राष्ट्रीय प्रतिरक्षाविज्ञान संस्था : ( स्थापना – २७ जुलै, १९८१ )

राष्ट्रीय प्रतिरक्षा विज्ञान संस्थेची इमारत

एकोणीसशे ऐंशीच्या दशकात शरीरातील प्रतिक्षमता विज्ञान एसईआरसी सायन्स अँड इंजिनियरिंग रीसर्च कौन्सिल या संस्थेस अधिक महत्वाचे ठरेल असे विज्ञान व तंत्रज्ञान शाखेस वाटू लागले. त्याचवेळी प्रतिक्षमता विज्ञान संशोधनासाठी वेगळी संस्था असावी असा विचार पुढे आला. या विभागाचा फायदा मानवी व पशुखात्यास अधिक होण्याची शक्यता होती. भारतील वैद्यक संशोधन आणि भारतीय कृषि संशोधन संस्था यांनी विविध क्षेत्रातील तज्ञांना एकत्र आणले. या तज्ञांच्या सल्ल्याने इंडियन कौन्सिल ऑफ मेडीकल रिसर्च आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या संस्था संकुलाखाली नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ इम्युनॉलॉजी – राष्ट्रीय प्रतिरक्षाविज्ञान संस्थेची स्थापना एमजीके मेंनन यांनी केली. सुरुवातीच्या काळात ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (AIIMS) च्या इमारतीमधून या संस्थेचे कामकाज चालू होते. १९८२ सालापासून जी. पी. तलवार यांनी स्वतंत्र संचालक म्हणून या संस्थेचे काम पाहण्यास प्रारंभ केला.

राष्ट्रीय प्रतिक्षमता विज्ञान संस्था शरीराच्या प्रतिक्षमता तंत्राचा जीवाणूजन्य व परजीवी होणारे संसर्ग आणि त्यांवरील उपाय शोधण्यासाठी चार मुख्य प्रकारावर संशोधन करते. संसर्ग व प्रतिक्षमता, प्रतिक्षमतेची रेण्वीय रचना, जनुकीय नियंत्रण, प्रजनन व भ्रूणविकास. या सर्व क्षेत्रांत आधुनिक जीवविज्ञानाच्या वापरातून जैवरसायन शास्त्र, रेण्वीय जीवविज्ञान यांच्या सहाय्याने हे संशोधन करण्याचा आराखडा संस्थेमध्ये चालू झाला.

शरीरातील लसीकापेशी प्रतिक्षमता प्रथिने बनवतात. या पेशी दोन प्रकारच्या असतात. अस्थिमज्जेतील लसिका पेशींना बी पेशी (बोन मॅरो) तर थायमस ग्रंथीमध्ये विकसित पेशींना टी पेशी म्हणतात. बी व टी लसीकापेशींमध्ये प्रतिक्षमता संसर्गानंतर कोठल्या तऱ्हेने निर्माण होते व त्याचा संसर्ग करणाऱ्या परजीवींवर कसा परिणाम होतो यावर मुख्यत्वे संशोधन करण्याचा प्रयत्न सुरू होते. प्रतिक्षमतेच्या सहाय्याने प्रजनन नियंत्रण करता आले तर एक नवे क्षेत्र उदयास येईल असे संस्थेतील वैज्ञानिकांना वाटत होते. वंशपरत्वे विविध मानवी समुदायामध्ये संसर्गाविरुद्ध प्रतिक्षमता निर्माण होण्याची जनुकीय कारणे शोधण्यासाठी अधिक संशोधन करण्याची गरज होती.

जी. पी. तलवार व  ए. सुरोलिया यांच्या संयुक्त प्रयत्नाने ‘ताल सुर’ नावाचे गर्भनिरोधक बाजारात आले. कुष्ठरोग्यांच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींचे कुष्ठरोगापासून रक्षण होण्यासाठी कुष्ठरोग प्रतिबंधक लस सर्वप्रथम या संस्थेने निर्माण केली. गेल्या सत्तावीस वर्षात संस्थेच्या संशोधकांनी एकशेवीसहून अधिक शोधनिबंध, आंतरराष्ट्रीय पातळीवरील ग्रंथामधून नऊ प्रकरणे प्रसिद्ध केली आहेत तसेच तीस एकस्वे संस्थेच्या नावावर आहेत. भाजलेल्या त्वचेवर सरळ लावता येईल असे बहुवारिक – पॉलिमर वापरून जखमा लवकर बऱ्या होतील असा नैसर्गिक त्वचा पर्याय नुकतेच संस्थेने विकसित केला आहे.

संस्थेचे पहिले संचालक जी. पी. तलवार वयाच्या ९२ व्या वर्षी देखील संशोधन क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या संस्थेच्या संचालकपदाची जबाबदारी अमूल्य पंडा यांच्याकडे आहे.

संदर्भ :

समीक्षक : रंजन गर्गे


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.