टिंडाल, जॉन :  ( २ ऑगस्ट १८२० – ४ डिसेंबर १८९३ ) 

जॉन टिंडाल या भौतिकशास्त्रज्ञाचा जन्म लीलीनब्रिज काउंटी कार्लो, आयर्लंड (Leighlinbridge, County Carlow, Ireland) येथे झाला. त्यांचे शिक्षण स्थानिक शाळेमध्ये झाले. तांत्रिक आरेखन  (technical drawing) आणि गणित हे त्यांचे शाळेतील आवडते विषय. पहिली तीन वर्षे त्यांना रेल्वे बांधकाम नियोजन खात्यात नोकरी मिळाली. त्यानंतर जॉन टिंडाल यांची गणितज्ञ म्हणून हँम्पशायर येथील क्वीनवूड महाविद्यालयात निवड झाली. त्यानंतर त्यांची ओळख एडवर्डफ्रांकलँड (Edward Frankland) सोबत झाली आणि ते दोघे चांगले मित्र बनले. १८४८ मध्ये दोघेही जर्मनीला पुढील शिक्षण घेण्यासाठी युनिव्हर्सिटी  ऑफ मरबुर्ग (University of Marburg) येथे गेले.

चौदा वर्षे ते रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ ग्रेट ब्रिटन येथे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. जॉन टिंडाल यांनी चुंबकशास्त्र  (Magnetism) आणि डायमॅग्नेटिक पोलारिटी (Diamagnetic polarity) वर प्रयोग केले. या काळात टिंडाल यांनी हवेतील घटकावर उत्सर्जित उष्णतेचा प्रभाव (radiant energy) या विषयावर देखील अभ्यास केला ज्यामुळे त्यांना बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळाली. यालाच मुख्यत्वे करून अवरक्त किरणे (infrared radiation) म्हणूनही ओळखले जाते. त्यांनी एक मोजणी यंत्र तयार केले जो Absorption Spectroscopy of gases च्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. नायट्रोजन, ऑक्सिजन, पाण्याची वाफ, कार्बन-डायऑक्साइड, ओझोन, मिथेन इ. वायुंची तौलनिक अवरक्त किरणे शोषण्याची शक्ती  (Relative Infrared Absorptive power) मोजण्यासाठी याचा वापर केला. त्यांनी असेही नमूद केले की पाण्याची वाफ वातावरणातील उत्सर्जित उष्णतेमुळे शोषली जाते आणि हवेतील तापमान नियंत्रित करते. तसेच हवेमधील इतर वायूचे शोषण तुलनेने कमी प्रमाणात होते. पृथ्वीवरील वातावरणात हरितगृह परिणाम आहे हे सांगणारे ते पहिले शास्त्रज्ञ होय. अवरक्त किरणांच्या शोषणामुळे (absorbed infrared radiation) पाण्याची वाफ होते, हे त्यांनी सांगितले. १८८० पर्यंत इन्फ्रारेड हा शब्द वापरामध्ये आला नाही त्या ऐवजी रेडिअंट हिट किंवा अल्ट्रा-रेड म्हणून संबोधले जात होते. त्यांनी Contributions to Molecular Physics in the Domain of Radiant Heat  या नावाने ४५० पानांचा ग्रंथ प्रकाशित केला. हवा, इतर वायू आणि पातळ पदार्थांमध्ये असणारे अतिसूक्ष्म कण अशुद्धीमुळे प्रकाशामध्ये विखुरणाऱ्या प्रभावाला टिंडल प्रभाव (Tyndall Effect) किंवा टिंडल प्रसारण (Tyndall Scattering) या नावाने ओळखतात. निर्जंतुक माध्यमात जंतूंचा प्रादुर्भाव याच अशुद्ध अतिसूक्ष्म कणांमुळे होतो हे सूक्ष्मजीवशास्त्रातील तत्त्व टिंडल प्रभावामुळे सिद्ध झाले. बायोजेनेसीसच्या सिद्धांताला म्हणजेच जीवाची निर्मिती जीवापासून होते या सिद्धांताला टिंडल प्रभावामुळेच मान्यता मिळाली. मानवी श्वासामध्ये असणारा कार्बन-डायऑक्साईड मोजण्यासाठी त्यांनी एक यंत्र तयार केले त्याला ‘टिंडल पद्धत’ (Tyndall System) असे म्हणतात.

जॉन टिंडाल यांचे १४७ शोध निबंध प्रकाशित झाले. जॉन टिंडाल यांची १२ पुस्तके सुद्धा प्रकाशित आहेत. त्यांना रॉयल पदक व रुफोर्ड पदकाने सन्मानित करण्यात आले.

जॉन टिंडाल यांचा हसलमेरे सरे इंग्लंड (Haslemere, Surrey, England) इथे मृत्यू झाला.

समीक्षक : रंजन गर्गे