अमीसी, जियोवानी, बत्तीस्ता : (२५ मार्च, १७८६ ते १० एप्रिल, १८६३ ) जियोवानी बत्तीस्ता अमीसी यांचा जन्म इटलीतील मोडेना या गावी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मोडेना येथेच झाले. त्यांनी शालेय जीवनात भूमितीचे धडे घेतले. पोलो रुफिनी या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या गणितीचे त्यांना मार्गदर्शन लाभले. १८०८ साली त्यांनी वास्तुशास्त्र आणि अभियांत्रिकी या विषयात बोलोग्ना विद्यापीठाची पदवी संपादन केली. त्यांनी मॉडर्न विद्यापीठात बीजगणित, भूमिती आणि त्रिकोणामिती या विषयाचे अध्यापन केले. त्यांनी रॉयल प्रिंटींग हाऊस इरिडी सोलींनी या आपल्या पारंपारिक घरात वैज्ञानिक उपकरणांनी युक्त अशी प्रयोगशाळा बांधली. मॉडर्न विद्यापीठात जियोवानी बत्तीस्ता तोमासेल्ली या भौतिकशास्त्राच्या प्राध्यापकांच्या प्रोत्साहनाने मिश्र धातूंवर आणि वक्र भिंगांवर कामाला सुरुवात केली होती. तुस्कानी येथील ग्रांड ड्युक लेओपोल्ड II यांनी फ्लोरेन्स येथील म्युसिओ दी फिजीका इ स्टोरिया नाचुराले (Museo di Fisica e Storia Naturale) येथील वेधशाळेच्या प्रमुख पदावर त्यांची नियुक्ती केली.
त्यांनी विविध क्षेत्रात काम केल्याची नोंद आहे. दर्शनप्रकाशशास्त्र, खगोलशास्त्र आणि निसर्गशास्त्र अशा विविध क्षेत्रात त्यांनी स्वतःचा ठसा उमटवला आहे. त्यांनी आपल्या हयातीत ३०० सूक्ष्मदर्शक यंत्रे, दुर्बिणी, मायक्रोमीटर, कॅमेरे आणि इतर उपकरणे तयार केली.
साधारण १८७९ पर्यंत प्राण्यांच्या फलन प्रक्रियेत शुक्रजंतूंचा नेमका सहभाग माहीत नव्हता. हर्मन फोल या स्विस प्राणीशास्त्रज्ज्ञाने सिद्ध केले की शुक्रजंतूंचे अंड्यांशी मिलन झाल्याशिवाय फलन होत नाही. परंतु १८२३ ते १८३०या काळात पुष्पवनस्पतींमध्ये लैंगिक पद्धतीने फलन प्रक्रिया कशी होते हे जिओवानी बतीस्ता अमीसी यांनी प्रात्यक्षिकासह दाखवून दिले होते. १८२२ साली त्यांनी पोर्तुलाका ओलेरेसिया नावाच्या फुलाच्या स्त्रीकेसर नलिकेच्या (stigma) केशतंतूंचा पेशिद्रवाच्या (sap) वहनातील सहभागाची शक्यता अभ्यासत असतांना अपघाताने त्यांच्या असे लक्षात आले की स्त्रीकेसरनलिका ही सरळ खाली बीजकोषापर्यंत (Ovary) गेलेली आहे. हे अमीसी यांनी केलेले पहिले निरीक्षण होते. पुढे १८३९ साली पिसा येथील इटालियन शास्त्रज्ञांच्या पहिल्या सभेत यांनी कुकर्बिटा पेपो या झाडाच्या फुलाच्या फलन प्रक्रियेचे मेणाने तयार केलेले प्रारूप सदर केले. १८४२ सालच्या पडुआ येथील चौथ्या सभेत यांनी असे सांगितले की परागनलिकेमार्फत फलनस्त्राव बीजकोषापर्यंत वाहून नेला जातो आणि तेथे बीजकोषात शोषला जातो व फलन प्रक्रिया होते, पराग नलिकेत नव्हे. १८४६ साली जिनोवा येथे आठवी सभा झाली आणि त्यात ऑर्किड वनस्पतीत फलन प्रक्रिया कशी होते हे अमीसी यांनी मेणाने तयार केलेल्या प्रारूपाद्वारे अखेर सिद्ध केले.
