मारुतीबोवा गुरव-आळंदीकर : (१० जून १८८५ – १९४२). वारकरी कीर्तनकार, प्रवचनकार. ह.भ.प. मारुतीबोवा गुरव हे वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून सर्वपरिचित होते. त्यांचा जन्म आळंदीचा. गुरव कुटुंब पूर्वी ज्ञानेश्वर महाराज मंदिरात नित्य पूजा करीत असे. विठोबा सखाराम गुरव आणि रंगुबाई यांच्या पोटी मारुतीबोवांचा जन्म झाला. विठोबा गुरव यांच्या दोन पत्नी होत्या, अक्का आणि रंगुबाई. रंगुबाईंचे माहेर हैबतबाबा पवार यांचे आरफळ हे गाव होय. बालपणीच हैबतबाबांचे चरित्र रंगुबाईंच्या म्हणजे मारुतीबोबांच्या मातोश्रींच्या कानावर पडले. रंगुबाईंच्या घरी पंढरीची वारी होती. त्यांना मारुती,बाबुराव आणि मथुराबाई, काशीबाई अशी चार अपत्ये होती. मारुतीबोबांचे इयत्ता दुसरीपर्यंतचे शिक्षण आळंदीत झाले. पुढे तिसरी, चौथीचे शिक्षण त्यांच्या बहिणीकडे खडकीत झाले. पाचवी इयत्ता आळंदीत उत्तीर्ण झाल्यावर मारुतीबोवांनी शालेय शिक्षणाचा त्याग केला. मारुतीबोवा बालपणापासून आळंदीच्या ज्ञानेश्वर मंदिरात रात्री झोपत त्यामुळे त्यांना रात्रीची शेजारती आणि पहाटेची काकड आरती ऐकायला, पहायला मिळे. रात्री ज्ञानेश्वर मंदिरातील अखंड हरिनाम पहारा मारुतीबोवा करीत.
हैबतबाबांच्या नित्यपाठात असणाऱ्या अभंगमालिकेनुसार ते भजन करीत. वेदशास्त्रसंपन्न लक्ष्मण सदाशिव प्रसादे यांच्या घरी ते योगवासिष्ठ ग्रंथाचे श्रवण करायला जात असत. कृष्णाबाई यांच्याशी बालपणीच मारुतीबोवांचा विवाह झाला. भजनासोबतच कीर्तनाची गोडी मारुतीबोवांना लागली. ते कृष्णबोवा श्रीगोंदेकर, श्रीपादबोवा भिंगारकर आदी कीर्तनकारांची कीर्तने ऐकत. नाना महाराज साखरे ज्ञानेश्वरी सांगत पुण्यात त्यांच्या ज्ञानेश्वरीचे श्रवण मारुतीबोवा करीत. विष्णुबोवा जोग महाराजांच्या कीर्तनाचा प्रभाव मारुतीबोवांवर पडला. त्यांनी माधुकरी मागून उदरनिर्वाह करण्याचा निश्चय केला. त्यांनी आपल्या आईकडेच माधुकरी मागितली. पुढे मारुतीबोवांच्या आईने आपली सून कृष्णाबाई म्हणजे बोवांच्या पत्नीलाच माधुकरी देण्यासाठी पुढे केले पण मारुतीबोवा विचलित झाले नाहीत. ‘पाच घरी भिक्षा मागून जगेन ‘ हा त्यांचा दृढ निश्चय होता. बंकटस्वामी, लक्ष्मणबोवा इगतपुरीकर यांनी आळंदीच्या ज्ञानेश्वर मंदिरात केलेल्या १०८ पारायणांचा फार मोठा प्रभाव मारुतीबोवांवर पडला. विष्णुबोवा जोग महाराज यांच्या पुणे येथील वाड्यात वास्तव्य करून वयाच्या १९ व्या वर्षापासुन मारुतीबोवांनी परमार्थ साधना सुरु केली. ज्ञानेश्वरी ,श्रीमद् भगवत गीता , अमृतानुभव , सकल संत गाथा आदी ग्रंथांचे श्रवण मारुतीबोवांनी विष्णूबोवा जोग महाराजांकडून केले. मारुतीबोवा गुरव यांनी देहूजवळीला भंडारा डोंगरावर साधना केली. मारुतीबोवांनी आपले कार्यक्षेत्र आळंदी हेच निवडले आणि ते कीर्तन , प्रवचन करू लागले. ते ज्ञानेश्वरी सांगू लागले. मारुतीबोवा ठोंबरे , बंकटस्वामी, मामासाहेब दांडेकर, पंडित पांडुरंग शर्मा, मारुतीबोवा गुरव यांनी वारकरी शाळेची कल्पना विष्णुबोवा जोग महाराज यांच्यापुढे मांडली. महत् प्रसासाने या सर्वानी जोग महाराजांचा होकार मिळवला. चैत्र शुद्ध प्रतिपदा शके १८३९ रोजी म्हणजे २४ मार्च १९१७ रोजी आळंदीत वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना झाली. वारकरी शिक्षण संस्था आणि मारुतीबोवा गुरव हे एकरूप झाले. विद्यार्थ्यांचे पाठ घेणे त्यांची भोजन, निवासाची व्यवस्था करणे अशी दैनंदिन कामे मारुतीबोवा करू लागले. पहाटे तीन वाजता मारुतीबोवा उठत, इंद्रायणीत स्नान करीत. ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवर अभिषेक करीत. गणपती, सिद्धेश्वर, सुवर्ण पिंपळ सगळीकडे जलाभिषेक करीत. १९२० ते १९४२ या काळात मारुतीबोवा वारकरी शिक्षण संस्थेचे चिटणीस होते. जोग महाराजांच्या इंद्रायणीच्या तीरावर असणाऱ्या समाधीस्थळ मारुतीबोवांनी नाम सप्ताह आणला. मारुतीबोवांनी कीर्तन, प्रवचनांसोबत ओंकारेश्वर सोरटी सोमनाथ, केदारनाथ, मूळ द्वारका, गोमती द्वारका, अयोध्या, गोकुळ, वृंदावन आदी तीर्थक्षेत्री यात्रा केल्या. मारुतीबोवांनी वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांसोबत १९३५ पासून पायी देहू वारीची परंपरा सुरु केली. खेडच्या तुरुंगातील कैद्यांना १९२२ साली मारुतीबोवांनी ज्ञानेश्वरी सांगितली. १९४२ साली मारुतीबोवांनी वारकरी शिक्षण रौप्यमहोत्सवी कार्यक्रमासाठी मोलाचे योगदान दिले. त्याचवर्षी त्यांचे निधन झाले.
संदर्भ :
- शताब्दी महोत्सवी शतामृतधारा, वारकरी शिक्षण संस्था, आळंदी.
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.