प्रस्तावना : रुग्णालयातील परिचर्या व्यवस्थापनात रुग्ण सेवा देण्यासाठी विविध प्रक्रियांचा समावेश केला जातो. रुग्ण सेवा ही रुग्णाला कोणत्या प्रकारचा आजार आहे व त्याच्या गरजा काय आहेत यावर अवलंबून असते. त्याकरिता रुग्णांची विभागणी करण्याची म्हणजेच श्रेणी ठरविण्याची जबाबदारी विभागातील डॉक्टर आणि परिचारिका व्यवस्थापक यांवर असते.

श्रेणी १ : गंभीर स्थिती – अतिदक्षता विभागातील रुग्ण ज्यांना त्वरित विशिष्ट सेवा दिली जाते.

श्रेणी २ : जुनाट आजार(Chronic disease) – रुग्णालयात दाखल करून सेवा देणे जरुरी असते.

श्रेणी ३ : जुनाट आजार  – उपचारासोबत पुनर्वसनाची गरज असणारे रुग्ण.

श्रेणी ४ : जुनाट आजार – रुग्णालयातून सोडल्यानंतर घरी कुटुंबात राहून उपचार घेऊ शकणारे रुग्ण.

श्रेणी ५ : असे रोगी जे जुनाट आजारांच्या शेवटच्या पायरीवर असून ज्यांना औषधोपचार व इतर आध्यात्मिक सेवेची गरज आहे.

रुग्ण शुश्रूषा व्यवस्थापन ( Patient Nursing Care Management) : सर्वसाधारण आजारांची श्रेणी रुग्ण शुश्रूषा करण्यासाठी परिचारिकांना मार्गदर्शक ठरते. रुग्ण परिचर्येच्या नियोजनासाठी पुढील मुद्दे महत्त्वाचे ठरतात.

  • रुग्णाचे परिचर्येसाठी निदान जे वैद्यकीय निदानाशी निगडीत असते (Nursing diagnosis).
  • रुग्ण सेवा देताना रुग्णाच्या प्राथमिक व निकडीच्या गरजा लक्षात घेणे.
  • सेवेचे नियोजन करताना शुश्रूषेची उद्दिष्टे स्पष्टपणे गृहीत धरणे.
  • उद्दिष्टे व वैद्यकीय सल्ला यांनुसार रुग्ण सेवेचे आयोजन करणे.
  • रुग्ण सेवेच्या मूल्यमापनाचे निकष ठरविणे.
  • वेळोवेळी रुग्णाच्या आजारामधील चढ-उताराचे निरीक्षण करून वैद्यकीय अधिकाऱ्यास कळविणे आणि त्यानुसार आरोग्य सेवेचे पुन्हा नियोजन करावे.

एखाद्या विभागात परिचारिकेची नेमणूक करित असताना वरिष्ठ परिचारिका पुढील तीन महत्त्वाच्या मुद्द्यांचा विचार करते : १) रुग्ण, २) रुग्ण सेवक / परिचारिका, ३) विभागातील वातावरण.

  • रुग्ण : यात समाविष्ट होणारे घटक म्हणजे : १)रुग्णसेवेतील क्लिष्टता, २) रुग्णांची बरे होण्याची प्रक्रिया व त्यासाठी लागणारा कालावधी, ३) रुग्णातील क्लिष्टतेमुळे शुश्रूतेवर होणारा परिणाम.
  • रुग्ण सेवक / परिचारिका (health care provider ) : १) परिचारिका  / परिचारक यांची शुश्रूषेमधील कौशल्य, २) परिचारिकेचे प्रशिक्षण (competency), ३) परिचारिकेचा त्या रुग्ण विभागातील अनुभव, ४) विशिष्ट आजारातील रुग्णाची देखभाल करण्यातील प्राविण्य (technical skills).
  • रुग्ण विभागातील वातावरण : १) रुग्णसेवा देण्याच्या विविध प्रक्रिया आणि पद्धती (patient care system), २) परिचारिकांना मिळणारी कामाची स्वायत्तता, ३) रुग्ण सेवेतील नियम (protocols, policy & procedures), ४) निर्णय घेण्याची क्षमता व स्वायत्तता, ५) रुग्ण सेवा देताना व्यवस्थापनाचा मिळणारा पाठींबा.    

रुग्ण शुश्रूषा – विविध परिचर्या पद्धती : या अंतर्गत सर्वसाधारण चार पद्धतींचा समावेश होतो. ज्यात प्रत्येक पद्धतीचे फायदे व तोटे याचा विचार करून शुश्रूषा देण्याची पद्धत ठरवली जाते.

