वेइगर्ट, कार्ल : ( १९ मार्च, १८४५ ते  १५ ऑगस्ट, १९०४ ) कार्ल वेइगर्ट यांचा जन्म मुन्स्टरबेर्ग, सिलेसिया येथे झाला. त्यांनी  जर्मनीमध्ये शिक्षण  घेतले. फ्रांकफुर्ट येथील सेनकेनबर्ग  स्कूल  ऑफ ॲनाटॉमी येथे प्राध्यापक म्हणून काम केले आणि त्याच बरोबर त्यांनी फ्रांकफुर्ट हॉस्पिटल्समध्ये प्रोसेक्टर म्हणून काम केले. ब्रेसलाउ मधील इन्स्टिटयूट ऑफ पॅथॉलॉजीचे संचालक जुलियस कोहनहैम हे मेडिकल क्लिनिककडून मिळालेल्या वेइगर्ट याच्या निरीक्षणामुळे अतिशय प्रभावित झाले. १८७८ मध्ये जेव्हा कोहनहैम यांना लेपझिक विद्यापीठात पॅथॉलॉजी विभागात  आमंत्रित करण्यात आले तेव्हा  त्यांनी अट घातली की वेइगर्ट हे सुद्धा त्यांच्या सोबत काम करतील. कोहनहैम यांच्या मृत्युनंतर वेइगर्ट यांनीच हे पद यशस्वीपणे सांभाळले.

वेइगर्ट यांनी युनिव्हर्सिटी ऑफ ब्रेसलाउ अँड बर्लिन येथून औषधशास्त्र या विषयाचा अभ्यास केला. या काळात ते कोहेन हिडेनहैन आणि विरचो (Cohn, Heidenhain, Traube, And Virchow) या वैद्यकीय शास्त्रज्ञांमुळे प्रभावित झाले होते. त्यानंतर त्यांनी पदवी घेतली व ब्रेसलाउमध्ये वाल्देयेर यांचे (Waldeyer) सहायक म्हणून त्यांनी काम केले. १८८७ साली ते लिपझीग विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक म्हणून तर १८८४ साली फ्रांकफुर्ट येथे विकृतीशास्त्र आणि शरीररचनाशास्त्राचे प्रोफेसर म्हणून रुजू झाले. वेइगर्ट हे हिस्टोपॅथोलॉजिस्ट होते. ज्यांनी स्टेनिंग तंत्र व चेतापेशींच्या दुखापतींवर इलाज करणे (टिशू इंज्युरी अँड रिपेअर) यावर संशोधन केले.

सूक्ष्मजीवशास्त्रात ग्राम अभिरंजनक्रिया ही फार मूलभूत मानली जाते. या क्रियेद्वारे जिवाणूंचे दोन भागात वर्गीकरण होते: ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह. ख्रिश्चियन ग्राम यांनी ही पद्धत वापरतांना जिवाणूंचा नमूना एका काच पट्टीवर सारवून घेतला. त्याला थोडीशी उष्णता दिली. त्यावर क्रिस्टल व्हायोलेट हा रंग टाकल्यावर या रंगाची  पेशींच्या पेशीभित्तिकेशी रासायनिक प्रक्रिया होते. नंतर त्यावर आयोडीन टाकल्यावर हा रंग पेशिभित्तिकेशी एकरूप होतो. त्यानंतर  त्यावरती इथेनॉल टाकून क्रिस्टल व्हायोलेट हा रंग धुऊन काढला जातो. क्रिस्टल व्हायोलेटची रासायनिक क्रिया पेशीभित्तिकेशी पक्की झाली असेल तर इथेनॉल टाकूनसुद्धा तो रंग धुतला जात नाही आणि असा जिवाणू सूक्ष्मदर्शकाखाली जांभळ्या रंगाचा दिसतो. याला ग्राम पॉझिटिव्ह असे म्हणतात. रंग विरघळला तर त्याला ग्राम निगेटिव्ह असे म्हणतात.

अशा या एकूण पार्श्वभूमीवर कार्ल वेइगर्ट यांनी या ग्राम अभिरंजनक्रियेत  प्रतिरंग (काउंटर स्टेन) वापरण्याची कल्पना अंमलात आणली. म्हणजे असे की इथेनॉल टाकल्यावर जर क्रिस्टल व्हायोलेट रंग विरघळला तर सॅफ्रानीन या रंगद्रवाचा वापर करून त्या पेशीभित्तिकेला लाल रंग प्राप्त होतो. असा लाल रंग धारण केलेला जिवाणू सूक्ष्मदर्शकाखाली जर दिसला तर त्या जिवाणूला ग्राम निगेटिव्ह संबोधले जाते. हे वेइगर्ट त्यांचे जिवाणूंच्या अभिरंजनक्रियेत प्रतिरंग वापरण्याचे तंत्र आजही वापरले जाते.

त्यांनी ऊतींच्या सूक्ष्म छेदांची मालिका काचपट्टीवर घेऊन त्याचे अभिरंजनक्रियेद्वारे सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण केले. यातून एका ऊतीमधील वेगवेगळ्या पेशींमधला फरक बारकाईने जाणून घेण्याचे तंत्र त्यांनी विकसित केले. १८७१ साली जिवाणूंचे उतीच्या छेदांमधील अस्तित्व अभिरंजनक्रियेद्वारा त्यांनी दाखवून रॉबर्ट कॉख यांचे कार्य पुढे नेले. त्यांचे दुसरे महत्त्वाचे योगदान चेतापेशीशास्त्र (न्यूरोहिस्टोलॉजी) या क्षेत्रात वाखाणले गेले. १८८४ साली चेता संस्थेतील मेड्युलरी थरांचे ( मायलिनचे थर ) अभिरंजन करण्याची क्रिया त्यांनी शोधून काढली. मेंदूची आंतररचना समजून घेणे आणि मेंदूचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी या अभिरंजनक्रियेने क्रांती केली.

त्यांना १८९९ साली गेहेमर मेडिझीनल रॅट (Geheimer Medizinal-Rat) हा किताब देऊन सन्मानित करण्यात आले.

त्यांचा मृत्यू जर्मनीतील फ्रांकफुट येथे झाला.

संदर्भ :

समीक्षक : रंजन गर्गे