वासरमन, लॅरी ए. : वासरमन यांचा जन्म विंडसर, ओंटारिओ येथे झाला. कॅनेडियन संख्याशास्त्रज्ञ लॅरी ए. वासरमन यांनी युनिवर्सिटी ऑफ टोरोंटोमधून १९८८मध्ये ‘Belief Functions’ या प्रबंधावर डॉक्टरेट मिळवली.
वासरमन खगोल-संख्याशास्त्रात कृष्ण-ऊर्जा परिस्थितीच्या समीकरणाचा अनुमान करण्यासाठी प्रतिमाने विकसित करत आहेत. तसेच विकिर्ण पृष्ठभूमी असलेले वैश्विक सूक्ष्म-तरंगांचे विश्लेषण करत आहेत. आधारसामग्रीतील संरचनेसाठी आवश्यक असे संस्थितिक (Topological) आधार-सामग्री विश्लेषण या नव्या क्षेत्रातही ते कार्यरत आहेत. खगोलशास्त्रात या प्रकारच्या पुंजीकरणाचा विश्वातील सूत्रे शोधण्यास उपयोग होतो.
वासरमन संख्याशास्त्र आणि मशीन लर्निंग यातील समानतेवर भर देतात कारण त्यांच्या मते जरी त्या विषयांच्या कार्यपद्धती वेगळ्या असल्या तरी आकडेवारीचा सुसंगत अर्थ लावणे हेच त्यांचे मूळ ध्येय आहे. तरी संख्याशास्त्र आणि मशीन लर्निंग एकमेकांना असे पूरक आहेत, असे ते मानतात. मोठ्या आधार-सामग्रीच्या (Big data) या युगात याला अतिशय महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण हे दोन्ही उच्च-मितीय समस्या सोडवण्यासाठी आधार-सामग्रीचे विश्लेषण करतात. वासरमन यांनी त्यात नव्या पद्धती आणि सिद्धांत दिले आहेत. उदा., अनेक चलांमधील संबंधांचा एकसामयिक अनुमान करण्यासंबंधीचा सिद्धांत, तसेच व्यामिश्र आधार-सामग्रीच्या संचातील सूक्ष्म अवकाशी संरचना शोधण्याचा सिद्धांत.
वासरमन यांनी संख्याशास्त्रीय संस्थिति (Statistical Topology), आलेखीय प्रतिमान (Graphical Models), अर्धपर्यवेक्षित अनुमान (Semisupervised Inference), भविष्यवाणीची पुष्टी (Prediction Confirmation) आणि विकलनाची गोपनीयता (Differential Privacy) या विषयांवरही काम केले आहे.
ते १२५ पेक्षा जास्त शोधलेखांचे लेखक किंवा सहलेखक आहेत. त्यांमध्ये अप्राचल अनुमान (Non–parametric Inference), लक्षणानुरूप नसलेला सिद्धांत (Asymptotic Theory), कार्यकारणभाव आणि खगोलभौतिकशास्त्र, आनुवंशिकताशास्त्र यात संख्याशास्त्राचा उपयोग यांचे विवेचन आहे.
संख्याशास्त्राचा पाया आणि आधुनिक संख्याशास्त्रातील वेगवेगळे विषय जसे, नमुनाचयन, मिश्र प्रतिमाने, बहुपरीक्षण, गुडनेस ऑफ फिट आणि दोन्ही अप्राचली आणि कार्यकारणभाव असलेले अनुमान यांत त्यांनी लक्षणीय भर घातली आहे.
त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांपैकी दोन पाठ्यपुस्तके विशेष गाजली आहेत : All of Statistics, या पुस्तकासाठी त्यांना डिग्रुट पारितोषिकाने (DeGroot Prize) सन्मानित करण्यात आले आणि All of Non-Parametric Statistics.
द जर्नल ऑफ अमेरिकन स्टॅटिस्टिकल सोसायटी आणिॲनालस ऑफ स्टॅटिस्टिक्स या दोन प्रतिष्ठित जर्नल्सचे वासरमन उपसंपादक आहेत.
ते अमेरिकन स्टॅटिस्टिकल असोसिएशन, इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिकल स्टॅटिस्टिक्स आणि अमेरिकन असोसिएशन फॉर द अडव्हान्समेन्ट ऑफ सायन्सचे फेलो आहेत. २०१६ मध्ये त्यांची अमेरिकेच्या नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसमध्ये सदस्य म्हणून निवड झाली.
त्यांच्या योगदानाचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांना कमिटी ऑफ प्रेसिडेन्टस् ऑफ स्टॅटिस्टिकल सोसायटीतर्फे प्रेसिडेन्ट अवॉर्ड देण्यात आले. तसेच Centre de recherché Mathematiques de Montreal-Statistical Society of Canada ने पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान केला.
संदर्भ :
- https://www.cs.cmu.edu/news/larry-wasserman-elected-national-academy-sciences
- http://www.crm.umontreal.ca/prix/prixCRM-SSC/2002_CRM-SSC_an.html
- https://projecteuclid.org/euclid.aos/1400592166
समीक्षक : विवेक पाटकर