१. ठराविक रुग्णासाठी स्वतंत्र शुश्रूषा (Case Method) : ही जुनी / पारंपारिक पद्धत आहे. ज्यामध्ये प्रत्येक रुग्ण ही एक  स्वतंत्र ‘केस’ म्हणून काळजी घेतली जाते. या विभागातील एकाच प्रकारच्या आजारी व्यक्तींची शुश्रूषा केली जाते. उदा., वैद्यकीय रुग्ण विभागात दिली जाणारी शुश्रूषा जसे की, सामान्य सेवा, औषधोपचार, ताप – नाडी – रक्तदाब मोजणे, जेवण देणे आणि आरोग्य शिक्षण देणे इत्यादी. या विभातील परिचारिका ८ ते १२ तासांची ड्यूटी शिफ्ट करतात.

फायदे :

  • सेवेत एकसंघपणा राहतो .
  • परिचारिका – रुग्ण संबंध चांगले राहून रुग्णात सुरक्षिततेची भावना निर्माण होते.
  • परिचर्येचा भार समसमान वाटला जातो व जबाबदारीची जाणीवही राहते.
  • रुग्णांच्या आरोग्याच्या गरजांवर जवळून देखरेख करता येते.
  • परिचरिकेला स्वःतलापण त्या रोग उपचाराविषयी शिकता येते.

तोटे :

  •  परिचारिकेंचा तुटवडा जाणवतो .
  •  जास्त परिचारिकांची नेमणूक करावी लागते
  •  रुग्णसेवेसाठी नेमलेली परिचारिका प्रशिक्षित/ कौशल्यप्रवीण नसल्यास रुग्णाच्या उपाययोजना व बरे होण्याचे प्रमाणावर परिणाम होतो.

२ . शुश्रूतेतील विविध प्रक्रीयेवर आधारित (Functional Nursing care) : ही पद्धत शास्त्रशुद्ध व्यवस्थापनाचा भाग आहे. यात दिलेली प्रक्रिया पार पाडणे जरूरी असते. यात वरिष्ठ परिचारिका कनिष्ठ परीचारिकेला विविध शुश्रूषा प्रक्रियेसाठी नेमते. विभागातील विविध परिचारिकांना रुग्णांच्या विविध सेवा देण्यासाठी सकाळ, दुपार, रात्री या वेळे प्रमाणे नेमले जाते. जसे की, इंजेक्शन्स देणारी परिचारिका, औषधे वाटणारी परिचारिका, सर्वसाधारण सेवा ( बेड मेकिंग ,बेड  बाथ) देणारी परिचारिका, ताप-नाडी-श्वसन-रक्तदाब इ. मोजून नोंद ठेवणारी परिचारिका इत्यादी.

फायदे :

  • परिचारिका विविध आणि विशिष्ट सेवेत प्राविण्य मिळविते .
  • वेळेची बचत होते ,सर्व रुग्णांना सर्व सेवा वेळेत मिळतात .
  • वरिष्ठ परिचारिकांना विभागातील कामावर लक्ष ठेवता येते.

तोटे :

  • रुग्णांची वेयक्तिक गरज भागविण्यास अडचण येऊ शकते .
  • रुग्णसेवा विभागल्याने एक संघता राहू शकत नाही.
  • प्रशिक्षनार्थी परिचारिकांना सखोल ज्ञान मिळत नाही.
  • रुग्णांशी जास्त संवाद नसल्याने त्यांना असुरक्षित वाटते .
  • परिचारिकांना रुग्ण सेवेचे समाधान मिळत नाही.

३. सांघिक परिचर्या पद्धती ( Team nursing ) : १९५३ मध्ये एलेनॉर लॅम्बरसन (Elenor  Lamberson) यांनी ह्या पद्धतीची शिफारस केली.ज्यामुळे विविध शुश्रूषेसाठी विविध परिचारिकांना नेमून रुग्णसेवा देण्याचे काम अधिक सुखकर व सोयीचे झाले आहे. सांघिक परिचर्या पद्धतीची तात्विक बैठक (Philosophy ) समजवून घेणे महत्त्वाचे ठरते. या पद्धतीत व्यावसायिक परिचारिका व अव्यावसायिक व्यक्ती एकत्र येतात आणि रुग्णाच्या आजारांप्रमाणे त्याच्या गरजा ओळखून सेवेचे नियोजन, आयोजन करून सेवा दिल्या नंतर त्यांचे मूल्यमापन करतात. तसेच रुग्ण हे माध्यम समजून सर्वंकष सेवा देता येतात

