रेबेका क्रैघील लान्सफिल्ड : ( ५ जानेवारी १८९५ – ३ मार्च १९८१ ) रेबेका क्रैघील यांचा जन्म न्यूयॉर्क येथील स्टेटन बेटावरील फोर्ट वाड्स्वोर्थ येथे झाला. लान्सफिल्ड यांनी वेलेस्ली कॉलेज (Wellesley College) मधून पदवी प्राप्त केली. त्यांनी त्यांचा अभ्यास इंग्रजी विषयाकडून प्राणीशास्त्राकडे वळविला. त्यानंतर दोन वर्षांत त्यांनी त्याची पदव्युत्तर पदवी कोलंबिया विद्यापीठातून घेतली. हान्स झीन्स्सेर (Hans Zinsser) प्रयोगशाळेत त्यांनी जीवाणूशास्त्रज्ञ म्हणून काम केले. लान्सफिल्ड यांची रॉकफेलर इन्स्टिट्यूटमध्ये नियुक्ती करण्यात आली. ओस्वाल्ड अवेरी  (Oswald Avery) आणि अल्फोन्से डोचेझ (Alphonse Dochez) न्यूमोकोकाय  बॅक्टेरीयावरती काम करत होते. त्याच प्रकल्पावर मदत करण्यासाठी लान्सफिल्ड यांची निवड झाली.

पहिल्या महायुद्धाच्या वेळेस रॉकफेलर इन्स्टिट्यूटमध्ये सेरॉलॉजीकल टेस्ट करून  म्हणजेच रक्तद्रावाचा वापर करून केलेले परीक्षण, स्ट्रेप्टोकोकाय (Streptococci) बॅक्टेरियाचे प्रकार त्यांनी शोधून काढले. ही पद्धती पुढे लान्सफिल्ड वर्गीकरण पद्धत म्हणूनच जगभर प्रसिद्ध झाली. याच पद्धतीचा वापरू करून अवेरी यानी नंतर न्यूमोकोकाय  या जीवाणूचे प्रकार शोधले. एका वर्षात अवेरी (Avery), डोचेझ (Dochez,) आणि लान्सफिल्ड यांनी स्ट्रेप्टोकोकसचे  (Streptococcus) चार प्रकार प्रकाशित केले. लान्सफिल्ड यांचा हा पहिला पेपर प्रकाशित झाला होता. लान्सफिल्ड आणि त्यांचे पती यांनी ओरेगोन युनिव्हर्सिटीमध्ये काही काळ अध्यापन केले त्यानंतर ते न्यूयॉर्कला परत गेले. लान्सफिल्ड यांनी कोलंबियामधून डॉक्टरेट पदवी घेतली आणि त्याचं वेळेस  रॉकफेलर इन्स्टिट्यूटमध्ये संधिवात ज्वर यावर  (rheumatic fever) सुद्धा ते अभ्यास करत होते. त्यांचे पतीसुद्धा कोलंबिया विद्यापीठात जीवशास्त्र विभागात सामील झाले. १९४३ मध्ये लान्सफिल्ड यांची सोसायटी ऑफ अमेरिकन बॅक्टेरीयॉलॉजीस्टमध्ये अध्यक्ष म्हणून  नियुक्ती करण्यात आली आणि १९६१ मध्ये अमेरिकन असोसिएशन ऑफ इम्युनोलॉजीस्टचे ते अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले. हेलेन हे व्हिटने फाउंडेशनकडून लान्सफिल्ड यांना टी. ड्युकेट जोन्स पुरस्कार, अमेरिकन हार्ट असोसिएशनचा अचिव्हमेंट अवार्ड पुरस्कार, मेडल ऑफ दि  न्यूयॉर्क अकॅडेमी ऑफ मेडिसीन पुरस्कार मिळाले. नॅशनल अकेडमी ऑफ सायन्समध्ये त्यांची  नियुक्ती झाली.

संदर्भ :

समीक्षक : रंजन गर्गे