सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह एंजिनिअर्स, एस... : (स्थापना – सन १९०५, अमेरिका) सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनियर्स या संस्थेचे एस. ए. ई. हे संक्षिप्त रूप आहे. कालांतराने एस. ए. ई. इंटरनॅशनल असे तिचे नामांतरण करण्यात आले. या संस्थेचे मुख्यालय अमेरिका येथे आहे. स्वयंचलन क्षेत्रातील ज्ञान वृद्धिंगत करणे आणि सदर क्षेत्रामध्ये आधुनिक उपाययोजना करणे हे एस. ए. ई. या संस्थेचे उद्दिष्ट आहे. स्वयंचल अभियंत्यांना एकत्र आणणे आणि त्यांना शिक्षण देणे तसेच स्वच्छ आणि उपयुक्त स्वयंचल पद्धतींचा वापर करणे या मानवतावादी दृष्टिकोनातून एस. ए. ई. ही संस्था कार्य करते.

जागतिक स्तरावरील वैमानिकी तंत्रज्ञान, स्वयंचलन तसेच औद्योगिक वाहननिर्मिती संस्था येथे कार्यरत असलेले अभियंता आणि तंत्रज्ञ एस. ए. ई. या संस्थेशी निगडित आहेत.

एस. ए. ई. ही संस्था औद्योगिक व्यवसायांसाठी प्रमाणे तयार करते. वैमानिकी संशोधनावर ही संस्था भर देते. तसेच स्वयंचलन क्षेत्रामध्ये पर्यावरणपूरकता, सुरक्षितता, इंधन बचत आणि. दळणवळण / परिवहन संकुलन (Traffic congestion) याबाबत मार्गदर्शन करते. सैनिकी (military), द्रुतगती मार्गक्रमित (on-highway) तसेच इतर औद्योगिक वाहनांच्या निर्मितीबाबत तांत्रिक माहिती पुरविते. एखाद्या उत्पादनाचा दर्जा, कार्यदर्शन, सुरक्षितता आणि आर्थिक मूल्य यांबाबत प्रमाणे प्रकाशित करते.

विविध क्षेत्रातील अभियंत्यांना प्रमाणबद्ध कसोट्यांसंबंधी ही संस्था मार्गदर्शन करत असते. शासकीय व खाजगी कंपन्या, संशोधन संस्था व तांत्रिक सल्लागार यांना तंत्रज्ञानातील साधने प्रमाणित करण्यासाठी आणि नवनिर्मिती करण्यासाठी एस. ए. ई. या संस्थेद्वारे व्यासपीठ उपलब्ध होते.

एस. ए. ई. ही संघटना शालेय विद्यार्थ्यांसाठी स्टेम एज्युकेशन (STEM—Science, Technology, Engineering & Math) हा प्रकल्प राबविते. तसेच अभियांत्रिकी क्षेत्रातील महाविद्यालयीन तरुणांसाठी विविध विषयांवरील कार्यशाळा आयोजित करते. तांत्रिक माहितीच्या प्रसारासाठी चर्चासत्रांचे आयोजन करते. तंत्रज्ञानविषयक अनेक प्रकाशने प्रसिद्ध करते. त्यांपैकी काही पुस्तके पुढीलप्रमाणे: SAE International Journal of Transportation Safety, Structural Sandwich Composites, Automotive Applications of Hardware-in-the-Loop (HIL) Simulation इत्यादी. तसेच मासिके आणि तंत्रप्रबंध (Technical papers) देखील प्रसिद्ध करते.

संदर्भ :

  समीक्षक : हेमचंद्र प्रधान