झिंडर, नॉर्टन डेव्हिड ( ७ नोव्हेंबर १९२८ – २ फेब्रुवारी २०१२) नॉर्टन डेव्हिड झिंडर या अमेरिकन जीवशास्त्रज्ञाचा जन्म न्यूयार्क येथे झाला. १९६९ मध्ये त्यांनी विस्कॉनसिन विद्यापीठाची पीएच्. डी. संपादन केली. याच वर्षी ते राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे सदस्य झाले. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी रॉकफेलर विद्यापीठातील प्रयोगशाळेत संशोधनाचे काम केले.

नॉटर्न झिंडर यांनी आर. एन. ए हे जनुकीय तत्त्व असलेला बॅक्टेरिओफाज प्रथमच  शोधून काढला. ते जोश लेडरबर्ग यांचे विद्यार्थी होते. नॉटर्न झिंडर व लेडरबर्ग यांनी बॅक्टेरिओफाजच्या सहाय्याने एका जीवाणूतील जनुके दुसऱ्या जीवाणूंमध्ये कसे जातात हे दाखविले. याच शोधाला जीवाणूतील जनुकीय स्थलांतर (Bacteria Genetic Transduction) असे म्हणतात. म्हणजेच जीवाणूत बॅक्टेरिओफाजमुळे होणारा जनुकीय बदल असे म्हणता येईल. सर्वप्रथम हे प्रयोग साल्मोनेला  या जीवाणूवर करण्यात आले. परंतु त्यानंतर झिंडर यांनी . कोलाय  व वेगवेगळ्या प्रकारच्या जीवाणूंमध्ये जनुकीय बदल करता येतो का याचा शोध लावला. याच बदलांमुळे एकाच प्रकारचे कार्य करणाऱ्या जनुकांची स्थाने जवळ येताना असे दिसले. यालाच ऑपेरॉन (Operon) म्हटले गेले. याच प्रयोगाद्वारे जीवाणूंच्या गुणसूत्रांवर असणाऱ्या जनुकांची सविस्तर माहिती प्रथम झिंडर व लेडरबर्ग यांनी विज्ञान विश्वाला दिली. आर. एन. ए हे जनुकिय तत्त्व असलेला पहिला बॅक्टेरिओफाज शोधण्याचे श्रेय झिंडर यांना जाते.

झिंडर १९८८-९१ मध्ये राष्ट्रीय आरोग्य सल्लागार समितीच्या मानवी जनुकीय प्रकल्पाचे प्रमुख होते. त्यांना मिळालेल्या सन्मानात, राष्ट्रीय विज्ञान अकादमीतर्फे ॲवॉर्ड, अमेरिकेच्या कला व विज्ञान अकादमीचे सदस्य असे होते. १९९३-९५ पर्यंत पदवी व पदवीत्युर विभागाचे ते डीन होते. तर १९९९ मध्ये एमेरीटस शास्त्रज्ञ म्हणून त्यांना लौकिक मिळाला.

लेडरबर्ग, टॉटम आणि जॉर्ज बीडल यांना १९५८ मध्ये ‘जनुकीय पुनर्संघटन (Genetic Recombination) या त्यांच्या महत्त्वपूर्ण संशोधनास नोबेल पारितोषिक प्राप्त झाले. नॉर्टन डेव्हिड झिंडर यांना मात्र नोबेल पारितोषिकापासून वंचित राहावे लागले.

नॉर्टन डेव्हिड झिंडर यांचे न्यूमोनियाच्या आजाराने निधन झाले.

संदर्भ :

समीक्षक : रंजन गर्गे