कॅव्हेंडिश प्रयोगशाळा, केंब्रिज : ( स्थापना – सन १८७४ ) केंब्रिज विद्यापीठात मागील अनेक शतकांपासून भौतिकशास्त्र या विज्ञान शाखेत संशोधन करण्यात येत आहे. अठराव्या शतकाच्या मध्यापर्यंत हे संशोधन बरेचसे सैध्दांतिक स्वरूपाचे होते. या संशोधनाला प्रायोगिकतेची जोड द्यावी या उद्देशाने कॅव्हेंडिश प्रयोगशाळेची स्थापना करण्यात आली. त्यासाठी त्या विद्यापीठाचे त्यावेळचे कुलपती डेवनशरचे डयूक विल्यम्स कॅव्हेडिश यांनी अर्थसहाय्य केले होते. प्रसिद्ध ब्रिटिश शास्त्रज्ञ हेन्री कॅव्हेंडिश यांचे नाव या नव्या प्रयोगशाळेला देण्यात आले आणि त्याच्या अनुषंगाने कॅव्हेंडिश अध्यासनाची  स्थापना केली गेली. ती विकसित करण्याची जबाबदारी अध्यासनाचे पहिले प्राध्यापक जेम्स क्लार्क मॅक्सवेल यांच्यावर सोपविण्यात आली. त्यानी सुरूवातीच्या काळात प्रयोगशाळेची उभारणी केली. त्यांच्या मृत्यूनंतर लॉर्ड रॅले या भौतिकशास्त्रज्ञाने त्यांचे काम पुढे नेले. अशा पद्धतीने एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात भौतिक शास्त्रातील विविध प्रयोग करण्याची सुविधा केंब्रिज शहरात उपलब्ध झाली.

विज्ञानाच्या क्षेत्रातील अनेक क्रांतीकारी शोध या प्रयोगशाळेत लावण्यात आले आहेत. अणूच्या संरचनेसंबंधी जी माहिती आज आपणास उपलब्ध आहे ती ह्याच संस्थेतील संशोधनावर आधारित आहे. सर जे. जे. थॉमसन यांनी याच प्रयोगशाळेत इलेक्ट्रॉन हा अणूचा घटक असल्याचे सिद्ध केले. त्यांचाच विद्यार्थी अर्नेस्ट रुदरफोर्ड याने सोन्याच्या पातळ पत्र्यावर अल्फा कणांचा मारा करून अणूची रचना सूर्यमालेसारखी असते हे सिद्ध केले. रुदरफोर्ड यांचा विद्यार्थी जेम्स चॅडविक याने अणूमध्ये प्रभार नसलेले न्यूट्रॉन असतात हे  ह्याच प्रयोगशाळेत सिद्ध केले.

आंतरवैज्ञानिक प्रणालीच्या अभ्यासातील एक महत्त्वाचे केंद्र अशी कॅव्हेंडिश प्रयोगशाळेची ख्याती आहे. क्ष किरणीय विश्लेषणाद्वारे जीवशास्त्रात अत्यंत मूलभूत मानल्या जाणाऱ्या डीएनए या घटकाची रचना शोधून काढण्याचे  महत्त्वाचे काम जेम्स वॉटसन आणि फ्रान्सिस क्रिक यांनी याच संस्थेत केले. या कामासाठी त्यांना १९६२ चे वैद्यक विज्ञानातील नोबेल पारितोषिक देण्यात आले होते. त्या मागोमाग १९६४ मधील रसायनशास्त्राच्या नोबेल पारितोषिकाच्या मानकरी ठरलेल्या डोरोथी हॉजकिन यांनी पेनिसिलीन, बी १२ जीवनसत्त्व आणि इन्शुलिन या द्रव्यांची आण्विक रचना शोधून काढली. या संशोधनातून आण्विकजीवशास्त्र आणि अनुवंशविज्ञान या शाखांचा पाया घातला गेला. आधुनिक विज्ञानाची गरज लक्षात घेऊन विसाव्या शतकात आणखी सुसज्ज अशा प्रयोगशाळेची गरज भासू लागली. ती पूर्ण करण्यासाठी १९७१ मध्ये कॅव्हेंडिश प्रयोगशाळा नवीन जागेत स्थलांतरित करण्यात आली. त्यानंतर तेथे रेडिओ ॲस्ट्रॉनॉमी, सेमिकंडक्टर फिजिक्स, नॅनो टेक्नॉलॉजी अशा विविध शाखांमध्ये संशोधन करण्याच्या सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत.

अगदी अलीकडे २०१९मध्ये, ह्याच प्रयोगशाळेतील दिदिये यांनी केली ह्या खगोल वैज्ञानिकाला, आपल्या सूर्यमालिकेव्यतिरिक्त इतर मंडलातील मोठ्या ताऱ्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांचा शोध घेण्यासाठी भौतिकविज्ञानाचे नोबेल पारितोषिक प्रदान केले गेले. हा मान प्राप्त करणारे ह्या प्रयोगशाळेतील ते २९ वे संशोधक आहेत. देशोदेशीचे शास्त्रज्ञ संशोधन करण्यासाठी या प्रयोगशाळेत येत असतात. आता तर २१ व्या शतकात काम करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या सुविधा निर्माण करण्यात येत आहेत.

संदर्भ :

समीक्षक : श्रीनिवास केळकर