टिसूर, फ्रॅंक्वा : 

टिसूर यांनी फ्रान्समधील सेंट एटिन (St. Etinne) विद्यापीठातून १९९३ मध्ये गणिती अभियांत्रिकीमधील स्नातक पदवी मिळवली. १९९७ मध्ये मारियो आह्यूस (Mario Ahues) आणि ॲलन लार्गिलर (Alain Largillier) यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संख्यात्मक विश्लेषणात (Numerical Analysis) डॉक्टरेट मिळवली. सध्या त्या ब्रिटनमधील Manchester Institute of Mathematical Sciences या संस्थेच्या संचालक आणि मँचेस्टर विद्यापीठात संख्यात्मक विश्लेषणाच्या प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

बीजगणितातील बहुपदी उचितमूल्य समस्या (Polynomial Eigen value Problems), अरेषीय उचितमूल्य समस्या आणि संरचितसारणी समस्या यातील संशोधनाइतकेच टिसूर यांचे संगणक क्षेत्रातील संशोधनही महत्त्वपूर्ण ठरले आहे. बहुपदी उचितमूल्य समस्या, विज्ञान तसेच अभियांत्रिकीच्या उपयोजितांमध्ये विपुलतेने आढळतात. टिसूर यांनी अशा प्रकारच्या समस्या सोडविण्यासाठी एक अनुपद्धती (derivation) विकसित करून या विषयात मूलभूत योगदान दिले. त्यांनी शोधलेल्या रूपांतरणाच्या नव्या गटामुळे, संख्यात्मक तंत्रांनी अशा तऱ्हेच्या समस्या थेट सोडवणे शक्य होऊ लागले.

सार्वत्रिक अरेषीय उचितमूल्य समस्यांवरही टिसूर यांनी महत्वपूर्ण संशोधन केले. त्यांनी अरेषीय भागाच्या गतिशील निकटनावर रेषीय उचितमूल्य समस्येचा वापर करून नवे तंत्र विकसित केले. तसेच पन्नासहून अधिक अरेषीय उचितमूल्य समस्यांची उकल करणारा MATLAB (Matrix Library) हा संगणकीय आज्ञावली तंत्र-संचदेखील त्यांनी इतर गणितींच्या सहाय्याने निर्माण केला. त्यांच्या या संग्रहात वास्तव जीवनातील समस्यांवर आधारित उपयोजितांबरोबरच, ठराविक गुणधर्म असणाऱ्या विशिष्ठ समस्यांचाही समावेश आहे. बहुपदी उचितमूल्य समस्यांचे आणि त्यांच्या संरचनीय गुणधर्मांनुसार वर्गीकरण त्यांनी यात दिलेले आहे. व्दिपदी (Quadratic) उचितमूल्य समस्येची उपयोजिते, त्यांचे गणितीय गुणधर्म तसेच ती सोडवण्यासाठी संख्यात्मक तंत्रे यासाठी टिसूर यांचे संशोधन अतिशय उपयुक्त ठरले आहे.

संरचित सारणी समस्या (Structured Matrix problems) या क्षेत्रातीलही टिसूर यांचे कार्य उल्लेखनीय आहे. ‘न’ कोटिकेच्या सारणींमधील, ‘म’ घाताच्या बहुपदींचे उचितमूल्य काढण्याची प्रचलित पद्धत म्हणजे या सारणींचे रेषीयकरण करून त्यांना ‘म x न’ कोटिकेच्या रूपात आणणे ज्यायोगे (दिलेली) उचितमूल्य समस्या सोडवता येते. टिसूर यांनी इतर गणितींसह, या पद्धतीतील त्रुटी दूर करून अधिक प्रभावी तंत्र विकसित केले.

टिसूर व त्यांच्या सहकाऱ्यांनी, संख्यात्मक रेषीय बीजगणितातील समस्यांसाठी, LAPACK (Linear Algebra Package), ScaLAPK (Scalable LAPACK) आणि MATLAB (Matrix Library) यांसारखी संगणक आज्ञावलींची फळी (Software Libraries) विकसित केली. अलीकडेच त्यांनी सारणीफलांसाठी ही (Matrix Functions) गणिती संगणक आज्ञावली (Mathematical Software) विकसित केली आहे.

टिसूर यांनी स्वतंत्रपणे तसेच इतर गणितींसह सव्वाशेहून अधिक शोधलेख लिहिले आहेत.  SIAM Journal on Matrix Analysis and Applications; I. M. A. (Institute of Mathematics and its Applications) Journal of Numerical Analysis आणि The Electronic Journal of Linear Algebra यासारख्या मान्यवर नियतकालिकांच्या संपादकीय मंडळाच्या त्या सभासद आहेत. त्यांना २०११-१६ दरम्यान EPSRC (Engineering and Physical Sciences Research Council) तर्फे नेतृत्व सहभागिता (Leadership fellowship) प्रदान करण्यात आली होती.

टिसूर यांना मिळालेले काही उल्लेखनीय पुरस्कार म्हणजे ‘व्हाईटहेड’ (Whitehead) पुरस्कार, ‘ॲडम्स’(Adams) पुरस्कार आणि ‘रॉयल सोसायटी वुल्फसन रिसर्च मेरिट’(Royal Society Wolfson Research Merit) पुरस्कार. त्यांना ICIAM (International Council for Industrial and Applied Mathematics) तर्फे २०१९ मधील स्पेन येथील परिषदेत व्याख्याता म्हणून आमंत्रित केले गेले. जून २०१९ मध्ये संख्यात्मक रेषीय बीजगणितावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत त्या अध्यक्ष म्हणून निवडल्या गेल्या. बीजगणितातील समस्यांसाठी आधुनिक संगणकीय तंत्रांचा सुलभ वापर आणि त्यांचा प्रसार, हे टिसूर यांच्या संशोधनाचे वैशिष्ट्य आहे.

संदर्भ :

 समीक्षक : विवेक पाटकर