ॲल्युमिनियम या धातूच्या निष्कर्षणाचे पुढील महत्त्वाचे टप्पे आहेत : (१) धातुपाषाणांपासून (Ore) शुद्ध ॲल्युमिना मिळविणे आणि (२) ॲल्युमिनाचे विद्युत् विच्छेदन करून निव्वळ धातू मिळविणे.
(१) धातुपाषाणांपासून शुद्ध ॲल्युमिनाची प्राप्ती : प्रथम ॲल्युमिनियमचे धातुपाषाण म्हणजे बॉक्साइट (Al2O3 . H2O) शुद्ध करून घेतात. ॲल्युमिनियम धातूमध्ये लोह व सिलिका यांचा अंशही असला तरी तिचे गुणधर्म बदलतात. प्रत्यक्ष ॲल्युमिनियम धातूतील अशी मूलद्रव्ये काढून टाकणे अत्यंत अवघड असते. म्हणून बॉक्साइटापासून शुद्ध ॲल्युमिना काढून घेऊन नंतरच तिचे विद्युत् विच्छेदन केले जाते.
बेयर पद्धती : बेयर यांच्या पद्धतीत कच्च्या धातुपाषाणाची पूड करून ती सोडियम हायड्रॉक्साइडाच्या सांद्र (सोडियम हायड्रॉक्साइड / NaOH जास्त प्रमाणात असणाऱ्या), उष्ण व दाबाखाली असलेल्या विद्रावात मिसळून शिजविली जाते. यामध्ये पुढील विक्रिया होते.
Al2O3 + २ NaOH → २ NaAlO2 + H2O
NaAlO2 + २ H2O → AI (OH)3 + ३ H2O
यामुळे सोडियम ॲल्युमिनेटचा (NaAlO2) विद्राव तयार होतो. थोड्या सिलिकेचे सोडियम सिलिकेट होऊन तेही विद्रावात विरघळते. परंतु फेरिक ऑक्साइड व टिटॅनियम डाय-ऑक्साइड ही न विरघळता विद्रावात लोंबत राहतात. त्यानंतर विद्राव विरल करून गाळण्याने गाळल्यावर लोह, टिटॅनियम इ. ऑक्साइडांचा चिखलासारखा अविद्राव्य चोथा वेगळा काढला जातो. गाळून मिळालेल्या विद्रावात बीज क्रियेसाठी (साका तयार होण्याच्या क्रियेसाठी) शुद्ध ॲल्युमिनियम हायड्रॉक्साइडाचे [AI (OH)3] स्फटिक मिसळून तो कित्येक दिवस ढवळतात. विद्रावातील सर्व ॲल्युमिनियम हायड्रॉक्साइड अवक्षेपित होते (Precipitation), परंतु सिलिका अवक्षेपित होत नाही. विद्राव गाळून घेतल्यावर ॲल्युमिनियम हायड्रॉक्साइडाचा [Al(OH)3] चोथा स्वच्छ धुतात आणि सु. १,१००० से. तापमानास तापवितात.
२ AI(OH)3 → AI2O3 + ३ H2O
अशा रीतीने शुद्ध ॲल्युमिनाची (AI2O3) शुभ्र पांढरी पूड मिळते. ॲल्युमिनियम हायड्रॉक्साइड काढून घेतल्यावर उरणारा सोडियम हायड्रॉक्साइडाचा विद्राव सांद्र करून पुन्हा वापरला जातो. सु. ८० किग्रॅ. बॉक्साइटापासून व सु. ३ किग्रॅ. सोडियम हायड्रॉक्साइड वापरून ४० किग्रॅ. ॲल्युमिना मिळते.
(२) विद्युत् विच्छेदन पद्धतीने ॲल्युमिनाचे क्षपण : सोबतच्या आकृतीमध्ये दाखविल्यासारखी विद्युत् विच्छेदन भट्टी वापरून ॲल्युमिनापासून धातू वेगळी केली जाते. आकृतीमध्ये कार्बनाचे अस्तर असलेली पोलादी टाकी दाखविली आहे. तिचे कार्बनी अस्तर ऋणाग्र (Cathode) असते. टाकीत कार्बनाची अनेक धनाग्रे (Anodes) लोंबत राहतील अशी रीतीने बसविलेली असतात. टाकीत क्रायोलाइट (Na3AlF6) घालून ते वितळल्यावर त्याच्यात शुद्ध केलेली ॲल्युमिना विरघळवितात आणि ९२००—९९०० से. तापमानात विद्युत् विच्छेदन केल्यास तिचे क्षपण होते. ऋणाग्रालगत ॲल्युमिनियम विमुक्त होतो आणि बुडून टाकीच्या तळाशी द्रव अवस्थेत साचतो. तळाजवळील एका नळाद्वारे तळाशी साचलेला धातू काढून घेतला जातो. धनाग्राजवळ ऑक्सिजन विमुक्त होत असतो. त्यामुळे धनाग्र हळूहळू जळून जात असते, परंतु त्याच्या ज्वलनाच्या उष्णतेमुळे टाकीतील वितळलेल्या द्रवाचे तापमान टिकून राहण्यास मदत होते.
AI2O3 → AI3+ + ३ O2-
AI3+ + ३ e– → AI
विद्युत विच्छेदन पद्धतीने ॲल्युमिनाचे क्षपण करून मिळालेला ॲल्युमिनियम धातू हा ९९ % शुद्ध असतो.
ॲल्युमिनियम धातूचे उत्पादन फायदेशीर होण्यासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट म्हणजे विजेचा भरपूर व स्वस्त पुरवठा असणे ही होय. तसा पुरवठा असला म्हणजे अतिशय दूरच्या ठिकाणाहूनही बॉक्साइट आणून त्याच्यापासून धातू काढणे परवडते. उदा., जर्मनी व कॅनडा हे ॲल्युमिनियम धातूच्या उत्पादनात अग्रेसर आहेत, परंतु त्यांना लागणारे बॉक्साइट परदेशातून आणले जाते.
ॲल्युमिनियम धातू तयार करणे आणि तिच्यावर निरनिराळे संस्कार करून व्यवहारोपयोगी वस्तू बनविणे अशा दोन्ही प्रकारचे उद्योग भारतात करण्यात येतात.
पहा : ॲल्युमिना; ॲल्युमिनियम; ॲल्युमिनियम संयुगे; बेयर, (योहान फ्रीड्रिख व्हिल्हेल्म) आडोल्फ फोन; बेयर पद्धती; हूप विद्युत विच्छेद्य पद्धती.