प्रसूती व स्त्रीरोग परिचर्येचा प्रवास हा मानवाच्या उत्पत्तीपासून सुरू झालेला आहे. जागतिक स्तरावर पुरातत्व शास्त्राच्या अभ्यासासाठी केलेल्या उत्खननात प्रसूती दरम्यान मातेला धीर देताना सोबत असलेल्या मदतनीस स्त्रीचे अवशेष आढळून आलेले आहेत.

प्राचीन भारतात मुख्यत: प्रसूती ही अशिक्षित निम्नस्तरावरील स्त्रियांकरवी केली जात असे. अशा प्रकारच्या प्रसूतीमुळे तसेच प्रसूती दरम्यान ओढावणार्‍या गुंतागुंतीमुळे मातामृत्यू व नवजात अर्भक मृत्यूचे प्रमाण अधिक असे आणि म्हणूनच त्याकाळी जवळजवळ ०२ लाख मातामृत्यू हे प्रसूती किंवा प्रसूतीदरम्यान उद्भभवणार्‍या गुंतागुंती व गरोदरपणाशी निगडीत आजारांमुळे होत असत. लंडनमधील इंडिया ऑफिस स्थीत दस्तऐवजामध्ये १८१५ च्या नोंदीत वैद्यक शास्त्रातील अग्रणी डॉ. आयडा स्कडर यांनी भारतात केवळ प्रसूतीदरम्यान आवश्यक वैद्यकीय साहाय्य न मिळाल्यामुळे तीन मातांचा मृत्यू झालेला पाहिल्याची नोंद आढळते. भारतात सक्रिय संस्थाद्वारे एन्जलस कम्यूनिटी ऑफ सिस्टर्स इन इंडिया यांच्या सहकार्याने १८७७ मध्ये जनाना मिशनरी सोसायटी यांचे मार्फत  रीतसर प्रसूतिविद्या प्रशिक्षण शाळेची स्थापना करण्यात आली.

जनाना मिशनरी सोसायटीद्वारे १८९९ मध्ये पहिल्या परिचर्या प्रशिक्षण शाळेची सुरुवात झाली. तर १९०२ मध्ये मध्यवर्ती मिडवाईफ बोर्डाची स्थापना झाली. सन १९०८ मध्ये ट्रेण्ड नर्सेस असोसिएशनची स्थापना झाली. १९८६ मध्ये जनरल नर्सिंग व मिड वायफ्री प्रशिक्षणाचा अंतर्भाव करण्यात आला व त्यामुळे पूर्वी असलेल्या मिडवायफ्रीचे अस्तित्व नष्ट झाले.

आजमितीस भारतात, भारतीय परिचर्या परिषदेद्वारा प्रमाणित केलेल्या अभ्यासक्रमानुसार ऑक्झिलरी नर्स मिडवायफ्री (ANM), जनरल नर्सिंग व मिडवायफ्री (GNM), ऑबस्टेट्रिकल अँड गायनोकॉलॉजिकल नर्सिंग, एम. एस्सी. नर्सिंग या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण घेतलेल्या परिचारिकांद्वारे गरोदर मातांना प्रसूतिपूर्व, प्रसूती दरम्यान व प्रसूतीनंतर सेवा तसेच गर्भपातादरम्यान व तद्नंतर सेवा पुरविल्या जातात. ह्या सर्व बाबींचा परिचर्या प्रसविका प्रशिक्षणात समावेश केला जातो. परंतु भारतात प्रसूतिविद्या व प्रसविका या शाखेला स्वतंत्र व्यावसायिक दर्जा मिळालेला नाही.

संदर्भ :

  • Dileep Malvankar, At all Strengthening Midwifery Services (Report).