शिरोडकर , विठ्ठल नागेश : ( २७ एप्रिल १८९९ – ७ मार्च १९७१) विठ्ठल नागेश शिरोडकरांचा जन्म गोव्यातील शिरोडा येथे झाला. मुंबईतील ग्रँट मेडिकल महाविद्यालयातून त्यांनी वैद्यकीय पदवी प्राप्त केली. पुढील शिक्षणासाठी ते युनायटेड किंगडमला गेले. रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्समधून त्यांनी फेलोशिप प्राप्त केली. तेथे त्यांनी मोअर, व्हिक्टर लक, जे. डी. मर्डोक आणि इतर प्राध्यापकांसोबत काम केले. १९३५ साली मुंबईला आल्यानंतर लगेच त्यांची जे. जे. रुग्णालयात मानद स्त्री रोग आणि प्रसूतीतज्ञ म्हणून नेमणूक झाली. त्यांनी सॅमसन राइट यांच्याकडून शिक्षण घेतले.
सर्वसाधारणपणे गर्भारपणाच्या शेवटच्या महिन्यांत गर्भाशय ग्रीवा हळूहळू आत ओढली जाते आणि त्याचे तोंड उघडते. त्यामुळे बाळंतपण सुखरूप होते. परंतु काही स्त्रियांमध्ये ही प्रक्रिया गर्भारपणाच्या सुरुवातीच्या महिन्यांमध्येच होते. यामुळे गर्भपात किंवा मुदतपूर्व प्रसूतीसारख्या गोष्टी घडू शकतात. वि. ना. शिरोडकरांनी हे टाळण्यासाठी एक उपाय शोधून काढला. त्यामध्ये गर्भाशय ग्रीवेवर काही टाके घातले जातात. यामुळे गर्भपात टाळता येतो तसेच मुदतपूर्व प्रसूती व त्याचा परिणाम म्हणून बाळाला होणारे वेगवेगळे आजार किंवा मृत्यू यालाही आळा बसतो. या टाक्याला ‘शिरोडकर स्टिच’ असे नाव दिले गेले आहे. १९५५ साली वि. ना. शिरोडकरांनी सर्वप्रथम याचा प्रयोग केला.
या तंत्रात गर्भारपणाच्या १२ ते १४ व्या आठवड्यादरम्यान गर्भाशय ग्रीवेभोवती टाके घातले जातात. रुग्णाला स्थानिक भूल (Local Anesthesia) दिली जाते. हे टाके कायमस्वरूपी असतात त्यामुळे नंतर सिझेरियन शस्त्रक्रियेने बाळंतपण करावे लागते. इतर अनेक डॉक्टरांनी या पद्धतीत थोडे बदल केले परंतु वि. ना. शिरोडकरांची पद्धत शल्यचिकित्सेचा एक उत्कृष्ट नमूना आहे. तर मॅकडोनाल्ड यांच्या पद्धतीत टाके बाळंतपणाच्या वेळी काढले जातात आणि विनासायास बाळंतपणही होऊ शकते.
योजनाबद्ध रितीने केलेल्या साधारण ८० ते ९० टक्के शस्त्रक्रिया यशस्वी ठरतात, परंतु गंभीर परिस्थिती ओढवल्यास ४० ते ६० टक्के यश मिळते. यशस्वी शस्त्रक्रिया म्हणजे पूर्ण मुदतीपर्यंत (३७ आठवडे) गर्भ अबाधित राहणे.
या तंत्राचा शोध लावून वि. ना. शिरोडकरांनी स्त्री रोग आणि प्रसूतीशास्त्राच्या नकाशात भारताला एक मानाचे स्थान मिळवून दिले.
या शस्त्रक्रियेव्यतिरिक्त शिरोडकरांनी प्रोलॅप्सची दुरुस्ती (Prolapse Repair), फेलोपियन ट्यूबची दुरुस्ती (Tuboplasty), नवीन योनीमार्गाची निर्मिती (Neovagina), इत्यादीच्या तंत्रामध्येही काही बदल केले.
शिरोडकर प्रत्येक गोष्टीचे चिकित्सक वृत्तीने खोल परीक्षण करत. एखादे चुकीचे तंत्र किंवा एखाद्या तंत्रातील कमतरता जाणवल्यास त्याचा जास्त अभ्यास करून सुधारण्यासाठी इतर डॉक्टरांना ते प्रोत्साहित करत. अशा चौकस वृत्तीमुळेच काही स्त्रियांमध्ये वारंवार गर्भपात का होत असावा व तो टाळण्यासाठी काय करता येईल याचा अभ्यास करून त्यांनी शिरोडकर स्टिचचा शोध लावला. यासाठी लागणारी उपकरणे तयार करण्यामध्ये सुद्धा त्यांनी आपल्या अभियांत्रिकी ज्ञानाचा उपयोग केला.
शिरोडकरांनी कुटुंब नियोजन संस्थेची स्थापना केली. गर्भपातविषयक शांतीलाल शाह समितीचे ते सदस्य होते. भारत सरकारने १९६० मध्ये पद्मभूषण आणि १९७१ मध्ये पद्मविविभूषण देऊन त्यांना गौरविले.
संदर्भ :
समीक्षक : राजेंद्र आगरकर