हक, अब्दुल : (१६ नोव्हेंबर १८७२-१६ ऑगस्ट १९६१). बाबा-ए-उर्दू. उर्दू भाषेचे नामवंत साहित्यिक व समीक्षक. त्यांचा जन्म गाझियाबाद (उत्तर प्रदेश) जिल्ह्यातील हपूर या गावी झाला. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण जन्मगावी घेऊन अलीगढ मुस्लिम विद्यापीठातून ते बी.ए. झाले (१८९४). सुरुवातीस त्यांनी भारतातील ब्रिटिश सरकारच्या गृहखात्यामध्ये काही वर्षे भाषांतरकार म्हणून सेवा बजावली. पुढे त्यांना पदोन्नती मिळून त्यांची नेमणूक औरंगाबाद येथे शाळा निरीक्षक म्हणून करण्यात आली. अलीगढमध्ये असतानाच सर सय्यद अहमद खान, शिब्ली नोमानी, टी. डब्ल्यू. आर्नल्ड, बाबू मुखर्जी, रॉस मसूद, मोहसीन उल्-मुल्क आदी तत्कालीन उर्दू साहित्यिक आणि राजनीतिज्ञ यांच्याशी त्यांचा परिचयव मैत्री झाली होती.
