अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमधील मेन राज्यातून आणि कॅनडातील क्वीबेक व न्यू ब्रन्सविक प्रांतांतून वाहणारी नदी. लांबी सुमारे ६७३ किमी., एकूण पाणलोट क्षेत्र सुमारे ५४,००० चौ. किमी. असून त्यांपैकी २०,००० चौ. किमी. क्षेत्र अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील आहे.  अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमधील मेन राज्याच्या वायव्य भागातील सॉमरसेट परगण्यात या नदीचा उगम होतो. उगमानंतर ती ईशान्येस कॅनडाच्या सरहद्दीकडे वाहत जाते. तेथे कॅनडा – अ. सं. सं. यांच्या सरहद्दीवरून काही अंतर ईशान्येस वाहत गेल्यानंतर ती हळूहळू आग्नेयवाहिनी बनते. एडमन्स्टन येथे तिला मॅदवॉस्क नदी मिळते. कॅनडा – अ. सं. सं. यांच्या सरहद्दीवरून सुमारे १३० किमी. वाहत गेल्यानंतर सेंट जॉन ग्रँड फॉल्सच्या वरच्या बाजूस ती कॅनडाच्या न्यू ब्रन्सविक प्रांतात प्रवेश करते. येथे नदीपात्रात २३ मी. उंचीचा जलप्रपात तयार झालेला आहे. न्यू ब्रन्सविक प्रांतातून दक्षिणेस वाहत गेल्यानंतर वुडस्टॉकजवळ ती पूर्वेकडे वळते. ऑरोमॉक्टोच्या संगमानंतर दक्षिणेकडे वाहत जाऊन सेंट जॉन येथे अटलांटिक महासागरातील फंडी उपसागरास ती मिळते. नदीमुखाजवळचे पात्र निदरीसारखे अरुंद व खोल असल्यामुळे फंडी उपसागराकडून वेगाने येणार्‍या सागरी लाटा नदीच्या मुखातून उलट्या दिशेने जोराने आत घुसतात. त्यामुळे तेथे उलटा पडणारा धबधबा (Reversing Falls) तयार होतो. तेथील लाटेची उंची १५ ते २१ मी. पर्यंत आढळते. उधानाच्या भरतीच्या वेळी लाटा सर्वाधिक उंच असतात. जगातील सगळ्यात उंच आणि वेगवान भरतीच्या लाटांसाठी ही नदीमुखखाडी प्रसिद्ध आहे.

सेंट जॉन नदीकाठावरील फ्रेडरिक्शन शहर

फ्रेंच समन्वेषक स्यूर दे माँ व साम्यूएल द शांप्लँ यांनी १६०४ मध्ये या नदीचा शोध लावला. बाप्टिस्ट सेंट जॉन यांच्या नावावरून या नदीला सेंट जॉन या नावाने ओळखले जाते. अॅलगॅश, सेंट फ्रॅन्सिस, मॅदवॉस्क, ऑरोमॉक्टो, टोबीक, नॅशवॉक, सॅमन या सेंट जॉनच्या प्रमुख उपनद्या आहेत. नदीखोर्‍यातील बरेचसे क्षेत्र अरण्यमय आहे. ग्रँड फॉल्सजवळील आणि बीचवुड धरणाजवळचे पात्र वगळता बहुतांश नदीप्रवाह संथगतीने वाहणारा आहे. प्रामुख्याने वसंत ऋतूत नदीला पूर येतात. मुसळधार पर्जन्यवृष्टी हे पुराचे प्रमुख कारण आहे. खालच्या टप्प्यातील १४० किमी. लांबीच्या प्रवाहमार्गात सरोवरे, लांबट व कमी उंचीची बेटे, आर्द्रभूमी आणि भरतीचे पाणी घेणारी नदीमुख खाडी आढळते.  सेंट जॉन नदीवरील ग्रँड फॉल्स, बीचवुड व मॅक्टाक्वॅक येथे जलविद्युतनिर्मिती केंद्रे आहेत. त्याशिवाय टोबीक, अरूस्टूक व मॅदवॉस्क या उपनद्यांवरही जलविद्युतनिर्मिती केंद्रे आहेत. नदीमुखापासून फ्रेडरिक्शनपर्यंत सुमारे १३७ किमी. मोठ्या जहाजांतून व वुडस्टॉकपर्यंत सुमारे २४१ किमी. लहान गलबतांमधून जलवाहतूक होते. या नदीवर एडमन्स्टन, फ्रेडरिक्शन, सेंट जॉन ही प्रमुख शहरे आहेत.

समीक्षक : वसंत चौधरी