ओशेरॉफ, डग्लस डीन: ( १ ऑगस्ट, १९४५ ) 

डग्लस ओशेरॉफ यांचा जन्म अमेरिकेतील वॉशिंग्टनमधील ऍबरडीन (Aberdeen) येथे झाला. त्यांनी १९६७ साली कॅलटेक येथून पदवी प्राप्त केली. तिथे त्यांनी शास्त्रज्ञ रिचर्ड फाईनमन यांची व्याख्याने ऐकली होती. तसेच त्यांनी गेरी न्युगेबॉर (Gerry Neugebauer) यांच्यासाठी पदवीपूर्व संशोधन केले. डग्लस ओशेरॉफ कॉर्नेल विद्यापीठातील आण्विक आणि घनभौतिकी प्रयोगशाळेत पदवीधर विद्यार्थी म्हणून रुजू झाले व निम्न तापमान भौतिकीमध्ये संशोधन करू लागले. प्रयोगशाळेचे प्रमुख डेव्हिड एम्. ली आणि रॉबर्ट सी. रिचर्डसन यांच्यासोबत डग्लस ओशेरॉफ यांनी हिलीयम-३ चे वर्तन शून्याच्या काही हजारांश अंशाच्या आतील तापमानास तपासण्यासाठी पोमेरांचुक शीतनाचा वापर केला. त्यांच्या मोजमापनात त्यांना अनपेक्षित परिणाम दृष्टीस आले. त्याचे तिघांनी मिळून असे स्पष्टीकरण दिले की, हिलीयम-३ चे अतिशीत तापमानाला प्रावस्था संक्रमण (Phase Transition) होते व त्याचे रूपांतर अतिद्रायु अवस्थेत (Superfluid) होते. हिलीयम-३ मधील अतिद्रायुता याबाबत केलेल्या संशोधनाबद्दल डग्लस ओशेरॉफ, डेव्हिड मार्टीन ली आणि रॉबर्ट सी. रिचर्डसन या तिघांना १९९६ च्या भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कारासाठी एकत्रितपणे सन्मानित करण्यात आले.

कॉर्नेल विद्यापीठातून १९७३ साली डग्लस ओशेरॉफ यांनी पीएच्.डी. पदवी संपादन केली. त्यानंतर न्यू जर्सीमधील मरे हिल येथील बेल लॅब्समध्ये त्यांनी १५ वर्षे काम केले. निम्न तापमानामुळे हिलीयम-३ सोबत घडणाऱ्या घटनांवरील संशोधनाचे काम तेथे त्यांनी चालू ठेवले. १९८७ साली स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र आणि उपयोजित भौतिकी विभागात रूजू झाले, जिथे त्यांनी १९९३-९६ या काळात विभागीय अध्यक्ष म्हणून पद भूषविले. त्यांच्या संशोधनात त्यांनी अतिनिम्न तापमानाला घडणाऱ्या घटनांवर लक्ष्य केंद्रित केले आहे.

ओशेरॉफ यांची स्पेस शटल कोलंबियाच्या अन्वेषण पॅनेलवर काम करण्यासाठी निवड करण्यात आली. त्यांचे काम जवळपास रिचर्ड फाईनमन यांनी स्पेस शटल चॅलेंजर पॅनेलमध्ये बजावलेल्या भूमिकेप्रमाणेच आहे. सध्या डग्लस ओशेरॉफ अमेरिकेच्या वैज्ञानिक आणि अभियंते यांच्या सल्लागार मंडळावर कार्यरत आहेत. ही संस्था अमेरिकन सरकारमध्ये विश्वसनीय विज्ञानाचे महत्त्व वाढवित आहे. डग्लस ओशेरॉफ डावखुरे असून एक उत्साही छायाचित्रकार आहेत. ते मुलांमध्ये विज्ञानाची गोडी वाढवण्यासाठी प्रयत्नशील असतात.

संदर्भ :

समीक्षक : हेमचंद्र प्रधान