गोसावी, राजाराम शंकर : (२८ मार्च १९२५ – २८ फेब्रुवारी १९९८). प्रसिद्ध मराठी नाट्य आणि चित्रपट अभिनेते. त्यांना मराठी चित्रपटसृष्टीत ‘विनोदाचा राजा’ म्हणत असत. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील सिद्धेश्वर कुरोली (ता.  खटाव) येथे झाला. त्यांचे प्राथमिक शालेय शिक्षण झाले होते. मेळे, गाणी, नकला आणि नाटके यांची त्यांना लहानपणापासूनच आवड होती. नाट्यअभिनेते बाळ गोसावी हे राजा गोसावींचे धाकटे बंधू होत.

राजा गोसावींचे छायाचित्र

सुरुवातीला राजा गोसावी गंगाधरपंत लोंढेंच्या राजाराम संगीत नाटक मंडळीत आणि दिग्दर्शक मास्टर विनायक यांच्या प्रफुल्ल पिक्चर्स या चित्रपटनिर्मिती संस्थेत लहानमोठी कामे करत होते. नंतर दामुअण्णा मालवणकरांच्या प्रभाकर नाट्य मंदिरात ते प्रॉम्प्टरचे काम करायला लागले. त्यांच्या भावबंधन या मराठी नाटकामध्ये त्यांना पहिल्यांदा रखवालदाराची भूमिका मिळाली. त्यानंतर या नाटकातील विविध व्यक्तिरेखा साकारण्याची संधी त्यांना मिळाली. पुण्यातील ‘भानुविलास’ या चित्रपटगृहामध्ये तिकीटखिडकीवर तिकिट विक्रेता म्हणून ते काम करत होते. १९५२ मध्ये दत्ता धर्माधिकारी यांच्या अखेर जमलं या विनोदी चित्रपटामधून राजा गोसावींनी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. त्याचवर्षी आलेल्या राजा परांजपे दिग्दर्शित लाखाची गोष्ट या चित्रपटामध्ये त्यांनी राजा परांजपे यांच्या मित्राची व्यक्तिरेखा साकारली. मुलीच्या वडिलांच्या एक लाख रुपये एका महिन्यात खर्च करून दाखवण्याच्या विचित्र अटीमुळे नायकाची आणि त्याच्या मित्राची होणारी तारांबळ यातून या चित्रपटात विनोदनिर्मिती करण्यात आली आहे. अडचणीत असलेल्या जिवलग मित्राला बाहेर काढण्यासाठी केलेली धडपड यात त्यांनी अचूक साकारली. ग. दि. माडगूळकरांनी लिहिलेली गीते आणि आशा भोसले आणि सुधीर फडके यांचे पार्श्वगायन असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना आवडला. यातील राजा गोसावींचा सहजसुंदर अभिनय चित्रपटाला पूरक ठरला. हे चित्रपट ‘भानुविलास’ चित्रपटगृहामध्ये लागले, तेव्हा एक दिवसाकरिता स्वत:च्याच चित्रपटाची तिकिटे त्यांनी विकली होती.

राजा गोसावींनी त्यानंतर अबोली, महात्मा, बोलविता धनी, सौभाग्य (१९५३), शुभमंगल, बेबी (१९५४), पुनवेची रात, गंगेत घोडं न्हालं (१९५५), आंधळा मागतो एक डोळा, जगावेगळी गोष्ट (१९५६), गाठ पडली ठकाठका (१९५६), आलिया भोगासी, देवघर, झालं गेलं विसरून जा (१९५७), दोन घडीचा डाव (१९५८), अवघाची संसार, पैशांचा पाऊस (१९६०), वरदक्षिणा, भाग्यलक्ष्मी (१९६२), वाट चुकलेले नवरे (१९६४), कामापुरता मामा (१९६५), येथे शहाणे राहतात (१९६८), या सुखांनो या (१९७५) इत्यादी विनोदी, सामाजिक आणि तमाशाप्रधान चित्रपटांत भूमिका केल्या. वसंत पिक्चर्सचे निर्माते शरश्चंद्र गुण्ये यांनी राजा गोसावींची लोकप्रियता पाहून त्यांनाच तिहेरी भूमिकेत दाखवत राजा गोसावीची गोष्ट (१९५८) हा चित्रपट काढला. यात त्यांनी रंगवलेली मध्यमवर्गीय शहरी नायकाची भूमिका रसिकांना भावली. १९६२ साली प्रदर्शित झालेल्या बाप माझा ब्रह्मचारी या चित्रपटात राजा गोसावी यांनी अभिनेत्री जयश्री गडकर यांच्या नायकाचे काम केले. वेडा बाळ आणि नितीन राजहंस अशा दोन वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका यात त्यांनी सहज पेलल्या. चाकोरीबाहेरचा विषय आणि त्यांच्या अभिनयातील वेगवेगळ्या छटा, मुद्रेवरील भाव या गुणांमुळे प्रेक्षकांना त्यांची ही भूमिका आवडली. हा चित्रपटही खूप गाजला. काका मला वाचवा (१९६६) या चित्रपटामध्ये त्यांनी विजयकुमार या चित्रकाराची भूमिका केली आहे. परदेशी राहणाऱ्या काकांकडून संपत्ती मिळावी, यासाठी मित्राचे ऐकून केलेला खोटेपणा आणि त्याचवेळी प्रामाणिक प्रियकराची भूमिका अशी विरोधाभास असलेली त्यांची वेगळी व्यक्तिरेखा या चित्रपटात होती. असला नवरा नको गं बाई (१९७६) या चित्रपटामध्ये त्यांनी ग्रामीण ढंगाचे इरसाल पात्र रंगविले. हा खेळ सावल्यांचा (१९७६) यासारख्या काही चित्रपटांमध्ये त्यांनी खलनायकाची लक्षवेधी भूमिका केली. त्याचप्रमाणे त्यांनी अनेक चित्रपटांत गंभीर भूमिका सहज रीत्या साकारल्या.

