धुंडा महाराज देगलूरकर : ( १५ मे १९०४ – २३ जानेवारी १९९२ ). वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार, प्रवचनकार. धुंडा महाराज यांचे पूर्ण नाव ह.भ.प. धुंडा महाराज रामचंद्र महाराज देगलूरकर असे होते. त्यांचा जन्म महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यातील देगलूर या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव मनुबाई होते. बालपणापासूनच धुंडा महाराज कुशाग्र बुद्धीचे होते. उपजतच त्यांचा अध्यात्माकडे कल होता. त्यांना त्यांच्या घराण्याकडून हा वारसा लाभला होता. देगलूरकर घराण्यातील संत परंपरेचा इतिहास दोनशे साठ वर्षांचा आहे. त्यांच्या घराण्यातील मूळ पुरुष गुंडा महाराज (जन्म १७५३) पासून ही परंपरा चालत आलेली आहे. धुंडा महाराजांच्या वयाच्या चवथ्या वर्षी त्यांच्या वडिलांचे अकस्मात निधन झाले. धुंडा महाराज आणि बंधू बंडा महाराज यांचे पालनपोषण त्यांचे चुलते महिपती महाराज यांनी केले. महाराजांचे प्राथमिक शिक्षण देगलूर येथे रघुनाथराव कोरडे गुरुजी यांच्याकडे उर्दू आणि मराठी अशा दोन भाषेत झाले. आई मनुबाई यांच्या मनात मुलाने उच्च शिक्षण घेऊन वकील व्हावे असे होते. त्यामुळे त्यांना इंग्रजी शिक्षणासाठी औरंगाबाद येथे पाठविण्यात आले होते; परंतु जोग महाराजांच्या उपदेशाने धुंडा महाराजांच्या जीवनाला कलाटणी मिळाली.

जोग महाराजांची आज्ञा प्रमाण मानून त्यांच्या घराण्याच्या संत परंपरेचा वारसा चालवण्यासाठी शालेय शिक्षण सोडून पारमार्थिक अध्यायनाकडे वळले. महाराजांचे प्रारंभिक संगीत शिक्षण देगलूरच्या मठात पंडित विनायकबुवा गवई यांच्याकडे झाले. देवणी येथील विख्यात वेदांत पंडित शा. सं. दामोदरशास्त्री यांनी देगलूरच्या मठात राहून महाराजांना संस्कृत काव्य, व्याकरण आणि त्यातील तत्वज्ञान शिकवले. पुढे धुंडा महाराज वेदांताकडे वळले आणि त्यांनी वेदांतांचा सखोल अभ्यास केला. विविध संस्कृत ग्रंथांचे सूक्ष्मपणे वाचन आणि चिंतन केले. पुढे त्याची पंढरपूर येथील अखिल भारतीय कीर्तीचे भगवानशास्त्री धारुरकर यांच्याकडे न्यायशास्त्र, तर्कसंग्रहीदीपिका, वेदांतपरिभाषा, पंचदशी, गीताभाष्य, ब्रम्हसूत्र, उपनिषद इत्यादी ग्रंथांचा सखोल अभ्यास केला. महाराजांनी वयाच्या एकोणिसाव्या वर्षी श्रद्धेने व निष्ठेने देगलूर जवळील रामपूर या शिवतीर्थी ज्ञानेश्वरीची एकशे आठ पारायणे केली. याच दरम्यान अग्रहाचे वकील मल्हारराव यांची कन्या कृष्णाबाई यांच्यासोबत धुंडा महाराज यांनी विवाह केला.

