पवन सुखदेव : ( ३० मार्च, १९६० )

पवन सुखदेव यांचा जन्म नवी दिल्ली येथे १९६० साली झाला. बालपणीच त्यांना निसर्गाचा थेट परिचय झाला आणि निसर्गाविषयी प्रेम त्यांच्या मनात रूजले. नवी दिल्लीतल्या सेट कोलंबा हायस्कूलमध्ये त्यांचे माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले. १९७४ मध्ये त्यांचे वडील नोकरीनिमित्त स्वित्झर्लंडला गेले. तेथे जिनेव्हा येथील कॉलेज डू लिमोनमध्ये तीन वर्षे त्यांचे शिक्षण झाले. त्यांचे पुढील शिक्षण इंग्लंडमधील डोव्हर कॉलेजमध्ये झाले. तेथे त्यांनी इंग्रजी भाषेचे अध्ययन केले. १९७१ मध्ये त्यांना ऑक्सफर्ड विद्यापीठाची भौतिकीसाठी  शिष्यवृत्ती मिळाली. याशिवाय त्यांच्या अध्ययनाचेचे विषय होते सामाजिक मानववंशशास्त्र आणि बौद्ध धर्म.

त्यांच्या  शिक्षणाला वेगळे वळण मिळण्याचे कारण आर्थिक होते. इच्छा असूनही त्यांना भौतिकी विषय सोडून अर्थशास्त्राचा अभ्यास सुरू करावा लागला. अर्थशास्त्राच्या जोडीला त्यांनी न्यायशास्त्राचाही अभ्यास केला. त्यांचे पुढील आयुष्य बँक व्यवस्थापन आणि अर्थशास्त्राशी निगडित झाले. मात्र रूढार्थाने परिचित असलेल्या अर्थशास्त्राच्या मळलेल्या वाटेने ते गेले नाहीत. पुढे त्यांना ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड येथील बँकेत नोकऱ्या मिळाल्या. तेथे काम करताना त्यांना सामाजिक समस्यांच्या परिचय झाला.

दहा वर्षांचा हा अनुभव त्यांना अर्थ आणि अर्थव्यवहारासंबंधी वेगळी दृष्टी देऊन गेला. देशाच्या वा समाजाच्या रूढ आर्थिक विकासात प्रभाव टाकणारे आणि अदृश्य असणारे घटक त्यांच्या लक्षात आले. त्यामध्ये पर्यावरणाशी निगडित असलेल्या घटकांनी त्यांचे लक्ष वेधून घेतले. देशात राष्ट्रीय सकल उत्पन्न ठरवताना हे घटक ध्यानात घेतले जात नाहीत. त्यांचे मत असे आहे की पर्यावरणातील कुठल्याही क्रियेला आर्थिक मूल्य असते. परागीकरण करून कृषी पिकांचे उत्पन्न वाढवणाऱ्या मधमाशांच्या सेवेचे मूल्यमापन होत नाही. ही सेवा विनामूल्य मिळते असा समज आहे. मधमाशांचे अस्तित्व टिकवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाय योजनांकडेही दुर्लक्ष होते. वनांचे समृद्धीकरण केल्यामुळे व तत्सम इतर उपाययोजनांमुळे त्यांचे अस्तित्व टिकेल व देशाच्या उत्पन्नात भर पडेल हे लक्षात घ्यायला हवे. पर्यावरण संतुलित राखण्यासाठी झाडांची भूमिका मौलिक असते. पैशाच्या रूपात त्यांचेही मूल्यमापन केले पाहिजे.

सुखदेव यांनी ‘द इकॉनॉमिक अँड बायोडायव्हर्सिटी’ हा संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण कार्यक्रमासाठी पहिला अहवाल लिहिला. या अहवालात आपण निसर्गाचे किती देणे लागतो याचा ताळेबंद त्यांनी बँकरच्या भूमिकेतून मांडला होता. निसर्ग भांडवलाची किंमत त्यातून सर्वप्रथम सांगितली. हरित अर्थशास्त्राच्या माध्यमातून रोजगार कसे निर्माण होतात व त्याचा दारिद्र्य निर्मूलनासाठी कसा हातभार लागतो हे त्यांनी स्पष्ट केले. जंगलांना आगी लागणे, बेकायदा व नियोजन न करता जंगलतोड करणे, वनवासींच्या जमिनी बेकायदा ताब्यात घेणे अशा अनेक घटनांमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळतो. ॲमेझॉनची जंगले ही  लॅटिन अमेरिकेच्या २४९ अब्ज डॉलरच्या अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहेत. त्या बदल्यात हे देश निसर्गाला परत काय देतात ? ॲमेझॉनच्या जंगलातील वणवे थांबले नाहीत तर पाऊस संपेल आणि शेती बागायतीचे नुकसान होऊन सर्वजण भुकेकंगाल होतील असे त्यांचे मत आहे. त्याचप्रमाणे जमिनीचे, पाण्याचे व हवेचे वाढते प्रदूषण यामुळे होणाऱ्या नुकसानीचे आर्थिक मूल्यमापन होत नाही. या हरित ऱ्हासांचे मूल्यमापन करणे हा राष्ट्रीय सकल उत्पादन मोजण्याचाच एक भाग असला पाहिजे. एकीकडे ते वाढत असेल पण हरित मूल्य घटत असेल तर श्रीमंती व दारिद्र्य यातील दरी रुंदावत जाईल. याच चिंतेतून त्यांनी ग्रीन इंडियन स्टेट्स ट्रस्ट (GIST) या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. त्याद्वारा मानवी भांडवल आणि निसर्गनिर्मित भांडवल या दोन्ही घटकांचा आधार राष्ट्रीय सकल उत्पादन ठरवताना घेता येईल तसेच नैसर्गिक भांडवलात होणारे चढ-उतार यावर लक्ष ठेवता येतील व संतुलनाचे उपाय योजता येतील त्यातून शाश्वत विकास साधेल.

ते २०१८ पर्यंत वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर (WWF) चे अध्यक्ष होते. GIST नंतर संयुक्त राष्ट्रांच्या एन्व्हायरमेंट प्रोग्रॅम (UNEP) चे ते सद्भाव प्रसारक दूत झाले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे राजकीय शासनकर्ते यांवर आणि उद्योग जगताच्या धोरणांवर प्रभाव पडू लागला. २००९ मध्ये हरित अर्थशास्त्र ही संकल्पना साकार करण्यासाठी त्यांचेकडे UNEP ने नेतृत्व सोपवले ते त्यांनी यशस्वी करून दाखवले म्हणून त्यांना २०२० या वर्षीच्या प्रख्यात टायलर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठाकडून दिवंगत जॉन व अलाईस टायलर यांच्या नावाने दिला जातो. तो मिळवणारे सुखदेव हे तिसरे भारतीय आहेत. यंदाचा पुरस्कार त्यांना व अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठातील पर्यावरण शास्त्राच्या प्राध्यापिका ग्रेटचेन सी डेली यांना विभागून दिला जाणार आहे. हा पुरस्कार नोबेल पुरस्कारासमान गौरवास्पद आहे.

संदर्भ :

समीक्षक : मोहन मद्वाण्णा