मुल्ला, आनंद नारायण : (२४ आक्टोबर १९०१ – १२ जून १९९७) भारतातील प्रसिद्ध उर्दू साहित्यिक. आनंद नारायण हे मुळ काश्मीरचे. तेथील मुल्ला वंशज. काश्मिरी ब्राह्मण. पंडित कालिदास मुल्ला लखनौला स्थलांतरित झाले व तिथेच ते स्थाईक झाले. जगत नारायण मुल्ला हे वकिल आणि सरकारी वकिल, अलाहाबाद न्यायालयात न्यायाधीश (१९५४-१९६१) होते. मुल्ला यांचा जन्म जगत नारायण मुल्ला यांच्या घरात लखनौ येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण बर्कतुल्ला रजा फिरंगी महालीच्या फिरंगी महालात लखनौ येथे झाले. तर काही शिक्षण सरकारी जुबली विद्यालयातही झाले. १९१९ मध्ये बी. ए., १९२३ मध्ये एम. ए. (इंग्रजी विषयात) झाल्यानंतर काही व्यावसायिक शिक्षणक्रमानंतर १९२५ मध्ये लखनौ उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून त्यांची नेमणूक झाली.
न्यायालयात करिअर केल्यानंतर भारतीय राजकारणात त्यांनी प्रवेश केला. १९६७ मध्ये भारतीय संसदेत खासदार म्हणून प्रवेश केला. १९७२ ते १९७८ मध्ये राज्यसभेवर कॉंग्रेसकडून निवडून आले. त्यांनी अंजूमान ताराकी उर्दूचे अध्यक्ष म्हणून काम केले. त्यांचे असे मत होते की उर्दू ही माझी मातृभाषा आहे, मी माझा धर्म सोडू शकतो, परंतु माझी मातृभाषा नाही. या विधानातून त्यांचा भाषेबद्दल आणि त्यांच्या वारसाबद्दल आदर व्यक्त होतो. धर्मनिरपेक्ष भारताच्या सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरेचा आनंद घेणारे आनंद नारायण मुल्ला अद्वितीय होते. आनंद नारायण मुल्ला यांचे साहित्य – कविता – (१९५९), मेरी हादसे उम्र ए गुरेजा, श्याही एक बुंद (१९६३), कर्ब ए आगाही (१९७३), जदा ए मुल्ला ; समीक्षा – उर्दू शायरी का इंतेखाबी सिलसिला, कुछ नासर मे भी (१९७४); भाषांतर – माझमीन नेहरू (१९३९); संपादन – यादगार ए चकबस्त.
ते इंग्रजी साहित्याचे उत्कृष्ठ विद्यार्थी असल्याने त्यांनी इंग्रजी भाषेत कविता केल्या ; परंतु पुढे त्यांनी उर्दू भाषेत कविता लिहिल्या. ते लखनौ साहित्य आणि संस्कृतीचा केंद्रबिंदू बनले. त्यांच्या कवितेतून त्यांनी जीवन आणि जगाचे एक रचनात्मक आणि नैतिक दृष्टीकोनाने तत्वज्ञान जगासमोर ठेवले. कवी म्हणून इकबाल यांचा आनंद नारायण मुल्ला यांच्यावर प्रभाव पडलेला होता. भारतीय समाजाला चांगल्या दिशेने जाण्याचा मार्ग मुल्ला यांच्या साहित्यसंपदेने दिलेला आहे. आनंद नारायण मुल्ला यांना अनेक प्रतिष्ठीत पुरस्कार मिळालेले आहेत. साहित्य अकादमी पुरस्कार (१९६४), इकबाल पुरस्कार इत्यादी महत्वाचे सन्मान त्यांना प्राप्त झाले.
त्यांचे दिल्लीत येथे निधन झाले.
संदर्भ :
- http://sahitya-akademi.gov.in/library/meettheauthor/anand_narain_mulla.pdf