बर्नेट, सर (फ्रँक) मॅकफार्लेन : (३ सप्टेंबर १८९९ — ३१ ऑगस्ट १९८५).

ऑस्ट्रेलियन वैद्यक, प्रतिरक्षाशास्त्रज्ञ आणि विषाणुविज्ञ. त्यांना उपार्जित प्रतिक्षमताजन्य सह्यता (Acquired immunological tolerance) या शोधाबद्दल १९६० सालातील शरीरक्रियाविज्ञान किंवा वैद्यक या विषयाचे नोबेल पारितोषिक सर पिटर ब्रायन मेडावर (Sir Peter Medawar) यांसोबत विभागून देण्यात आले. उपार्जित प्रतिक्षमताजन्य सह्यता या संकल्पनेतूनच ऊतक प्रत्यारोपणाची निर्मिती करण्यात आली.

बर्नेट यांचा जन्म पूर्व ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया राज्यात, ट्राराल गॉन (Traralgon, Victoria) येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण सरकारी शिक्षण संस्थांमध्ये झाले. बर्नेट यांनी मेलबर्न विद्यापीठातून एम्.बी.बी.एस्. (१९२४) आणि लंडन विद्यापीठातून पीएच.डी. पदवी मिळविली (१९२८). रॉयल मेलबर्न हॉस्पिटलमध्ये संशोधक विकृतीशास्त्रज्ञ म्हणून त्यांनी काम पहायला सुरुवात केली. रॉयल मेलबर्न हॉस्पिटलची मातृसंस्था वॉल्टर ॲण्ड एलिझा हॉल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये विषमज्वरावरील (Typhoid fever) संशोधनास सुरुवात केली (१९४४—६५). बर्नेट यांनी उपचाराना प्राधान्य देऊन विषमज्वरावरील प्रभावी उपचार शोधण्यासाठी विषमज्वर प्रतिक्षमतेचा अभ्यास चालू केला. विषमज्वराने आजारी असणाऱ्यांमध्ये साल्मोनेला टायफी (Salmonella typhi) जीवाणूंविरुद्ध रोग्याचे शरीर प्रतिजने निर्माण करते. रोग्याच्या शरीरातील साल्मोनेला टायफी मारक प्रतिजने आणि साल्मोनेला टायफी जीवाणूंच्या पेशीपटला बाहेरील पृष्ठभागावरील प्रथिनांच्या समूहन (agglutination) क्रिया कशी होते हे त्यांना शोधायचे होते

बर्नेट यांनी लंडनमधील लिस्टर इन्स्टिट्यूट ऑफ प्रिव्हेंटीव्ह मेडिसीनमधून जीवाणुशास्त्रात (bacteriology) एम.डी. पदवी मिळवली. जीवाणुशास्त्रात काम करताना त्याना बॅक्टेरिओफाज (Bacteriophase) जातीच्या विषाणूंबद्दल (bacteriophages) आकर्षण निर्माण झाले. आयुष्याची साठपेक्षा अधिक वर्षे त्यांनी संसर्गजन्य रोग, त्यांच्याशी संबंधित रोगजंतू, रोगनिर्मिती प्रक्रिया, तसेच प्रतिक्षमता यांच्यावर प्रयोग करण्यात व्यतीत केली. त्यातील सुमारे तीस वर्षे त्यांनी इन्फ्ल्यूएंझाच्या (Influenza) विषाणूंचा अभ्यास केला. जीवाणुभक्षी विषाणूंची रचना, पुनुरुत्पादन आणि त्यांच्या पोशिंद्या जीवाणूपेशीतील (host bacteria) प्रवेश यांचाही त्यांनी अभ्यास केला. बर्नेट यांच्यामुळे सूक्ष्म आकाराचे विषाणू पोशिंद्या जीवाणूपेशींना कसे चिकटतात, जीवाणूपेशींमध्ये त्यांची संख्या कशी वाढते आणि शेवटी ते जीवाणुपेशी फोडून बाहेर कसे पडतात हे समजले. इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीचा शोध लागण्यापूर्वी याचा अभ्यास करणे अत्यंत कठीण होते.

बर्नेट यांनी विषाणूंचे आनुवंशिक घटक आणि जीवाणूंचे आनुवंशिक घटक एकत्र येतात व दोन्हीचे आनुवंशिक घटक उत्परिवर्तीत होतात हे आधीच नोंदवून ठेवले होते. त्यांनी विषाणूंचे जनुकीय विश्लेषण (genetic analysis) केले. पोशिंद्या जीवाणूपेशींची वाढ कोंबडीच्या फलित अंड्यातील जरायु (chorion) पटलावर व पिवळ्या बलकामध्ये करण्यात ते यशस्वी झाले. पोशिंदे जीवाणू (एश्चेरिक्रिया कोलाय Escherichia coli= म्हणजेच स्थूलांत्र दंडाणू) आणि विषाणू मोठ्या प्रमाणात वाढवणे, त्यांची संख्या मोजणे यात त्यांनी यश मिळवले. त्यापुढची पायरी म्हणजे माणूस आणि इतर सस्तन प्राण्यांमध्ये नैसर्गिक रीत्या वाढणारे रोगजंतू, कोंबडीच्या भ्रूणधारी अंड्यात टोचून घालून कृत्रिम रीत्या वाढवण्याच्या तंत्रावर त्यानी ३७ शोधनिबंध प्रसिद्ध केले. यातून सूक्ष्मजीव आनुवंशिक आणि रेणवीय जीवशास्त्र अशा ज्ञानशाखा निर्माण झाल्या. रुग्णाच्या नाकातोंडातील स्राव कोंबडीच्या फलित अंड्यामध्ये अंत:क्षेपित केला तर विषाणूंची वाढ मोठ्या प्रमाणात होते हे बर्नेट यांनी सिद्ध केले. सुधारित पद्धत वापरून त्यांनी इन्फ्ल्यूएंझाच्या विषाणूंची पैदास आणि इन्फ्ल्यूएंझाची लस निर्माण केली. इन्फ्ल्यूएंझा विषाणू त्यांच्या लक्ष्यपेशींमध्ये कसे शिरतात आणि प्रचंड संख्यावाढीनंतर नव्या लक्ष्यपेशींमध्ये घुसण्यासाठी आधीच्या पेशींतील पटलापासून कशा अलग होतात ह्यावर बर्नेट आणि त्यांच्या सहसंशोधकानी प्रकाश टाकला.

