लॅक्टिक अम्ल हे सेंद्रिय अम्ल आहे. याचे रेणवीय सूत्र C3H6O3 असे असून आययूपीएसी (IUPAC) नाव २- हायड्रॉक्सी प्रोपॅनॉइक अम्ल असे आहे.

 पार्श्वभूमी : कार्ल व्हिल्हेल्म (शील) शेले (Carl Wilhelm Scheele) या स्वीडन रसायनशास्रज्ञाने १७८० मध्ये नासलेल्या दुधापासून लॅक्टिक अम्ल मिळवले. दुधामध्ये असलेल्या लॅक्टोज शर्करेमुळे यास लॅक्टिक अम्ल असे नाव मिळाले. स्नायूंच्या हालचालींमध्ये लॅक्टिक अम्ल तयार होते, हे प्रथम यन्स याकॉप (बर्सेलियस) बर्झीलियस (Jons Jacob Berzelius) यांनी १८०८ मध्ये शोधून काढले. लॅक्टोबॅसिलस  हे जीवाणू लॅक्टिक अम्ल तयार करतात, हे लूई (ल्वी) पाश्चर (Louis Pasteur) यांनी १८५६ मध्ये शोधून काढले. प्राण्यांच्या शरीरात किण्वन (विनॉक्सिश्वसन) प्रकियेद्वारे लॅक्टिक अम्ल सातत्याने तयार होत असते आणि ते मूत्रावाटे, घामावाटे शरीराबाहेर टाकले जाते. चयापचय क्रियांमध्ये या प्रकिया सामान्यपणे घडतात.

गुणधर्म : लॅक्टिक अम्लाचा घनावस्थेतील रंग पांढरा असतो. द्रवावस्थेत ते रंगहीन असते. पाण्यामध्ये त्याची विद्राव्यता उच्च प्रतीची असते.

लॅक्टिक अम्लाची प्रकाशीय वलनक्षम (Optically active) अशी डी-/दक्षिणवलनी (Dextro rotatory) आणि एल-/वामवलनी (Levo rotatory) अशी दोन रूपे आहेत.

औद्योगिक संश्लेषण : (अ) किण्वन प्रक्रिया : उद्योगधंद्यांमध्ये लॅक्टिक अम्ल हे किण्वन प्रक्रियेद्वारे तयार करतात. याकरिता लॅक्टोबॅसिलस  या जीवाणूंचा वापर केला जातो. हे जीवाणू ग्लुकोज, सुक्रोज किंवा गॅलॅक्टोज सारख्या शर्करांचे रूपांतर लॅक्टिक अम्लामध्ये करतात.

स्ट्रेप्टोकॉकस  आणि लॅक्टोकॉकस  जीवाणूसुद्धा किण्वन प्रक्रिया करतात. लॅक्टोबॅसिलस केसीन  आणि लॅक्टोकॉकस लॅक्टिस  या जीवाणूंच्या प्रजाती एका ग्लुकोज रेणूपासून दोन लॅक्टिक अम्लाचे रेणू तयार करतात, तर इतर काही प्रजाती एका ग्लुकोज रेणूपासून एक लॅक्टेट, कार्बन डायऑक्साइड आणि ॲसिटिक अम्ल किंवा एथेनॉल तयार करतात.

(ब) रासायनिक प्रक्रिया : ॲसिटाल्डिहाइड आणि हायड्रोजन सायनाइड यांची रासायनिक विक्रिया झाली असता बहि:पूरित (Racemic) लॅक्टिक अम्ल तयार होते.

जैविक भूमिका : जोरदार व्यायामामध्ये शरीराला ऊर्जेची अधिक गरज असते म्हणून शरीरात ग्लुकोजची ऑक्सिडीकरण प्रक्रिया सुरू होते व पायरुव्हेट (पायरुव्हिक अम्ल) तयार होते. या पायरुव्हेटचे रूपांतर लॅक्टेटमध्ये होते. ग्लुकोजलयन (Glycolysis) प्रक्रियेत लॅक्टेट सातत्याने ऊर्जानिर्मितीस मदत करते. पक्षी आणि वटवाघुळांमध्ये खांद्यांच्या स्नायूंमध्ये लॅक्टेट अधिक प्रमाणात आढळते आणि उडताना सातत्याने ऊर्जानिर्मितीस उपयुक्त ठरते.

पेशीद्रव तसेच रक्तद्रवामध्ये लॅक्टेटचे प्रमाण वाढले तर ऊर्जानिर्मितीत अडथळा येतो आणि थकवा अनुभवास येतो. विश्रांती घेतल्यानंतर जास्तीचे लॅक्टेट पेशीद्रव आणि रक्तद्रवातून काढून उत्सर्जित केले जाते.

उपयोग : वैद्यकशास्त्रामध्ये लॅक्टिक अम्लयुक्त (लॅक्टेट) रिंजर द्रावण (Ringer’s Solution) आणि हार्टमन द्रावण (Hartmann’s solution) ही द्रावणे अपघात, शस्रक्रिया किंवा भाजणे यांसारख्या स्थितीमध्ये उपचारादरम्यान वापरली जातात.

अन्नउद्योगातील दुग्ध उत्पादने जसे दही, ताक, चीज, योगर्ट (Yogurt), लेबॉन (Lebon), केफिर (Kefir) यांच्यात लॅक्टिक अम्ल आढळते. बिअर आणि वाईन यांसारख्या पेयांमध्ये लॅक्टिक अम्ल असते. सौंदर्यप्रसाधनांमध्ये जंतुनाशक म्हणून लॅक्टिक अम्लाचा उपयोग करतात. लॅक्टोन लॅक्टाइडचे बहुवारिकीकरण करून सिंडायोटॅक्टिक पॉलिलॅक्टाइड (PLA) हे प्लॅस्टिक तयार करतात. या प्लॅस्टिकचे जैविक विघटन होते.

पहा : ग्लुकोजलयन; पाश्चर, लूई (ल्वी)बर्झीलियस (बर्सेलियस), यन्स याकॉपलॅक्टिक अम्ल (पूर्वप्रकाशित); लॅक्टिक अम्लरक्तता; शेले (शील), कार्ल व्हिल्हेल्म.