फायदे :

  • रुग्णाला सर्वंकष आरोग्य सेवा देता येते.
  • संपूर्ण संघाला कामाचे समाधान मिळते.
  • या पद्धतीमुळे सांघिक नेतृत्व ( Team Leader) व सांघिक शुश्रूषा पद्धत निर्माण करता येते.
  • संघामध्ये सहकार्य व सहयोगाची भावना निर्माण करता येते.
  • संघातील सदस्य रुग्णांना संघाच्या प्रमुख परिचारिका यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा पुरवितात.
  • संघातील सदस्यांमध्ये शुश्रूषेतील सहभाग व एकमेकातील सांघिक भाव जपण्यास मदत होते.
  • सेवा आणि शुश्रूषा भार परस्परात विभागला जातो.
  • सांघिक कौशल्ये वाढविण्यास मदत होते.
  • आजारी रुग्णास निरंतर सेवा मिळण्यास मदत होते.

तोटे :

  • सांघिक परिचर्येची संकल्पना तयार करण्यास वेळ लागतो.
  • परिचारिकांची सतत बदलणारी व्यवस्थापन प्रक्रिया ‘सांघिक परिचर्ये’साठी कठीण बनते.
  • संघातील सर्व सदस्य ‘रुग्ण’ हे माध्यम समजून शुश्रूषा देऊ शकत नाही.
  • काही सदस्य वैयक्तिक जबाबदारी टाळू शकतात. कारण त्यांना स्वतंत्रपणे कामाची  सवय असू शकते.
  • या पद्धतीने अधिकतर वेळ नियोजनात खर्ची पडू शकतो.

४. प्राथमिक परिचर्या पद्धत ( Primary Nursing Method) : ह्या पद्धतीत रुग्णाला सर्वंकष, वैयक्तिक आणि सातत्यपूर्ण शुश्रूषा पुरविली जाते. त्याचप्रमाणे रुग्णास ठराविक एका परिचारिकेमार्फत संपूर्ण सेवा दिली जाते. अशा प्रकारची शुश्रूषा रुग्ण दाखल झाल्यापासून उपचार पूर्ण होऊन तो संपूर्णपणे बरा होऊन घरी जाई पर्यंत एकाच परिचारिकेकडून दिली जाते. ह्या दरम्यान परिचारिका रुग्णांची प्राथमिक तपासणी करून डॉक्टरानी दिलेल्या उपचारात्मक नोंदींचा अभ्यास करून शुश्रूषेचे नियोजन करते. यासोबत आपले सहकारी परिचारिका, डॉक्टर व इतर आरोग्य संघ यांचे बरोबर सहकार्य करून संवाद साधते.

फायदे :

  • रुग्ण व त्यांचे कुटुंबीय यांना एक गट समजता येते.
  • सातत्यपूर्ण व खात्री लायक परिचर्या देण्यास मदत होते.
  • परिचारिकेला रुग्णसेवेचे समाधान प्राप्त होते.
  • परिचर्येच्या पद्धतीमध्ये आवश्यक तो निर्णय घेण्यास मदत होते.
  • रुग्ण व परिचारिका यांच्यात सुसंवाद निर्माण करता येतो.
  • रुग्णास दिलेली सेवा ही गुणात्मक असते.

तोटे :

  • या पद्धतीत परिचारिका इतरांपासून अलिप्त पडते.
  • सांघिक परिचर्येस वाव मिळत नाही.
  • परिचारिका या पद्धतीत अतिरिक्त प्राविण्य आणि कौशल्य प्राप्त असावी लागते.
  • ही पद्धत अधिक खर्चिक असते.
  • अतिरिक्त प्राविण्य आणि कौशल्य प्राप्त परिचारिका उपलब्ध असाव्या लागतात.

आरोग्य सेवा देण्यासाठी परिचर्या व्यवस्थापन हे महत्त्वाचे असून ते मेडिकल व्यवस्थापनाचा अविभाज्य भाग आहे. ज्यामुळे गुणात्मक आरोग्य सेवा देता येतात.

संदर्भ :

  • Joseph, Sunita, Management of nursing services and education, 2015.
  • M. Sakthivel Murugan, Management principles and practices, 2010.