कोउ, सॅम्युअल : (१९७४ -) सॅम्युअल कोउ यांचे बालपण चीनमधील लांझ्हाउ या अतिदुर्गम डोंगराळ भागात गेले. माध्यमिक शाळेत कोऊ यांनी गणित व पदार्थ विज्ञान विषयात विशेष प्राविण्य मिळवले.
पेकिंग विद्यापीठातून कोउ यांनी संगणकीय गणित विषयात पदवी मिळवली. स्टॅनफोर्ड विद्यापीठातून कोउ यांनी एम.एस्सी. व प्रा. ब्रॅडले एफ्रॉन यांच्या मार्गदर्शनाखाली ‘Extended Exponential Criterion: A New Selection Procedure for Scatterplot Smoothers’ या प्रबंधावर पीएच्.डी. पदवी मिळवली.
कोउ स्टॅनफोर्ड विद्यापीठात सहाय्यक शिक्षक म्हणून काम करत होते. नंतर ते हार्वर्ड विद्यापीठात संख्याशास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्य करत होते. त्याच विद्यापीठात निसर्ग विज्ञानाचे जॉन एल. लोएब यांचे सहयोगी प्राध्यापक म्हणून कोउ यांनी तीन वर्षे काम पहिले. २००८ पासून कोउ हार्वर्ड विद्यापीठात संख्याशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
मूलभूत आणि उपयोजित संख्याशास्त्र या दोन्हीत कोऊंनी भरीव योगदान केले आहे. प्रसंभाव्य प्रारूपे (Stochasticmodels), बेझियन निष्कर्ष (Bayesianinference), मोंटे कार्लो पद्धती (Monte Carlo methods), अप्राचलीय पद्धती (Nonparametric methods) आणि आर्थिक व वित्तीय नियोजन प्रारूपे तसेच प्रसंभाव्य निष्कर्ष यांचा जैवभौतिकी, रसायनशास्त्र व जीवशास्त्र यांत उपयोजन आणि बिग डेटा विज्ञान अशा प्रगत ज्ञानशाखांत त्यांचे कार्य आहे. त्यांच्या नावावर ५० हून अधिक शोधलेख आहेत.
कोऊ जर्नल ऑफ द अमेरिकन स्टॅटिस्टिकल ॲसोसिएशन, थिअरी अँड मेथडस,ॲनल्स ऑफ स्टॅटिस्टिक्स, स्टॅटिस्टिकलसायन्स, जर्नल ऑफ मल्टीव्हेराइट ॲनालीसीस अशा अनेक प्रतिष्ठित जर्नल्सच्या संपादकीय मंडळाचे सदस्य राहिले आहेत.
कोउ यांना मिळालेले सन्मान असे आहेत, राष्ट्रीय विज्ञान प्रतिष्ठान कारकीर्द पुरस्कार, गणितीय संख्याशास्त्र संस्थेचा रिचर्ड ट्विडी पुरस्कार, रेमंड जे. कॅरोल तरुण संशोधक पुरस्कार, अमेरिकन संख्याशास्त्रिय संघटनेचा संख्याशास्त्राचा उल्लेखनीय उपयोजन पुरस्कार, अमेरिकन अध्यक्षांचा कॉप्स पुरस्कार आणि वेन बाओ चँग पुरस्कार.
त्याशिवाय कोउस्टॅनफोर्ड पदवी स्नातक शिष्यवृत्ती, स्नातक, अमेरिकन संख्याशास्त्र संघटना, स्नातक, गणितीय संख्याशास्त्र संस्था आणि स्नातक, गुगेन्हाईम यांचे मानकरी होते.
संदर्भ :
- people.fas.harvard.edu/~skou/
- https://statistics.fas.harvard.edu/people/sc-samuel-kou
- https://datascience.harvard.edu/affilliations/statistics
समीक्षक : विवेक पाटकर
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.