त्सिमेरमन, जे. : ( २६ एप्रिल १९८८ )
जॅकोब त्सिमेरमन यांचा जन्मर शियातील कझान येथे झाला आणि शिक्षण कॅनडामध्ये झाले. तेथील टोरोंटो विद्यापीठातून त्यांना पदवी मिळाली. अमेरिकेतील न्यूजर्सी येथील प्रिन्सटन विद्यापीठातून प्रा. पीटरसार्नक यांच्या मार्गदर्शनाखाली ‘Towards an Unconditional Proof of the Andre-Oort conjecture and Surrounding Problems’ या प्रबंधावर त्यांना डॉक्टरेट मिळाली. त्यानंतर तीन वर्षे हॉर्वर्ड विद्यापीठात फेलोशिप केल्यानंतर, ते कॅनडातील टोरोंटो विद्यापीठात सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
त्सिमेरमन यांचे संशोधन कार्य शुद्ध गणितातील टोकाच्या प्रगत विषयांवर आहे. आंद्रे–ऊर्त अटकळ (Andre-Oort Conjecture) ही अंकशास्त्राच्या डायफंटाइन (Diophantine) समस्यांमधील एक खुली समस्या होती. त्यात शिमुरा (Shimura) जातीतील विविध प्रकारांच्या वर्गीकरणाचा प्रयत्न केला आहे. बैजिक वक्रावरील बहु-संरचित असे सीएम (CM- complex multiplication) बिंदू सदर अटकळीचा गाभा आहेत. त्सिमेरमन यांनी शिमुरा जातीतील याच बिंदूंच्या समुदायांचा उपयोग करून, इतर जातींपासून शिमुरा जातींचे विकलन करण्याचा मार्ग शोधला आणि प्रदीर्घ काळ प्रलंबित अशीही अटकळ एका विशिष्ट प्रकारासाठी सिद्ध केली. त्यांनी, ऑस्ट्रेलियन गणिती जोनाथन पिला यांच्यासह, ह्या अटकळीचे प्रात्यक्षिक सीगल एकमापांकी फलांसाठी दिले. तसेच ही संपूर्ण अटकळ आबेली जातींच्या सर्व एकमापांकी अवकाशांसाठी सिद्ध केली.
अबैजिक अंकशास्त्रातील, ॲक्स-शेन्यूल प्रमेयावर (Ax-Schanuel theorem) त्सिमेरमन यांनी इतर गणितींसह मौलिक संशोधन केले आहे. त्सिमेरमन आणि पिला या दोघांनी मिळून फलाच्या अबैजिकतेविषयीचे विधानजे (j’ फलासाठी सिद्ध केले. हे विधान, घातांक फल संबंधित ॲक्स-शेन्यूल सिद्धांताचे सादृश्य दर्शक आहे.
त्सिमेरमन, पिला आणि अमेरिकन गणिती मॉक या तिघांनी मिळून वरील सिद्धांताच्या पायाभूत आवृत्तीचे, शुद्ध शिमुरा जातीसाठी व्यापकीकरण केले. ते (एखाद्या) परिबद्ध, हर्मिटी, सममिती अवकाशाकडून, शिमुरा जातीकडे (करण्यात येणाऱ्या) एकसमान प्रतिचित्रणाच्या अबैजिकतेविषयी आहे. बैजिक भूमितीमधील ॲक्स-लिंडमन (Ax-Lindemann) सिद्धांतावर आधारित, मौलिक संशोधनही त्सिमेरमन आणि पिला यांनी केले आहे.
त्सिमेरमन यांचे स्वतंत्रपणे तसेच वेगवेगळ्या गणितींबरोबर, २०११ ते २०१९ या काळात एकूण अडतीस शोधलेख प्रकाशित झालेत.
त्सिमेरमन यांना इंटरनॅशनल मॅथेमॅटीकल ऑलिम्पियाडमध्ये (आय.एम.ओ.) दोनदा सुवर्णपदक, स्लोन (Sloan) फेलोशिप, सास्रा रामानुजन पुरस्कारही प्राप्त झाला. ज्याच्यासाठी गणितीचे वय ३२ पेक्षा अधिक असू नये अशी अट आहे. त्सिमेरमन यांना कोक्सेटर-जेम्स (Coxeter-James) पुरस्कार देऊनही गौरविण्यात आले.
संदर्भ :
- http://news.artsci.utoronto.ca/all-news/rising-stars-jacob-tsimerman/
- http://qseries.org/sastra-prize/2015.pdf
- https://www.researchgate.net/scientific-contributions/30391952_Jacob_Tsimerman
समीक्षक : विवेक पाटकर