-१९८६) आणि राष्ट्रीय अधिछात्र (१९८७-८९) म्हणून त्यांची निवड झाली. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय मानसन्मानही त्यांना लाभले. त्यांत फेलो ऑफ द रॉयल न्युमिस्मॅटिक सोसायटी (१९७६), अकबर सिल्व्हर मेडल (१९८४), अनंत सदाशिव आळतेकर सुवर्णपदक (१९९५) इत्यादींचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल.

नागपूर येथे त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्युपश्चात नेदर्लंड्समध्ये झालेले द वाकाटकाज हेरिटेज : द इंडियन कल्चर ॲट द क्रॉसरोड्स या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचीही (६-८ ऑगस्ट, २००२) संकल्पना त्यांच्या हयातीत चर्चेला आली होती. या चर्चासत्रातील शोधनिबंध त्यांच्या स्मृतीस अर्पण केलेले आहेत.

संदर्भ :

  • Bhatt, S. K. Ed., ‘Professor Ajay Mitra Shastri Felicitation Volumeʼ, Journal of the Academy of Indian Numismatics and sigillography, Volume VI, Indore, 1988.
  • Handa, Devendra Ed., ‘Ajay-Shri : Recent Studies in Indologyʼ, Professor Ajay Mitra Shastri Felicitation Volume, 2 Volumes, New Delhi, 1989.
  • Sharma, R. K. & Handa, Devendra Eds., ‘Revealing India’s Past : Recent Trends in Indian Art and Archaeologyʼ, Professor Ajay Mitra Shastri Commemoration Volume, 2 Volumes, New Delhi, 2005.

समीक्षक – प्रीती त्रिवेदी

प्रतिक्रिया व्यक्त करा