वेल्लर, थॉमस हकल : (१५ जून, १९१५ ते २३ ऑगस्ट, २००८ ) थॉमस हक्ले  वेल्लर यांचा जन्म अंन आर्बोर, मिच (Ann Arbor, Mich) येथे झाला. आधी मिशिगन विद्यापीठमध्ये प्रवेश मिळविला तेथे त्यांचे वडील कार्ल वेरनॉन वेल्लर हे रोगनिदानशास्त्र विभागात प्राध्यापक होते. पुढे वेल्लर यांनी हार्वर्ड मेडिकल स्कूलमधून पदवीपूर्ण केली. १९४२ मध्ये दुसऱ्या महायुद्धात वेल्लर यांची नियुक्ती आर्मी मेडिकल ऑफिसर म्हणून झाली आणि ते लष्करामध्ये सामिल झाले. त्यानंतर त्यांना संशोधनासाठी विशेषकरून मलेरीयावरच्या नियंत्रणसाठी पुएर्तो रिको मिलीटरी बेस कॅरेबियन (Puerto Rico  Military Base Caribbean) येथे पाठविण्यात आले. ते लष्करी सेवेतून १९४६ साली मेजर या पदावरून  निवृत्त झाले. त्यांनी बोस्टन येथे चिल्ड्रेन हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केले. वेल्लर हे एक अमेरीकन व्हायरॉलाजिस्ट होते. १९४८ मध्ये वेल्लर याची भेट जॉन इन्डरस आणि फ्रेडरिक चॅम्पमन रॉबिन्स याच्याशी हार्वर्ड येथे झाली. या सर्वांनी ऊती संवर्धन (टिश्यु कल्चर) पद्धतीने विषाणुजन्य रोगांचा अभ्यास केला व त्यांनी कांजिण्या आणि गोवर या विषाणुजन्य रोगांवर लस शोधून काढली. त्यामुळे त्याला एन्डर्स रॉबीन वेल्लर पद्धत सुद्धा म्हणतात. त्यांना १९५४ साली  शरीरविज्ञान व वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळाला.

वेल्लर यांनी २००४मध्ये आत्मचरित्र लिहिले व त्यात त्यांनी असे सांगितले की रोग पसरवणारे विषाणू हे ऊतींवर  वाढतात. यांनी कन्जेनायटल रुबेला (Congenital Rubella), जर्मन गोवर यांचा अभ्यास केला. तेव्हा त्यांनी आपला मुलगा रॉबर्ट याचा मूत्र नमुना घेऊनच त्या रोगाचा अभ्यास केला. त्यात त्यांना तीव्र गोवरचे चिन्ह दिसून आले. पुढे त्यांनी तोच नमुना घेऊन सूक्ष्मजीवांचा अभ्यास केला. त्यांनी मूत्र नमुन्यात होणारे रोजचे बदल सूक्ष्मदर्शकाखाली बघितले. सन १९६२ ते सन १९६५ मध्ये रूबेला हा एकाच वेळी सर्वदूर पसरणारा  आजार (Pandemic) म्हणून ओळखला  गेला. त्यामुळे बऱ्याच महिलांचे गर्भपात झाले. ‘विज्ञान जगतातील कोणताही शोध हे एकट्याचे काम नव्हे. योग्य परिणामांसाठी सहकार्यासोबतच काम करावे लागते.’ हे वेल्लर यांचे शब्द आहेत. वेल्लर हे निवृत्तीनंतर सुद्धा हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचे प्राध्यापक होते.

संदर्भ :

समीक्षक : रंजन गर्गे