चांदेकर, शंकर विष्णु ऊर्फ दादा : (१९ मार्च १८९७ – २७ जानेवारी १९७६). दादा चांदेकर या नावाने प्रसिद्ध असलेले मराठी संगीत दिग्दर्शक. त्यांचा जन्म कोल्हापूर येथे संगीतप्रेमी कुटुंबात झाला. त्यांचे वडील मिरजेच्या राजेसाहेबांकडे संगीतकार म्हणून नोकरीस होते. लहानपणीच ते वडिलांकडून पेटीवादन शिकले. पुढे दादांनी मिरजेतील प्रसिद्ध संगीतशिक्षक नीलकंठबुवा जंगम यांचे शिष्यत्व पत्करले. वयाच्या बाराव्या वर्षीच ते कीर्तनात साथ देऊ लागले. १९१४ मध्ये त्यांनी किर्लोस्कर संगीत मंडळीत प्रवेश केला. त्यानंतर बलवंत संगीत मंडळी, विश्वनाथ संगीत मंडळी इत्यादी नाट्यसंस्थांत त्यांनी साथीदार म्हणून उत्कृष्ट कार्य केले. ते १५ वर्षे नाट्यसृष्टीत होते.
१९३१ नंतर दादांनी साताऱ्याला संगीत शिक्षक म्हणून २-३ वर्षे शिकविण्या केल्या. नंतर कोल्हापूर सिनेटोन या चित्रपट निर्मिती गृहात त्यांची ऑर्गनिस्ट म्हणून नियुक्ती झाली. १९३५ साली भालजी पेंढारकर दिग्दर्शित कालियामर्दन या चित्रपटात संगीत दिग्दर्शक म्हणून त्यांना पहिली संधी मिळाली. १९३७ मधील प्रिन्स शिवाजी प्रॉडक्शन्सच्या स्वराज्य सीमेवर या यशस्वी ऐतिहासिक चित्रपटाचे संगीतही दादांचेच होते; परंतु त्यांचे खरे नाव झाले ते हंस पिक्चर्सच्या मा. विनायक दिग्दर्शित ब्रह्यचारी या अत्यंत यशस्वी चित्रपटामुळे. या चित्रपटातील दादांची सर्व गाणी लोकप्रिय झाली. ‘यमुना जळी खेळू खेळ कन्हैय्या, का लाजता’ या मीनाक्षी शिरोडकर यांनी गायिलेल्या गाण्याला त्या काळी (१९३८) खूप प्रसिद्धी मिळाली होती. यानंतर दादांनी लपंडाव, अर्धांगी, मोरूची मावशी, ब्रह्मघोटाळा, छाया, अमृत, सासरमाहेर इत्यादी चाळिसांहून अधिक चित्रपटांना संगीत दिले. त्यांत बहुतेक मराठी व काही हिंदी चित्रपटही होते. ‘नटली चैत्राची नवलाई’ हे पहिली मंगळागौर या चित्रपटामधील लता मंगेशकर यांनी गायलेले त्यांचे आणखी एक लोकप्रिय गीत. जयमल्हार (१९४७) या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत लावणीप्रधान चित्रपटांचा पाया घातला, त्या चित्रपटातील अस्सल लावणी ढंगाचे संगीतही दादा चांदेकर यांचेच होते.
काळे गोरे, ब्रह्मचारी, अशी रंगली रात्र पैजेची, जीव सरला पीळ उरला आदी नाटकांचे संगीत नियोजन त्यांनी केले. ते उत्तम हार्मोनियमवादक असून पुणे आकाशवाणीवर संगीत दिग्दर्शक आणि संगीत परीक्षक म्हणून बरेच दिवस त्यांनी काम केले होते. त्यांचे पुण्याला निधन झाले.
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.