त्या काळी सूक्ष्मदर्शकाखाली दिसणारी प्रतिमा स्वच्छ दिसत नसे. प्रतिमेभोवती रंगीत वर्तुळे दिसत असल्यामुळे प्रतिमेची गुणवत्ता चांगली नव्हती. याला प्रकाश किरणांचे विचलन (Chromatic Aberration) असे म्हणतात. यात सूक्ष्मदर्शकाच्या पटलावर मोठ्या तरंग लांबीची लाल तर आखूड तरंग लांबीची निळ्या रंगाची वर्तुळे दिसत होती. दुसरी त्रुटी अशी होती की पटलावर मिळणारी प्रतिमा मध्यभागी खोल आणि परीघाकडे उचललेली अशा प्रकारे वर्तुळाकार दिसत होती. याला गोलाकार विचलन (Spherical Aberration) असे म्हणतात. तिसरी त्रुटी म्हणजे पटलावर मिळणारी प्रतिमा वक्ररेषाकार दिसते ज्याला विकृतीकरण (Distortion) असे म्हणतात. सूक्ष्मदर्शकातील या सर्व त्रुटी घालवून अमीसीने १८४०साली प्रगत रंगविकृतीरहित सूक्ष्मदर्शक तयार केला. सूक्ष्म अवलोकनासाठी यांनी तेलात बुडालेले वस्तुभिंग (ऑईल इमर्शन ऑबजेक्टीव) तंत्र विकसित केले. यात सूक्ष्मदर्शकाच्या मंचावर जो नमूना ठेवलेला असतो त्यावर विशिष्ट सिडार वूड तेलाचा एक थेंब टाकून त्यावर वास्तुभिंगाचे टोक टेकवले जाते. याला ॲक्रोमाटीक सूक्ष्मदर्शक असे म्हणतात. यामुळे वरील त्रुटी नाहीशा होऊन प्रतिमा स्पष्ट दिसते.
डावीकडील भाग : कोरडे वस्तुभिंग – वस्तुभिंगाचा अग्रभाग आणि काचपट्टीवरील नमुना यात हवेचे मध्यम आहे. काच (१.५) आणि हवा (१) यांचा अपवर्तनांक (Refractive index) वेगवेगळा आहे. किरणे जेव्हा काच या माध्यमातून हवा या माध्यमात प्रवेश करतात तेव्हा यात किरणांचे अपवर्तन जास्तीतजास्त होऊन किरणे भिंगाच्या अक्षपासून दूर जातात. काही किरणे तर भिंगाच्या सीमेबाहेर गेलेलली दिसतात. त्यामुळे नमूना स्पष्ट आणि प्रकाशमान दिसत नाही.
उजवीकडील भाग : तेलात बुडालेले वस्तुभिंग – वस्तुभिंगाचा अग्रभाग आणि काचपट्टीवरील नमूना यात सिडार वूड तेलाचे माध्यम आहे. त्यामुळे काच या माध्यमातून तेल या माध्यमात प्रवेश करणारे किरण भिंगाच्या अक्षाकडे झुकतात. याचे कारण काच (१.५) आणि तेल (१.५) यांचा अपवर्तनांकसारखाच आहे. यात किरणांचे अपवर्तन कमीतकमी होऊन जास्तीतजास्त किरण भिंगावर पडल्यामुळे नमूना स्पष्ट आणि प्रकाशमान दिसतो.
अमीसी यांनी आरशांचा वापर करून परावर्तीत दुर्बीण शोधून काढली. याच दुर्बिणीचा वापर करून त्यांनी गुरुच्या चंद्राचे अवलोकन केले. त्यांनी स्वतः तयार केलेल्या सुधारित मायक्रोमीटरचा वापर करून त्यांनी सूर्याचा गोलार्धीय व्यास आणि विषुववृत्तीय व्यास अचूकपणे मोजला. त्यांनी डीप्लीडोस्कोप आणि डायरेक्ट व्हिजन प्रिझमचा शोध लावला.
अमीसी यांच्या सन्मानार्थ चंद्रावरील एका विवरला त्यांचे नाव देण्यात आले आहे. फ्लोरेन्स येथे त्यांना मृत्यू आला.
संदर्भ :
- https://www.britannica.com/biography/Giovanni-Battist
- https://brunelleschi.imss.fi.it/…/biography/GiovanniBatt
- retemuseiuniversitari.unimore.it/…/giovanni…ami..
समीक्षक : मुकुंद बोधनकर