डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली : ( स्थापना – १८ मे १९७२ )

कोकणाच्या भूप्रदेशात शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती व्हावी या उद्देशाने शेती, पशुसंवर्धन, वनसंवर्धन, व मत्स्य व्यवसाय याबद्दलचे कृषि शिक्षण, संशोधन आणि कृषि विस्तार  इत्यादीची गरज ओळखून महाराष्ट्र शासनाने दापोली येथे कोकण कृषि विद्यापीठाची स्थापना केली. २००१ मध्ये १२ फेब्रुवारी रोजी या विद्यापीठाचा डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ असे नाव देण्यात आले.

कोकणातील भूभाग डोंगराळ असून संपूर्ण वर्षभर हवामान उबदार व दमट असते. जून ते सप्टेंबर या कालावधीत येथे सरासरी २००० ते ४००० मि. मी. पाऊस पडतो. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जमीन जांभ्या दगडापासून बनलेली असून ती आम्लधर्मीय आहे. परंतु तिची सुपीकता व जलधारणाशक्ती कमी आहे. तथापि ठाणे, पालघर व रायगड या जिल्ह्यातील जमीन मध्यम काळ्या स्वरुपाची असून तुलनात्मकदृष्ट्या सुपीक आणि बऱ्यापैकी जलधारणाशक्ती असलेली आहे. या वैशिष्ट्यपूर्ण जमिनीच्या प्रकारांमुळे कोकण विभागाचे उत्तर कोकण  किनारपट्टी विभाग व दक्षिण कोकण किनारपट्टी विभागअसे दोन भाग पडले आहेत. त्यानुसार विद्यापीठाच्या संशोधनातून उत्तर विभागासाठी भात पिकावर आधारित पीक पद्धती आणि दक्षिण विभागासाठी फलोद्यानावर आधारित पीक पद्धती विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे.

विद्यापीठात कृषि,  मत्स्यशास्त्र (मत्स्योद्योग) व कृषि अभियांत्रिकी  अशा तीन विद्याशाखा आहेत. कृषि विद्याशाखेत दापोली येथील कृषि महाविद्यालय व वनशास्त्र महविद्यालय, मुळदे व दापोली येथील उद्यान विद्या महाविद्यालय तसेच लांजा आणि रोहा येथील कृषि तंत्र विद्यालये यांचा समावेश आहे. तर कृषि अभियांत्रिकी विद्याशाखेमध्ये दापोली येथील कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचा समावेश  आहे. मत्स्योद्योग विद्याशाखेत शिरगाव जि. रत्नागिरी येथील मत्स्य महाविद्यालय आणि रत्नागिरी व मुंबई येथील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रे यांचा अंतर्भाव आहे.

या विद्यापीठात पदविका, पदवीपूर्व, पदव्युत्तर आणि पीएच्.डी. पदवीपर्यंतचे शैक्षणिक  कार्यक्रम राबविले जातात. प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासठी प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करणे आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या उद्देशाने अल्प कालावधीचे विविध प्रशिक्षण अभासक्रमही विद्यापीठांमध्ये चालवले जातात.

विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात कृषि विद्याशाखेअंतर्गत विविध ठिकाणी १८ संशोधन केंद्रे कार्यरत आहेत. उदाहरणार्थ,  प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये, ता. जि. रत्नागिरी, आंबा संशोधन केंद्र, रामेश्वर, ता. देवगड, सुपारी संशोधन केंद्र श्रीवर्धन, जि. रायगड. कर्जत येथील प्रादेशिक कृषि संशोधन केंद्रामध्ये भात या पिकावर संशोधन होते. पीक लागवड पद्धती, पीक संरक्षण, सिंचन पद्धती, तसेच विविध पिकांचे काढणी पश्‍चातचे व्यवस्थापन आणि मूल्यवर्धन यासाठी विद्यापीठांमध्ये सातत्याने संशोधन व मार्गदर्शन सुरू असते. शेतकऱ्यांना उपयुक्त अशी विविध अवजारे विद्यापीठाने विकसित केली आहेत. उदाहरणार्थ, वैभव विळा, नूतन आंबा झेला, भात  कापणी व मळणी यंत्र इत्यादी. कोकण किनारपट्टीवर मच्छीमारी हा एक मुख्य व्यवसाय असल्यामुळे विद्यापीठाने खाऱ्या, निमखाऱ्या आणि गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीवर संशोधन करून मत्स्यशेतीबाबत शेतकऱ्यांना विविध शिफारसी उपलब्ध करून दिल्या आहेत. एवढेच नाही तर आतापर्यंत विद्यापीठाने ह्या सर्व संशोधन केंद्रामार्फत विविध पिकांच्या अधिक उत्पन्न देणाऱ्या ९० सुधारित जाती प्रसारित केल्या आहेत. समाधानकारक उत्पादन मिळविण्याच्या दृष्टीने पीक उत्पादन तंत्रज्ञान विकसित करून सुयोग्य पीक लागवड पद्धती प्रमाणित केल्या आहेत. आंबा अभिवृद्धीच्या कोय कलम तंत्रज्ञानामुळे दर्जेदार आंबा कलमे उपलब्ध होत आहेत. तसेच आंब्याच्या  बाबतीत जुन्या बागांचे शास्त्रोक्त पद्धतीने छाटणी करून पुनरुज्जीवत करणे आणि आंब्याची घनपद्धतीने लागवड करण्याची शिफारस आंबा बागायतदारांना उपयुक्त वाटत आहेत.

हे विद्यापीठ,  शिक्षण आणि संशोधन कार्याबरोबरच  विद्यापीठाचे संशोधन  शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचावे या दृष्टीने कृषि विज्ञान केंद्र व कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्या माध्यमातून कृषि तंत्रज्ञान प्रसाराचे कार्य सातत्याने करीत आहे. यामध्ये प्रात्यक्षिके, शेतकऱ्यांच्या सहली, दूरदर्शन व आकाशवाणीवरील कार्यक्रम तसेच पुस्तके व इतर छापील साहित्याचा समावेश आहे. अशा प्रकारे शिक्षण, संशोधन व विस्तार कामांच्या माध्यमातून विद्यापीठाने विकसित केलेले कृषि विषयक तंत्रज्ञान कोकणात विविध स्तरांवर शेतकरी आणि उद्योजक यांच्यापर्यंत पोहचत आहे.

समीक्षक : विठ्ठल चापके