धुंडा महाराजांनी त्यांच्या वयाच्या सतराव्या वर्षी देगलूर ते पंढरपूर पदयात्रा सुरु केली. पुढे या पदयात्रेला भव्य स्वरूप प्राप्त झाले. त्यांनी पंढरपूर वारी वयाच्या पासष्टव्या वर्षांपर्यंत चालू ठेवली होती. तसेच चातुर्मासात चार महिने पंढरपूरला विठ्ठल मंदिरात व्रतस्त सेवा करत. हे व्रत त्यांनी शेवट पर्यंत पाळले. वयाच्या विसाव्या वर्षांपासून धुंडा महाराज नित्य अभ्यासपूर्ण कीर्तन, प्रवचन करू लागले. अफाट वाचन आणि चिंतन यामुळे वयाच्या विसाव्या – एकविसाव्या वर्षी महाराजांच्या वाणीला ओज प्राप्त झाले. महाराजांच्या वाणीला दैवी माधुर्य होते. वाचन, पाठांतर, चिंतन, मनन यामुळे त्यांच्या वाणीचा गोडवा जनसागराला आकर्षित करत होता. महाराज त्यांच्या प्रवचनातून ज्ञानेश्वरी, अमृतानुभव सारख्या श्रेष्ठ समस्येच्या सिद्धांतांची उकल लीलया करत, अवघड, गूढ तत्त्वज्ञान सुगमतेने सांगण्यात महाराजांचा हातखंडा होता. महाराजांची कीर्तन – प्रवचने अखंडितपणे चालू असे. चातुर्मासाचे चार महिने वगळता महाराज आठ महिने संपूर्ण महाराष्ट्रभर कीर्तन – प्रवचने करीत असत. त्याकाळी दळणवळणाची साधने फारशी उपलब्ध नव्हती. महाराज त्या काळात बसने, रेल्वेने, बैलगाडीने तर कधी कधी पायी देखील प्रवास करून जात असत. इतकी त्यांची कीर्तन – प्रवचनांवर निष्ठा होती. महाराजांच्या रसाळ, अमोघ वाणीने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले होते. त्यांची महाराष्ट्राबाहेर मद्रास, मच्छलीपट्ट्णम, हैद्राबाद, बडोदा, इंदूर, काशी, कोलकाता इत्यादी ठिकाणी प्रवचने झाली. काही वेळा त्यांची तेलगू भाषेतही प्रवचने झाली. त्यांनी वारकरी संप्रदायाचा प्रचार व प्रसार केला.धुंडा महाराज म्हणजे विसाव्या शतकातील सर्व कीर्तनकारांचे दीपस्तंभ होते . वारकरी संप्रदायाचे विचार रुजविण्यासाठी धुंडा म्हाराज आणि मामा दांडेकर यांनी संपूर्ण भारतभर अव्याहतपणे संचार केला .

धुंडा महाराज देगलूरकर हे विसाव्या शतकातील आधुनिक संत होत. चातुर्मासात पंढरपूरला प्रवचन चालू असताना त्यांच्या मोठ्या मुलाची मृत्यूची तार त्यांच्या हाती आली. ती तार वाचून त्यांनी शांतपणे बाजूला ठेवली व आपले प्रवचन पूर्ण केले. रझाकारांच्या काळात अनेक हिंदूंना त्यांनी व त्यांचे प्राण वाचविण्यासाठी पंढरपूर मठात आश्रय दिला. त्यांचे धाकटे बंधू बंडा महाराज यांचे अचानक निधन झाले. त्यावेळी सांत्वन करण्यासाठी पुण्याहून मामा दांडेकर आले होते. त्यांना परत जाताना पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पाचशे रुपयांचा चेक दिला. यातून दिसून येते ज्ञानेश्वरीतील अद्वैत विचार महाराजांच्या आचरणात होता. धुंडा महाराजांनी ज्ञानेश्वरांच्या हरिपाठावर असंख्य प्रवचने दिले. त्यांनी हरिपाठाच्या सातत्यपूर्ण चिंतनातून सहाशे पानांचा प्रदीर्घ स्वरूपाचा ‘ हरिपाठ विवरण ‘ अथवा ‘ भक्तिशास्त्र ‘ हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथाला मामा दांडेकरांनी प्रस्तावना दिली आहे. या ग्रंथात हरिपाठातील नाम महात्म्य आणि तत्त्वज्ञान विस्ताराने सांगितले आहे. १९७४ मध्ये संत एकनाथांच्या हरिपाठावरही सुमारे दोनशे पानांचा वस्तू क्रियापाठच भाविकांच्या हाती दिला. धुंडा महाराज देगलुरकरांनी महर्षी नारदांच्या भक्तिसुत्रा वर चारशे पानाचे विस्तृत भाष्य लिहिले. भक्तिशास्त्रावरील मौलिक ग्रंथ म्हणून नारदभक्तिसूत्र या ग्रंथांची ख्याती सर्वदूर पसरली. यानंतर त्यांनी संतवाचनामृत  हा दीडशे पानांचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात ज्ञानेश्ववरांच्या दहा अभंगावरील संकीर्तन आहे. तसेच संत तुकारामांच्या अभंगावर निरूपण केले आहे. या निरूपणाचे दोन भाग प्रसिद्ध आहेत. १९७६ सोलापूर येथील ज्ञानेश्वर महाराज जन्मशताब्दी निमित्त पसायदान संत ज्ञानेश्वरांचे मागणे  या ग्रंथाचे लेखन केले. या ग्रंथात पसायदानातील नऊ ओव्यांवर अडीचशे पानांचे विस्तृत विवेचन केले आहे. या ग्रंथाचे प्रकाशन तत्कालीन उपराष्ट्रपती बी. डी. जत्ती यांच्या हस्ते झाले होते. आंध्रप्रदेशातील मच्छलीपट्टण येथे आंध्र भाषा तज्ञांच्या मदतीने तेलगू भाषेतील ज्ञानेश्वरी चे प्रकाशन केले . या ग्रंथाबरोबरच मुमूक्षु ,प्रतिष्ठान ,पुरुषार्थ ,श्री ज्ञानेश्वर दर्शन ग्रंथ ,सांगाती ,कल्याण पंढरी संदेश ,पंचधारा इत्यादी मासिक – पाक्षिक – नियतकालिकातून महाराजांनी प्रसंगानुरूप संत साहित्यावर लेखन केले. महाराजांनी शेकडो ग्रंथांना अभ्यासपूर्ण प्रस्तावना दिल्या. धुंडा महाराजांनी विदर्भ साहित्य संघ,लातूर साहित्य परिषद,कऱ्हाडचे साहित्य संमेलन,वैदिक परिषद,संस्कृत संमेलन,याक्षदी कार्यक्रम पुणे आणि नाशिक येथील वसंत व्याख्यानमाला अशा विविध ठिकाणी विचार प्रवर्तक व्याख्याने दिली. तसेच १९६६ साली प्रयाग येथे झालेल्या विश्व हिंदू परिषदेत उपस्थित राहून जीवनात धर्माचे स्थान या विषयावर हिंदीतून असखलीत भाषण दिले. १९८७ मध्ये आळंदी येथे विश्व हिंदू परिषदेच्या भव्य अधिवेशनाचे अध्यक्ष पद धुंडा महाराजांना देण्यात आले होते.

