कोरिना : प्राचीन ग्रीक कवयित्री. जन्म प्राचीन ग्रीसमधील बिओशिया जिल्ह्यातील टॅनग्रा या गावी झाला. प्राचीन मान्यतेनुसार तिचा जन्मकाळ इसवी सन पूर्व पाचव्या शतकाचा आहे. ती पिंडर या कवीची समकालीन असून त्याची गुरु असावी. त्याच्याबरोबर झालेल्या काव्य स्पर्धेत तिने पाच वेळा विजय संपादन केला अशी वंंदता आहे. तिने बिओशियन बोलीभाषेत कविता लिहिल्या. तिच्या कविता लयबद्ध होत्या. सुदाच्या मते तिने कवितांची पाच पुस्तके लिहिली. तिच्या काव्यात रूप शास्त्र असून तिच्या काव्य शैलीत महाकाव्या सारखी शब्दरचना दिसते. तिची कविता त्रुटित स्वरूपात उपलब्ध आहे. तिच्या सगळ्याच कविता आज ज्ञात नाहीत. साधारण ४२ कविता तुकड्याच्या स्वरूपात उपलब्ध आहेत. स्पष्ट , सोपी आणि बोली स्वरूपाची काव्यरचना आहे. तिच्या कविता भाषेच्या जटील वापरापेक्षा वर्णनावर अधिक लक्ष केंद्रित करतात आणि त्यांचा स्वर पिंडरच्या गंभीर स्वरूपापेक्षा उपरोधिक किंवा उपहासात्मक असतो.

कोरिनाच्या काव्यातील सर्वात विशेष म्हणजे तिच्यात पौराणिक नाविन्य आहे. बिओशिअन मिथ्यकथांना तिने काव्यरूप दिले. तसेच त्यात मिथकाचा वापर आहे. त्या कविता स्थानिक बोटियन पौराणिक कथांवर केंद्रित आहेत. विशेषतः ओरियन, ओडिपस आणि द सेव्हन अगेन्स्ट थेबेस  या कवितेमध्ये स्थानिक पौराणिक कथांचा संदर्भ आहे. कोरिनाने कवितेतून स्त्रियांच्या जीवनाचे वर्णन पुरुषांच्या दृष्टिकोनातून केले आहे. तिच्या कविता प्राचीन ग्रीक मधील परंपरागत स्त्रियांच्या कवितेचा एक भाग आहेत. त्या कविता तरुण मुली धार्मिक सण उत्सवात सादर करत असत. ह्या कविता स्त्रीच्या सामर्थ्याचे यथार्थ स्वरूप स्पष्ट करतात.  डॉट्स ऑफ ओसोपस आणि टेरप्सिकोर या कवितेच्या भागात वंशपरंपरेची आवड दिसून येते.

रोमन साम्राज्याच्या सुरुवातीच्या काळात कोरिनाची कविता लोकप्रिय होती. कोरिनाचा सर्वात प्राचीन उल्लेख पहिल्या शतकातील थेस्मैलॉनिकचा कवी एंटिपाटर यांनी केला होता. प्राचीन मोजक्या ग्रीक महिला कवीपैकी कोरिना एक असून, त्यांचे कार्य स्त्रीवादी साहित्यिक इतिहासकारांच्या दृष्टिने महत्त्वाचे आहे.

संदर्भ :