रूझिचका (रूझिका), लिओपोल्ड (लावोस्लव) : (१३ सप्टेंबर १८८७ – २६ सप्टेंबर १९७६)क्रोशियात व्हूकॉव्हार येथे जन्मलेल्या लेओपोल्ड यांचे कुटुंबीय कलाकुसरीची कामे करत. तसेच ते शेतकरी देखील होते. त्यांचेआई-वडील जरी क्रोशियन असले तरी आजी-आजोबा झेकोस्लोवकियातले आणि पणजोबा ऑस्ट्रियातले होते.

ऑसिजेक येथे शालेय शिक्षण घेत असताना त्यांच्या डोक्यात धर्मगुरू होण्याचा विचार प्रबळ झाला होता पण तो त्यांनी पुढे बदलला व आपल्या आवडत्या रसायनशास्त्र विषयात अभ्यास करण्याचे ठरविले. त्याकाळचे खडतर जीवन आणि प्रतिकूल राजकीयस्थिती यामुळे रुझिचकांनी जर्मनीला प्रयाण केले व तेथे सेंद्रियरसायनशास्त्र या विषयात ते १९१० साली पदवीधर झाले. तद्नंतर, त्यांनी जर्मनीतील कार्ल झुए इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये जर्मन रसायनतज्ज्ञ हेर्मान स्टाउडिंगर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरेट मिळविली. १९१७ मध्ये त्यांनी स्वित्झलॅंडचे नागरिकत्व मिळविले. १९२१ साली ते झुरीकला आले आणि सिबा कंपनीत रुजू झाले. त्यांनी झुरिक येथील स्विस फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये स्टाउडिंगर यांच्यासोबत काम केले. १९२६-२९ या काळात ते नेदर्लंडमधील उत्रेक्त विद्यापीठात कार्बनी रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते. तेथे त्यांना सेंद्रियरसायन विभागाचे प्रमुखपद मिळाले. परंतु तेथील रसायनक्षेत्र फारसे प्रगत नव्हते, म्हणून ते तीन वर्षाच्या वास्तव्यानंतर, १९२९ साली स्वित्झर्लंडला परत लेवझुरिक मधील स्विस फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्राध्यापक बनले. तेथे ते १९५७ साली निवृत्त होईपर्यंत कार्यरत होते.  त्यावेळी, त्यांनी पायरेथ्रम फुलात मिळणाऱ्या पायरेथ्रिनया या कीटकनाशक रसायनचा शोध लावला. पुढे,  वनस्पतीपासून मिळणाऱ्या टर्पिन या सुवासयुक्त तेलाचा त्यांनी छडा लावला. हे तेल अत्तरनिर्मिती करणाऱ्या उद्योगासाठी पर्वणी ठरली. जिनेव्हा येथील  एका अत्तर कंपनीशी करार करून त्यांनी तेथे संशोधन सुरू केले. त्यामुळे सुगंधीक्षेत्रात त्यांचे मोठे नाव झाले आणि १९१६-१७ या वर्षात ते जगातल्या सर्वात जुन्या अत्तर उत्पादन करणाऱ्या जर्मनीतील होल्झामिंदेन येथील हरमन अँड रीमेर या कंपनीत रुजू झाले. रूझिचकांना आढळलेकी टर्पिन्स हा विविधतेने व्यापलेला सयुंगांचा मोठा गट आहे व त्यात रबरापासून टर्पेंटाईन द्रावणापर्यंतचे पदार्थच नव्हे तर रक्तातील कॉलेस्ट्रॉल (चरबी) देखील समाविष्ट होतात. हे सारे टर्पिन पदार्थ आयसोप्रीन या सयुंगाच्या विविध आकाराच्या ठोकळ्यांनी तयार होत असतात.  टर्पिन वर्गातल्या सयुंगाच्या बाबतीत त्यांचा गाढा अभ्यास लक्षात घेऊन, १९१८ साली ई. टी. एच. (Eidgenössische Technische Hochschule) येथे ज्येष्ठ व्याख्याता व नंतर १९२० साली मानद प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. त्याचवेळी, ते झुरीक विद्यापीठात देखील शिकवत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच्. डी. मिळविलेल्या विद्यार्थ्यांना हाताशी घेऊन त्यांनी मुस्कोन हे कस्तुरीमृगापासून मिळणारे आणि सिव्हेटोन हे ठिपक्याच्या कस्तुरी मांजरापासून प्राप्त होणाऱ्या सुगंधी रसायनांना शोधून काढले. त्यांनाही संयुगे १७ व १५ कार्बन अणूंची वलये असलेली आढळली. त्याकाळी, फक्त आठच कार्बन अणूंची वलये असू शकतात असा शास्त्रज्ञांचा समज होता. तेव्हा, कार्बन अणू या नाना संयुगात निरनिराळ्या प्रतलात राहून अशी भिन्न वलये निर्माण करू शकतात हा रूझिचकांचा शोध महत्वपूर्ण ठरला. अशा वलयांचे अस्तित्व त्यांनी संयुगांचे विश्लेषण आणि संश्लेषणकरून निश्चित केले. ९ ते ३० कार्बन अणूंची वलये तयार करता येतात हे त्यांनी दाखवून दिले. तसेच, त्यांनी बहुआण्विय विषमवलयी संयुगेदेखील तयार केली. अशाप्रकारच्या रसायनांची निर्मिती करण्यासाठी, रूझिचकांची  ‘महाचक्रीय सयुंगाची संश्लेषण पद्धती ’ सेंद्रिय रसायनशास्त्रात मार्गदर्शक ठरली व ती सेंद्रिय रसायनशास्त्राची एक शाखा बनून गेली.

