डेरे ,कोंडाजीबाबा : (१९०३ : २५ जून १९९३ ) वारकरी कीर्तनकार. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पारुंडे गावी त्यांचा जन्म झाला. कोंडाजीबाबांच्या वडिलांचे नाव तुकाराम धर्माजी डेरे तर आईचे नाव सगुणाबाई असे होते. त्यांचे वडील शेतकरी होते. एकुलता एक पुत्र म्हणून बालपणीचे दिवस अतिशय लाडात कौतुकात गेले. ते पाच सहा वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे आकस्मित निधन झाले. वडिलांचे छत्र हरपले तरी वैधव्य प्राप्त झालेल्या आई सगुणाबाईने कोंडाजीबाबांना शाळेत घातले आणि शेतात काबाड कष्ट करण्यासाठी त्यांनी कंबर कसली.  त्यांनी इयत्ता पाचवीतच शिक्षणाला विराम दिला आणि शेतात गुरे राखणे पसंत केले. पारुंडे गावातील सहदेव पुंडे यांची कन्या जाईबाई यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला. कालांतराने वडिलांच्या आतेबहीण ह. भ. प. गयाबाई बाबांच्या सहवासात आल्या. वैधव्यानंतर त्या विरक्त झाल्या होत्या तसेच ईश्वर संकीर्तनात मग्न झाल्या होत्या. ज्ञानेश्वरी , भागवत , सकळ संत गाथा , तुकाराम गाथा त्यांना मुखोदगत होत्या. गयाबाईंमुळे कोंडाजीबाबांना विठ्ठल भक्तीची ओढ लागली. ह . भ . प . पुरुषोत्तम महाराज उंब्रजकर यांच्यासोबत ते आळंदी मार्गे पंढरीची वारी करू लागले . ह . भ . प . पुरुषोत्तम महाराजांनी कोंडाजीबाबांच्या हाती तुळशीपत्र देऊन तसेच त्यांच्या गळ्यात तुळशीमाळ घालून चंद्रभागेच्या वाळवंटात , कोंडाजीबाबांना अनुग्रह दिला. शेतात रांत्रदिवस कष्ट करूनही कोंडाजीबाबांच्या वाढत्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नव्हता कारण शेती जिरायती होती. उदरनिर्वाहासाठी शेती सोडून त्यांनी मुंबई गाठली. फळविक्रीचा व्यवसाय, वलसाड येथे आंबा विक्री, सरकारी जंगलतोडीची ठेकेदारी असे अनेक व्यवसाय कोंडाजीबाबांनी केले. परंतु एकाही व्यवसायत त्यांना यश आले नाही ते कर्जबाजारी झाले. व्यवसायातील तोटा भरून काढण्यासाठी त्यांनी आपली शेती सावकाराकडे गहाण टाकली. घरचे दागदागिने ही मोडले. मुंबईला राम राम ठोकून ते तळेगाव – पारुंडे पायी चालत घरी आले. कोंडाजीबाबा आई, पत्नीसह दुसऱ्यांच्या शेतात, शेतमजून म्हणून राबू लागले. कोंडाजीबाबांनी पुन्हा मुंबईची वाट धरली. पेण येथे किराणामालाचे दुकान टाकले. तेथेही अपयश आले पुन्हा ते खिन्न अंत : करणाने पारुंड्याला आले. संस्काराच्या व्यापातून बाहेर पडावे कि संसार करावा या द्विधा मनःस्थितीत ते होते. विरक्ती त्यांना खुणावत होती, कोंडाजीबाबा दिवस रात्र मंदिरात भजनात रंगून जात. रात्री वीणा गळ्यात घालून हरिजागर करीत. मध्यरात्री गोळ्या डोंगरावर जाऊन साधना करीत. कोंडाजीबाबा गोळ्या डोंगरावरून खाली यायला तयार नसत. आई , पत्नी , ग्रामस्थ , कोणाच्याही आर्जव, विनंतीचा परिणाम त्यांच्यावर झाला नाही. उंब्रजकर महाराजांनीही कोंडाजीबाबांना समजावण्याचा प्रयत्न केला पण त्यांनाही अपयश आले. अन्नपाण्याचा त्याग करून कोंडाजीबाबांचा ‘ रामकृष्ण हरी ‘ जप सुरु होता. ‘ न पाहे माघारी आता परतोनि । संसारा पासोनि विरला जीव ‘ अशी बाबांची अवस्था झाली होती. जुन्नर परिसरातील गुंजाळवाडीचे ज्येष्ठ वारकरी कीर्तनकार सहादुबाबा वायकर यांनी कोंडाजीबाबांची समजूत काढून त्यांना डोंगरावरून खाली आणले. आळंदी, पंढरपूर, त्रयंबकेश्वर, देहू अशा वाऱ्या ते करू लागले. त्यांनी पहिले कीर्तन भीमाशंकर जवळच्या पोखरी गावात केले. कोंडाजीबाबा डेरे आणि सहादुबाबा वायकर यांनी नित्य नेमाच्या भजनाची मालिका संपादित केली . पंढरपूर, आळंदी, त्रयंबकेश्वर, पैठण या तीर्थक्षेत्री बाबांनी धर्मशाळा बांधण्यासाठी पुढाकार घेतला. ह. भ . प . लक्ष्मण महाराज भोसले, ह. भ. प. रामचंद्र महाराज लांडगे, ह. भ. प. वाजवणे बाबा, ह. भ. प. विट्ठ्लमहाराज पाबळे, वेदांताचार्य शंकर महाराज बोडके, ह. भ. प. विठ्ठलबाबा मांडे असे अनेक वारकरी कीर्तनकार कोंडाजीबाबांच्या मार्गदर्शनात घडले. बालयोगी महाराज आणि कोंडाजीबाबा यांचा विशेष स्नेह होता. मामासाहेब दांडेकर, धुंडा महाराज देगलूरकर, सहादुबाबा वायकर अशा वारकरी संप्रदायातील महान अध्वर्यूचे मार्गदर्शन कोंडाजीबाबा यांना लाभले.

संदर्भ :