मोई हा पानझडी वृक्ष ॲनाकार्डिएसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव लॅनिया कॉरोमांडेलिका आहे. तो ओडिना वोडियर अशा शास्त्रीय नावानेही ओळखला जातो. आंबा व काजू हे वृक्षदेखील ॲनाकार्डिएसी कुलातील आहेत. म्यानमार, श्रीलंका व भारत या देशांत मोई वृक्ष आढळतो. भारतात तो सामान्यपणे सर्व पानझडी वनांत, तसेच हिमालयात समुद्रसपाटीपासून सु. १,५०० मी. उंचीपर्यंत दिसून येतो.
मोई वृक्ष मध्यम आकाराचा असून ५–१५ मी. उंच वाढतो. त्यापेक्षा अधिक उंचीचे वृक्ष क्वचित आढळतात. खोड जाडजूड व मजबूत असते. खोडाची साल जाड, करडी व गुळगुळीत असून ती गोलसर तुकड्यांनी गळून पडते. पाने संयुक्त, एकाआड एक, मोठी, २५–४५ सेंमी. लांब व पिसांसारखी असून ती फांद्यांच्या टोकांजवळ झुपक्यांनी येतात. पर्णिका विषम संख्येने, उठावदार शिरा असलेल्या व आकाराने अंडाकार असतात. फुले आंब्यासारख्या मंजिरीप्रमाणे फुलोऱ्यात येतात. ती लहान, एकलिंगी, जांभळट किंवा हिरवट पिवळी व सच्छद असतात. नरफुले व मादीफुले वेगवेगळ्या शाखांवर येतात. दलपुंज ४-५ व सुटी असतात. फळ आठळीयुक्त व एकबीजी असून ते वाटाण्याएवढे असते. नवीन लागवड बिया किंवा कलमे लावून करतात. पक्ष्यांमार्फत बीजप्रसार झाल्यामुळे या वृक्षाची नैसर्गिकरीत्या लागवड घडून येते.
मोईची लागवड हा वनीकरण, वनशेती इत्यादींसाठी एक उत्कृष्ट पर्याय आहे. त्याचे लाकूड टिकाऊ आणि जलरोधी असते म्हणून लाकडाचा उपयोग घरबांधणी, फर्निचर, खोकी तयार करण्यासाठी तसेच होड्या, शेतीची अवजारे, कागद व काडेपेट्या बनविण्यासाठीही होतो. पाने जनावरांना चारा म्हणून उपयुक्त असतात. ती गरम करून शोथावर पोटीस बांधण्यासाठी वापरतात. खोडापासून मिळणाऱ्या पिवळसर डिंकाचा वापर वस्त्रोद्योगात करतात. सालीचा काढा अपचन, खोकला, दातदुखी इत्यादींवर उपयुक्त असतो.