राईन्स, फ्रेडरिक : ( १६ मार्च,१९१८– २६ ऑगस्ट,१९९८ )

फ्रेडरिक राईन्स यांचा जन्म न्यू जर्सीमधील पॅटरसन येथे झाला. त्यांचे शिक्षण न्यू जर्सीमधील युनियन हिल हायस्कूलमध्ये झाले. त्यांना विज्ञानात रस होता. एका शिक्षकाने त्यांना प्रयोगशाळेची दारे खुली करून दिल्यामुळे त्या प्रेरणेने विज्ञानाचा अभ्यास चांगला होऊन त्यात त्यांना गोडी निर्माण झाली. फ्रेडरिक राईन्स हे एक चांगले गायकसुद्धा होते. संगीताची आवड त्यांनी आयुष्यभर जोपासली.

होबोकेन, न्यू जर्सी येथील स्टीव्हन्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधील बॅचलर ऑफ सायन्स ही पदवी राईन्स यांनी प्राप्त केली. तेथूनच गणितीय भौतिकशास्त्र (मॅथमॅटिकल फिजिक्स) या विषयातील मास्टर ऑफ सायन्स ही पदवी संपादन केली. ‘न्युक्लीअर फिजन अँड लिक्वीड ड्रॉप मॉडेल ऑफ द न्युक्लीअस’ या विषयावर प्रबंध लिहून न्यूयॉर्क विद्यापीठातून त्यांनी पीएच्.डी. ची पदवी मिळवली.

रिचर्ड फाईनमन यांनी १९४४ साली फ्रेडरिक राईन्स यांना मॅनहॅटन प्रोजेक्ट असलेल्या लॉस अलामॉस प्रयोगशाळेत भरती करून घेतले. तिथे त्यांनी सुमारे १५ वर्षे काम केले. राईन्स यांचा अनेक आण्विक परीक्षणांत सहभाग होता व त्यावर त्यांनी वार्तांकनही केले.

वुल्फगँग पाऊली ( Wolfgang Pauli) यांनी ४ डिसेंबर १९३० रोजी ‘न्यूट्रिनो’ या मूलकणाची संकल्पना सर्वप्रथम मांडली. या मूलकणाला ‘न्यूट्रिनो’ हे नाव एन्ऱिको फर्मी यांनी दिले. फ्रेडरिक राईन्स यांनी आपले संशोधन कार्य न्यूट्रिनोचे गुणधर्म व अन्योन्यक्रिया यापुरते सीमित ठेवले. क्लाइड कोवान ( Clyde Cowan) यांच्या साथीने राईन्स यांनी आपले प्रयोग सुरू केले. न्यूट्रिनो कणांच्या स्त्रोतासाठी त्यांनी अणुबॉम्ब तयार करण्याचा प्रस्ताव मांडला. विशेष म्हणजे, हा प्रस्ताव मान्यही झाला आणि त्यानुसार राईन्स आणि कोवान तयारीला सुद्धा लागले. परंतु जेरोम केलॉग ( Jerome Kellogg) यांनी अणुबॉम्बऐवजी अणुभट्टीचा पर्याय अंमलात आणण्याचे राईन्स यांना पटवून दिले. त्यानुसार १९५३ साली तीनशे लिटर क्षमतेच्या संयंत्राची उभारणी करून राईन्स आणि कोवान यांनी प्रयोगांना सुरुवात केली. न्यूट्रिनोच्या अस्तित्वाच्या खुणा शोधण्यासाठी त्यांनी केलेले प्रयोग कोवान– राईन्स न्यूट्रिनो एक्स्परिमेंट नावाने प्रसिद्ध आहेत. १९५६ साली त्यांनी न्यूट्रिनोचे अस्तित्व प्रयोगाच्या आधारे सिद्ध केले. १९५७ साली क्लाइड कोवान हे न्यूट्रिनोवरील संशोधन कार्य सोडून जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठात अध्यापनासाठी गेले. परंतु फ्रेडरिक राईन्स यांनी मात्र न्यूट्रिनोवरील आपले संशोधन कार्य पुढे सुरूच ठेवले.

सन १९९५ मध्ये क्लाइड कोवान यांच्या साथीने न्यूट्रिनोचे अस्तित्व सिद्ध केल्याबद्दल फ्रेडरिक राईन्स यांना मार्टीन लुईस पर्ल ( Martin Lewis Perl) यांच्याबरोबर भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार विभागून मिळाला.

फ्रेडरिक राईन्स यांना नोबेल पुरस्काराबरोबरच जे. रॉबर्ट ओपनहाइमर स्मरणार्थ पुरस्कार, विज्ञानाचे राष्ट्रीय पदक, ब्रूनो रोझी पारितोषिक, मायकेल्सन-मोर्ले पुरस्कार, पॅनोफ्स्की पारितोषिक आणि फ्रँकलिन पदक असे अनेक मानसन्मान मिळाले. राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे सदस्य म्हणून ते निवडून आले होते. तसेच रशियन विज्ञान अकादमीचे परदेशी सदस्यत्वही त्यांना प्राप्त झाले होते. आयर्विनमधील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाच्या(UCI) भौतिक विज्ञान शाखेचे ते अधिष्ठाता होते. १९९१ पर्यंत ते शिकवत होते.

प्रदीर्घ आजाराने कॅलिफोर्निया येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

 समीक्षक : हेमंत लागवणकर