हरिवरदा ओवीबद्ध असून (एकूण ४२,४८७ ओव्या) त्यातील ओवी एकनाथांच्या ओवीसारखी साडेचार चरणी आहे. भागवताच्या दशमस्कंधावरील श्रीधरी टीकेचा मुख्य आधार ह्या ग्रंथासाठी घेण्यात आला असून तसे ग्रंथात नमूदही केले आहे. अर्थात, इतरही अनेक टीकांचे सार त्यात आणले आहेच. कृष्णदयार्णवाची काव्यरचना काही ठिकाणी पाल्हाळिक झाली असली, तरी अनेक ठिकाणी वेधक वर्णनांनी नटलेली आहे. ह्या ग्रंथातून त्यांंच्या विद्वत्तेचाही प्रत्यय येतो. आपल्या ग्रंथात फार्सी-अरबी शब्दांचा प्रवेश होऊ नये म्हणून त्याने अनेक संस्कृत प्रतिशब्द घडविले. हा संपूर्ण ग्रंथ आता आठ खंडांत प्रसिद्ध झालेला आहे (१९५५–६१). ह्याशिवाय तन्मयानंदबोध, चिन्मयानंदबोध हे श्लोकबद्ध लहान ग्रंथ, सु. १५० पदे, ६५ स्फुट कवने, काही अभंग व मुकुंद राजावरील एक आरती अशी त्याची रचना उपलब्ध आहे. दत्तजननोत्साहवर्णन, विचारचंद्रिका, सिद्धान्तसार, शिवरात्रिकथा अशी काही ग्रंथरचना कविकाव्यसूचिकार चांदोरकर कृष्णदयार्णवाच्या नावावर देतात. त्याचे एक गीतासार असल्याचे डॉ. शं. गो. तुळपुळे सांगतात. सदर ग्रंथांपैकी दत्तजननोत्साहवर्णन हा ग्रंथ कृष्णदयावर्णाचा नसून त्याचा शिष्य उत्तमश्लोक ह्याचा असल्याचे आता अधिक संशोधनान्ती दिसून आले आहे.
संदर्भ :
- https://cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/aurangabad/chap19/PAITHAN.htm
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.