स्टेनहॉस, एडवर्ड आर्थर (७ नोव्हेंबर १९१४ – २० ऑक्टोबर १९६९) एडवर्ड आर्थर स्टेनहॉस यांचा जन्म मॅक्स, नॉर्थ डॅकोटा येथील येथे झाला. तरुण वयात एडवर्ड यांनी वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय केले. अगदी छापखान्यात हस्तपत्रके छापण्याचे कामही एडवर्ड यांनी केले ते स्थानिक बातमीपत्राचे संपादकही होते. धार्मिक, राजकीय व सामाजिक समस्यांवरील चर्चेत ते सहभागी होते.

एडवर्ड यांना लहानपणापासून वाचनाची आवड लागली. डार्विन व हक्स्ले यांच्या पुस्तकातून एडवर्ड यांना विज्ञानात गोडी वाटू लागली. त्यांना वाचनाबरोबर गायन, वादन आणि चित्रकला यांचीही आवड होती. १९३२ साली स्टेनहॉस यांनी दक्षिण डॅकोच येथील कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यांना सूक्ष्मजंतूशास्त्र व कीटकांच्या अभ्यासत रस वाटू लागला. १९३६ मध्ये कृषी महाविद्यालयातून त्यांनी पदवी प्राप्त केली. १९३९ मध्ये सूक्ष्मजंतू व कीटकशास्त्रात पीएच्.डी. संपादन केली. यानंतरचे त्यांचे संशोधन त्यांनी कीटकांच्या सूक्ष्मजंतूवर केंद्रित केले. याचवेळी जागतिक पातळीवर लोकसंख्यावाढ व अयोग्य पद्धतीने होणाऱ्या पर्यावरणाचा ऱ्हास तसेच कीड समस्या या विषयावर महत्त्वपूर्ण चर्चा होत होती. याच काळात कीटकांच्या नियंत्रणासाठी जंतूंच्या वापराचे कितीतरी अयशस्वी प्रयत्न झाले. याविषयांवर संशोधन करणारे शास्त्रज्ञ फारच कमी होते. स्टेनहॉस यांनी कीटक व जंतू यांच्या संशोधनावर भर दिला. १९४० साली त्यांनी याच विषयावर शोधनिबंध प्रकाशित केला. १९४६ मध्ये ‘कीटकांचे सूक्ष्मजीवशास्त्र’ (Insect Microbiology) या पुस्तकाचे त्यांनी लेखन केले. स्टेनहॉस अमेरिकेच्या मॉनटाना येथील सार्वजनिक आरोग्य केंद्रात रूजू झाले.

बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात १९४४ मध्ये खऱ्या अर्थाने त्यांची वैज्ञानिक कारकीर्द सुरू झाली. येथे जीवाणूशास्त्र विभागात त्यांनी काम केले. त्यानंतर ते स्टेनहॉस कीटकविकृतिशास्त्र विषयाचे सहयोगी प्राध्यापक झाले. १९६२ मध्ये कॅलिफोर्निया विद्यापीठात स्कूल ऑफ बायॉलॉजीकल सायन्सेसचे ते अधिष्ठाता झाले. त्यांनी १५० हून अधिक लेख लिहिले. यात प्रामुख्याने कीटकांच्या जीवाणू, विषाणू, बुरशी आणि आदीजीवांमुळे होणाऱ्या रोगांचा अभ्यास होता. १९४६ मध्ये Insect Microbiology आणि Principles of Insect Pathology या दोन पुस्तकांचे त्यांनी लेखन केले. अनेक शोधनिबंध प्रकाशनाबरोबरच स्टेनहॉस जर्नल ऑफ इनव्हर्टीब्रेट पॅथॉलॉजीचे संस्थापक संपादक होते.

स्टेनहॉस यांनी सर्वप्रथम विषाणूंच्या फवाऱ्याने कीटकांचे नियंत्रण करता येते हे दाखविले. अल्फा–अल्फाच्या अळीवर न्युक्लीअर पॉलिहोड्रल विषाणूचा वापर केला गेला. बॅसिल थुरिनजिएनसीस  हा जीवाणू जरी अनेक वर्षापासून माहित होता तरी त्याचा वापर कीटकनियंत्रणासाठी करण्याचे सर्वश्रेय स्टेनहॉस यांना जाते. त्यांच्या संशोधनाने कितीतरी कीटक व किडीच्या नियंत्रणाचे पुरावे दिले. याच जंतूची आता मोठ्याप्रमाणात उत्पादन व विक्री होत आहे. आणि हे एक निवडक जैविक कीटकनाशक मोठ्याप्रमाणावर वापरले जाते. त्यालाच आता आपण BT (Bacillus thuringiensis) म्हणून ओळखतो.

स्टेनहॉस १९५९ मध्ये फाऊंडर्स मेमोरिअल पारितोषक मिळविणारे पहिले कीटकशास्त्रज्ञ बनले. १९६२ मध्ये दक्षिण डॅकोटा स्टेट विद्यापीठ नेत्यांना मानद पदवी बहाल केली. १९६३ मध्ये त्यांनी पॅरिस येथे दुस-या आंतरराष्ट्रीय इन्सेक्ट पॅथॉलॉजी काँग्रेसला संबोधित केले. ते भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान सोसायटी तसेच सोविएत रशियाच्या कीटकशास्त्र सोसायटीचे मानद सदस्य होते.

संदर्भ :

समीक्षक : रंजन गर्गे