शर्मा, अरुणकुमार : (३१ डिसेंबर १९२४ – ६ जुलै २०१७ ) अरुणकुमार शर्मा यांचा जन्म कोलकाता येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण कोलकात्याच्या मित्रा इन्स्टिट्यूट येथे झाले. आशुतोष महाविद्यालयातून त्यांनी १९४३ साली बी. एस्सी. केले. एम. एस्सी. केल्यावर त्यांनी युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर त्यांची नेमणूक भारतीय वनस्पती सर्वेक्षण संस्थेत झाली. तेथील वनस्पती संग्रहालयात व उद्यानाच्या विकासात त्यांनी विशेष लक्ष घातले. त्यामुळे वनस्पती संकलनाचा त्यांना अनुभव मिळाला. १९४७ साली कोलकाता विद्यापीठात त्यांना तात्पुरती अध्यापनाची नोकरी मिळाली. अध्यापनाचे काम करीत असतानाच त्यांनी वर्धमान विद्यापीठातून डी. एस्सी. ही पदवी मिळवली. सायटोजेनेटीक्स, सायटोकेमिस्ट्री आणि सेल बायालॉजी यात त्यांना विशेष रुची निर्माण झाली.
अरुणकुमार शर्मा यांनी रंगसूत्राचे (क्रोमोझोम) भौतिक आणि रासायनिक गुणधर्म जाणून घेण्याचे नवीन तंत्र शोधून काढले. या तंत्रास संपूर्ण जगाने मान्यता दिली. त्यांनी कोलकाता विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विभागाला संशोधन केंद्र म्हणून नावारूपाला आणले. या विषयांवर त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत अनेक पुस्तके लिहिली. त्यात क्रोमोझोम: थियरी अँड प्रॅक्टिस हे पुस्तक आहे. तसेच आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकेत सायाटॉलॉजीआणि तत्सम विषयावरील शोधनिबंध प्रसिद्ध केले. त्यांच्या शोधकार्यात आणि लिखाणात त्यांच्या सुविद्य पत्नी अर्चना शर्मा यांचे त्यांना मोठे सहाय्य लाभले.
अरुणकुमार शर्मा यांना १९७२ साली जवाहरलाल नेहरू फेलोशिप मिळाली. १९७४ साली त्यांना इंडियन बोटॅनिकल सोसायटीचे बिरबल सहानी पदक मिळाले. १९७६ साली त्यांना एस. एस. भटनागर पुरस्कार मिळाला. अरुणकुमार शर्मा इंडियन सायन्स काँग्रेसचे अध्यक्ष होते. १९८३ साली ते पद्मभूषण पुरस्काराचे मानकरी ठरले. इंडियन अकादमी ऑफ सायन्सेस, बंगलोर; नॅशनल अकादमी ऑफ सायन्सेस, अलाहाबाद या संस्थांचे ते फेलो होते. १९७६ ते ७८ या काळात ते इंडियन सोसायटी ऑफ सायाटॉलॉजी अँड सायाटोजेनिक्स या संस्थेचे अध्यक्ष होते.
समीक्षक : नागेश टेकाळे