झुरीकला त्यांना ई. टी. एच. मध्ये रसायनशास्त्राचे प्राध्यापकपद बहाल करण्यात आले तेव्हापासून त्यांच्या कर्तृत्वाला बहर आला. रूझिचक व त्यांच्या सहकाऱ्यांनी टर्पिनवर संशोधन करून १०, १५, २०, ३० व ४० कार्बनअणू असलेली टर्पिने शोधून काढली. टर्पिनेही आयसोप्रिन एककाची (C5H8) बनलेली असतात, ही मीमांसा त्यांनी प्रथम मांडली होती. त्यांनी संशोधन करून टर्पिनसोबतच स्टेरॉइडची उच्चसंयुगे शोधली. एण्ड्रोस्टीरोन व टेस्टोस्टीरोन या लैंगिक संप्रेकांचे यशस्वी संश्लेषण केले, तेव्हा त्यांची प्रयोगशाळा जगभरात कौतुकाचा विषय झाली. त्यांनी लैंगिक संप्रेरकाची संरचना, जीवनसत्व-अ, पित्ताम्ले व विविध स्टेरॉइड्स यावरही संशोधन केले. त्यांची प्रयोगशाळा अशाप्रकारच्या संशोधांनासाठी जागतिक केंद्र बनली. त्यांना रसायनातला नोबेल पुरस्कार मिळाला त्याच्या दुसर्‍यावर्षी क्रोशियन केमिकल असोसिएशनने त्यांना व्याख्यानासाठी आमंत्रित केले जिथे त्यांनी आपल्या पर्यंतच्या संशोधनांचा शास्त्रीय दिग्गजांपुढे ऊहापोह केला. १९४० साली ते नेदर्लंडच्या रॉयल ॲकेडमी ऑफ सायन्स अँड आर्ट्सचे परदेशी सदस्य बनले.

रुझिचका लिओपोल्ड यांना मर्सेल बेनोइट पुरस्कार आणि फॅरेडे लेक्चररशिप पुरस्कार मिळाले होते. जीवनभरात त्यांना विज्ञान (४), वैद्यकीय (२), निसर्गविज्ञान (१) व कायदा (१) अशा विविध क्षेत्रातून एकूण ८ मानद डॉक्टरेटस, ७ पारितोषिके व मानसन्मान आणि रसायन, जीवरसायन व अन्य क्षेत्रातल्या २४ संघटनाचे मानद सदस्यत्व मिळाले. आपले बहुतेक संशोधन कार्य त्यांनी स्वित्झर्लंडमध्ये केले. त्यामुळे ते क्रोशिया आणि स्वित्झर्लॅंड या दोन्ही देशाचे नागरिक होते. १९३९ सालचा रसायनशास्त्रातला नोबेल पुरस्कार त्यांना जर्मन रसायनतज्ज्ञ अडॉल्फ फ्रेड्रिच यांच्यासमवेत मिळाला होता. रूझिचकांचे पॉलिमेथिलीन्स व उच्चवर्गातील टर्पिन्स संयुगे आणि फ्रेडरीचचे सेक्स संप्रेरके याविषयीचे काम होते.

१९५० नंतर त्यांनी जीवरसायन क्षेत्रात कार्य करण्यास प्रारंभ केला. तो काळ जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र यांच्या समन्वयाची उत्क्रांती घडवून आणीत होता. त्यावेळी त्यांनी मांडलेले ‘Biogenetic Isoprene Rule’ हे गृहितक जीवरसायनातला मैलाचा दगड ठरला. १९५७ मध्ये त्यांनी आपली प्रयोगशाळा व्लादिमिरच्या हवाली करून सेवानिवृत्ती घेतली. त्यानंतर, त्यांनी आपला खूपसा वेळ शैक्षणिक क्षेत्रासाठी दिला. त्यासाठी त्यांनी स्विस-युगोस्लाव सोसायटी स्थापन केली. स्वित्झर्लंडमध्ये त्यांच्या नावे होतकरू तरुण वैज्ञानिकांना पुरस्कार दिला जातो. त्यांच्या व्हुकोंव्हार या जन्मस्थळी त्यांच्या स्मरणार्थ १९७७ साली एक वस्तुसंग्रहालय उभारण्यात आले आहे.

समीक्षक : सुधाकर आगरकर