बर्नेट यांनी सर्वांत प्रथम पोलिओमायलायटिस (poliomyelitis) विषाणूंचे अनेक वंशप्रकार किंवा प्रभेद (strains) असतात हे दाखवून दिले. याचा उपयोग पोलिओची लस बनवण्यात झाला. बर्नेट आणि त्यांची एक सहकारी पॅट्रिसिया लिण्ड (Patricia Lind) यांनी इन्फ्ल्यूएंझा विषाणूंचे दोन भिन्न वंशप्रकार रोग्याच्या एकाच पेशीत संक्रमित झाले तर त्यांच्या आनुवंशिक घटकांचा संकर होऊन दोघांपेक्षा भिन्न अशी तिसऱ्याच वंशप्रकाराची प्रजाती काही अंशी निर्माण होऊ शकते असे सिद्ध केले.

बर्नेट यांचा एक महत्त्वाचा शोध म्हणजे रिकेट्सिया-आदंडाणु (Rickettsia), जीवाणू प्राणीपेशींमध्ये परजीवी स्वरूपात जगतात व वाढतात. रिकेट्सिया व पेशीमध्ये असलेल्या तंतुकणिकेच्या (Mitochondria) जीनोममध्ये कमालीचे साम्य आहे. बर्नेट यांना रिकेट्सियांमुळे कत्तलखान्यात काम करणाऱ्या लोकांना विषमज्वरासारखा क्यू फीवर (Q-fever) व दुसर्‍या महायुद्धात सैनिकांना होणारा खंदक ताप (Trench fever) होतो हे ठाऊक होते. बर्नेट यांच्या कल्पनेतून आलेली आणि सर पीटर ब्रायन मेडाषर या वैज्ञानिकांनी प्रयोगाने सिद्ध केलेली कल्पना म्हणजे – एखाद्या भ्रूणाच्या (embryo) शरीरात, त्याची रोगप्रतिकारक्षमता पूर्ण विकसित होण्यापूर्वी प्रतिजने अंत:क्षेपित केली तर प्रतिक्षम संस्थेला ती ओळखता येत नाहीत. त्या पदार्थाविरुद्ध प्रतिजने तेव्हा तर निर्माण केली जात नाहीतच पण नंतरच्या आयुष्यातही कधीच केली जात नाहीत. ही उपार्जित प्रतिक्षमताजन्य सह्यता (Acquired immunolgical tolerance) म्हणून ओळखली जाते. मानवी शरीराची नैसर्गिक रोगप्रतिकार प्रणाली आप-पर (सेल्फ ॲण्ड नॉन सेल्फ) या तत्त्वावर आधारित आहे, हे प्रस्थापित करणारे संशोधन बर्नेट यांचे सर्वात महत्त्वाचे आहे.

नोबेल पारितोषिकाखेरिज बर्नेट यांनाअनेक सन्मान मिळालेले असून त्यांत लंडनच्या रॉयल सोसायटीचे सदस्यत्व (१९४२) व या सोसायटीची रॉयल (१९४७) व कॉल्पी (१९५९) ही पदके, केंब्रिज विद्यापीठाची सन्माननीय डॉक्टरेट पदवी, रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्सचे फेलो (१९५३), सोसायटी ऑफ थेरॅप्यूटिक्सचे गेलेन पदक (१९५८), नाईट (१९५१) व ऑर्डर ऑफ मेरिट (१९५८ हे किताब विशेष उल्लेखनीय आहेत. १९६५-६९ या काळात ते ऑस्ट्रेलियन ॲकॅडेमी ऑफ सायन्सचे अध्यक्ष होते. १९७८ साली त्यांना ऑस्ट्रेलियातील सर्वोच्च सन्मान नाईट ऑफ द ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया देऊन गौरविण्यात आले.

बर्नेट निरीश्वरवादी होते. एखाद्या समस्येकडे ते पर्यावरण व उत्क्रांतीच्या दृष्टीने पहात असत. बर्नेट यांनी  लिहिलेल्या पुस्ताकांमध्ये व्हायरसेस ॲण्ड मॅन (Viruses and Man; १९५३); प्रिंसिपल्स ऑफ ॲनिमल व्हारोलॉजी (Principles of Animal Virology; १९५५); द क्लोनाल सिलेक्शन थिअरी ऑफ ॲक्वायर्ड इम्युनिटी (The Clonal Selection Theory of Acquired Immunity; १९५९); इम्युनॉलॉजीकल सर्व्हेलियन्स (Immunological Surveillance; १९७०); क्रेडो ॲण्ड कॉमेंट : अ सायंटिस्ट रिफ्लेक्ट (Credo and Comment: A Scientist Reflects; १९७९) यांचा समावेश होतो.

बर्नेट यांचे पोर्ट फेयरी, ऑस्ट्रेलिया येथे निधन झाले.

कळीचेशब्द : #साल्मोनेलाटायफी  #जीवाणू #प्रतिजने, #इन्फ्ल्यूएंझा

संदर्भ :

समीक्षक – मोहन मद्वाण्णा