राजा गोसावींनी मराठी चित्रपटांमध्ये कारकीर्द गाजवत असताना मराठी रंगभूमीवरही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. उधार उसनवार (भीमराव वाघमारे), एकच प्याला (तळीराम), करायला गेलो एक (हरिभाऊ हर्षे), कवडीचुंबक (पंपूशेट), घरोघरी हीच बोंब (दाजिबा), डार्लिंग डार्लिंग (प्रभाकर),  तुझे आहे तुजपाशी (श्याम), नटसम्राट (गणपतराव बेलवलकर), पुण्यप्रभाव (नुपुर, सुदाम, कंकण), प्रेमसंन्यास (गोकुळ), भाऊबंदकी (नाना फडणीस), भावबंधन (रखवालदार, महेश्वर, कामण्णा आणि धुंडीराज), याला जीवन ऐसे नाव (नाथा), लग्नाची बेडी (अवधूत, गोकर्ण), संशय कल्लोळ (फाल्गुनराव, भादव्या) इत्यादी अनेक सामाजिक, विनोदी आणि कौटुंबिक नाटकांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या छटा असलेल्या भूमिका केल्या. नाटकात संवाद म्हणताना ते स्वत:च्या मनाची वाक्येही त्यातून म्हणत. हा हजरजबाबीपणा त्यांच्या अनेक नाटकांतून दिसून येतो.

वसंत सबनीस लिखित सौजन्याची ऐशी तैशी या विनोदी नाटकामध्ये राजा गोसावींनी नाना बेरके हे बनेल पुरुषाचे पात्र केले होते. शेजाऱ्यांशी असलेला वाद ह्या किरकोळ विषयावर बेतलेले हे नाटक त्यांच्या हजरजबाबी विनोदी शैली आणि प्रभावी शब्दफेक यांमुळे गाजले. त्यांच्या रंगश्री नावाच्या नाट्यसंस्थेमार्फत त्यांनी मराठी रंगभूमीवर अनेक जुनी आणि नवीन नाटके आणली. त्यांचे संपूर्ण महाराष्ट्रात अनेक यशस्वी प्रयोग केले.

१९५० ते १९८० अशी तीन दशके राजा गोसावींनी त्यांच्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. निरागस आणि बोलका चेहरा, सहज संवादफेक करून हशा मिळवण्याचे कौशल्य ही त्यांच्या अभिनयाची बलस्थाने होती. शहरी, मध्यमवर्गीय, भाबडा, निरागस असा नायक त्यांनी अनेक चित्रपटात रंगवला. शहरी मध्यमवर्गीयांना आपल्यातलाच कोणीतरी आहे असे वाटावे, असे साधारण रंगरूप आणि शरीरयष्टी त्यांची होती; परंतु नैसर्गिक अभिनय आणि मिश्किल विनोदी संवाद या जोरावर त्यांनी आपली चित्रपट कारकीर्द गाजवली. कारकीर्दीच्या सुरुवातीस आणि मध्यावर त्यांनी विनोदी अभिनेते शरद तळवलकर आणि ज्येष्ठ नाटककार दामूअण्णा मालवणकर यांच्यासोबत उत्तमोत्तम चित्रपट आणि नाटके केली. राजा गोसावींनी त्यांच्या कारकीर्दीत पंच्याऐंशीपेक्षा अधिक चित्रपट व सुमारे चाळीस नाटकांमधून अभिनय केला.

राजा गोसावी यांचा विवाह १९४९ मध्ये झाला. त्यांच्या पत्नीचे नाव सुनंदा असून या दांपत्यास दोन मुली व तीन मुलगे आहेत. त्यांच्या मुलांनी लहानपणी हौशी रंगभूमीवर काम केले होते. त्यातील त्यांच्या शमा देशपांडे या कन्या हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये अभिनेत्री म्हणून कार्यरत आहेत.

१९९५ साली अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याचा मान राजा गोसावी यांना मिळाला. नाट्यपरिषदेने बालगंधर्व हा पुरस्कार देऊन त्यांच्या अभिनयाचा गौरव केला. राजा गोसावी यांचे पुणे येथे एका नाटकावेळीच हृदयविकाराचा झटका येऊन निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ आणि गौरवार्थ अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ही संस्था राजा गोसावी बाल नाट्य शिबीराचे आयोजन दरवर्षी करते.

संदर्भ :

  • कदम, सदानंद, सांगाती, पुणे, २०२१.

समीक्षण : अरुण पुराणिक