अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या पश्चिम भागातून वाहणारी कोलोरॅडो नदीची प्रमुख उपनदी. या नदीची लांबी १,१७५ किमी. व जलवाहन क्षेत्र १,१७,००० चौ. किमी. आहे. अमेरिकेच्या वायोमिंग, कोलोरॅडो व उटा या राज्यांतून ही नदी वाहते. कोलोरॅडो राज्यातील ६४ किमी.चा प्रवाहमार्ग वगळता बाकीचा सर्व प्रवाहमार्ग वायोमिंग व उटा राज्यांत आहे. वायोमिंग राज्याच्या पश्चिम-मध्य भागातील विंड रिव्हर या पर्वतश्रेणीतील कॉन्टिनेन्टल डिव्हाइड या कटकमध्ये या नदीचा उगम होतो. विंड रिव्हर ही रॉकी पर्वताची एक रांग आहे. ही नदी वायोमिंग राज्याच्या नैर्ऋत्य भागातून सामान्यपणे दक्षिणेस वाहते. या राज्यातील ला बार्ज शहराच्या खाली बांधलेल्या धरणामुळे फाँटेनील जलाशयाची निर्मिती झाली आहे. वायोमिंग राज्यातील ग्रीन रिव्हर शहराच्या पुढे ही नदी वायोमिंग व उटा राज्यांत विस्तारलेल्या ‘फ्लेमिंग जॉर्ज नॅशनल रेक्रिएशन एरिया’ प्रदेशातून वाहते. ईशान्य उटामध्ये तिच्यावर फ्लेमिंग गॉर्ज हे धरण बांधण्यात आले असून त्यामुळे निर्माण झालेल्या फ्लेमिंग गॉर्ज या विस्तृत जलाशयाचा विस्तार उटा आणि वायोमिंग राज्यांत झालेला आहे. धरणाच्या दक्षिणेस ती पूर्वेकडे वाहत जाऊन कोलोरॅडो राज्यात प्रवेश करते. कोलोरॅडो राज्याच्या वायव्य भागातील ‘डाइनासॉर नॅशनल मॉन्युमेन्ट’ या वाळवंटी प्रदेशातील लडोर कॅन्यनमधून वक्राकार वळण घेत ती पुन्हा उटा राज्यात प्रवेश करते. उटा राज्यातून प्रथम नैर्ऋत्येस, त्यानंतर दक्षिणेस व शेवटी आग्नेय दिशेस वाहत जाऊन मोआब शहराच्या दक्षिणेकडील ‘कॅन्यनलँड्स नॅशनल पार्क’ मध्ये कोलोरॅडो नदीला मिळते.
ग्रीन नदीचा बराचसा प्रवाहमार्ग ओबडधोबड पर्वतीय प्रदेशातून, कोलोरॅडो पठारावरून आणि निसर्गसुंदर कॅन्यनमधून (घळईतून) वाहतो. कोलोरॅडोमधील यँपा आणि उटामधील दुशेन, प्राइस, व्हाइट, सॅन रफेल या ग्रीन नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. नदीतून केवळ विशेष उथळ बोटींद्वारे (ड्राफ्ट रिव्हरबोट) जलवाहतूक होऊ शकते. ही नदी सुरुवातीला स्पॅनिश नदी म्हणून ओळखली जाई. काही ठिकाणी तिचे काठ रूपांतरित खडक प्रकारातील हिरव्या शंख जिरे खडकांनी बनलेले आहेत. त्यामुळे १८२४ पासून तिला ग्रीन नदी या नावाने ओळखले जाऊ लागले. ग्रीन नदीचे खोरे जैवविविधतेने समृद्ध आहे. तिच्या पाण्यात १५० पेक्षा अधिक जातीचे मासे आढळतात. १९९९ पासून शासन, शेतकरी व वेगवेगळ्या पर्यावरणवादी संघटना यांच्यामार्फत या नदीपात्रातील व खोर्यातील वनस्पती, वन्य प्राणिजीवन, त्यांचा अधिवास, पाण्याची गुणवत्ता आणि मनोरंजनाच्या सुविधा इत्यादींच्या संवर्धनाचा प्रयत्न केला जात आहे.
समीक्षक : वसंत चौधरी