पंच्याहत्तर वर्ष सातत्याने संत साहित्यावर मौलिक स्वरूपाचे लेखन कीर्तन प्रवचन यातून संपूर्ण भारतात वारकरी संप्रदायाचे विचार रुजविले या महाराजांच्या मौलिक योगदानाबद्दल शिक्षण क्षेत्राकडून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पुणे विद्यापीठा तर्फे धुंडा महाराजांचा त्यांच्या स्वगृही जावून सत्कार करण्यात आला. पुणे येथील पेशवे सरकारने स्थापन केलेल्या देव देवेश्वर मंदिर पुणे तर्फे धुंडा महाराजांचा १९८७ साली मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या समारंभात भारतीय संस्कृती कोशाकार महादेवशास्त्री जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी त्यांच्या मनोगतात नरामाजी राजा धुंडीराजा अशा शब्दात महाराजांचा गौरव केला.

विदर्भातील श्री जिजाऊ प्रतिष्ठान या शिवरायांच्या मातेच्या स्मृती प्रीत्यर्थ कार्य करत असलेल्या संस्थेने आळंदी येथे महाराजांना पुरस्कार देऊन सन्मानित केले. आळंदी येथील महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान यांच्यातर्फे धुंडा महाराजांचा भव्य सत्कार करण्यात आला . महाराजांनी विदवत्ता आणि वक्तृत्व याची ख्याती ऐकून कांची कामकोटी पीठाचे परमार्थ जगदगुरू चंद्रशेखर सरस्वती हे पंढरपूर येथे धुंडा महाराजांच्या भेटीस आले. मराठी साहित्य परिषद ,आंध्रप्रदेशच्या वतींने प्रकाशित होणाऱ्या पंचधारा  या त्रैमासिकाने धुंडा महाराजांवर स्वतंत्र विशेषांक प्रकाशित केला. तसेच पंढरी संदेश या नियतकालिकाने ही धुंडा महाराजांवर विशेषांक संपादित केला .

१९३६ मध्ये प्रकृती अवस्थामुळे महाराजांचे फिरणे बंद झाले. पण त्यांनी ज्ञानेश्वरीच्या चिंतनात,अभ्यासात मात्र खंड पडू दिला नाही. महाराजांनी रात्र रात्र जागून ज्ञानेश्वरी चे निरचनात्मक लेखन याच काळात केले. धुंडा महाराजांची प्राणज्योत २३ जानेवारी १९९२ साली सायंकाळी मावळली. त्यांच्या धर्मपत्नी कृष्णा माँ यांचा त्यानंतर काही तासांनी मृत्यू झाला. ही महाराष्ट्राच्या इतिहासातील अद्वितीय आणि अपूर्व अशी घटना होय.आज धुंडा महाराज देगलूरकर यांचा हा वारसा ह . भ. चंद्रशेखर महाराज देगलूरकर आणि ह. भ. प चैतन्य महाराज देगलूरकर हे पुढे चालवत आहेत.

संदर्भ :

  • क्षेत्रसंशोधन