मध्ययुगीन पाश्चिमात्य राजकीय विचार : यूरोपच्या मध्ययुगीन राजकीय आणि धार्मिक इतिहासाला फार महत्त्वाची प्रेरणा सेंट ऑगस्टीन (इ. स. ३४५–४३०) रोमन साम्राज्यात उत्तर आफ्रिकेत जन्मला. त्याची माता ख्रिश्चन होती, वडील ख्रिश्चन नव्हते. इ. स. ३८७ मध्ये सेंट ऑगस्टीनने इटलीत ख्रिस्ती धर्माची दीक्षा घेतली. पूर्वायुष्य व्यावहारिक उलाढालीत आणि सर्व तऱ्हेच्या चैनीत गेले. ख्रिस्ती दीक्षा घेतल्यावर जीवनपद्धती मूळापासून बदलली. उच्च दर्जाची विचारसरणी, नैतिक श्रद्धा आणि बायबलवरील विश्वास यांमुळे चर्चच्या संस्थेवर त्याचा प्रभाव पडून उंच उंच श्रेणींवर तो चढत गेला. तो हिप्पोचा बिशप ३९६ साली बनला. इ. स. ४३० मध्ये त्याचा मृत्यू झाला. त्यावेळी त्याच्या आयुष्यात ख्रिश्चन धर्म विस्तार पावत होता आणि ख्रिस्तेतर पेगनवादाशी स्पर्धा सुरू होती. त्याने ४१३ मध्ये देवनगरी (सिटी ऑफ गॉड) हा ख्रिस्ती धर्माच्या इतिहासातील अत्यंत प्रभावी ग्रंथ लिहिण्यास सुरुवात केली आणि ४२६ मध्ये तो ग्रंथ पुरा झाला. त्याची बावीस प्रकरणे आहेत. ख्रिश्चनेतर पेगवानवादातील विसंगती आणि पोकळपणा त्याने विस्ताराने चर्चिला. मुख्यतः त्याने मानवी जीवनाचे दिव्य मार्ग (देवनगरी) आणि पार्थिव मार्ग (ऐहिक नगरी) असे दोन विभाग वर्णिले. यूरोपच्या मध्ययुगीन राजकीय आणि धार्मिक इतिहासाला फार महत्त्वाची प्रेरणा देणारा हा ग्रंथ झाला. तो कायदेपंडित किंवा राजकीय विचारवंत नव्हता तो धर्मतत्त्वज्ञ होता. देव, श्रद्धा आणि मोक्ष हे त्याचे मननाचे विषय होते. राज्याची संघटना आणि राज्याचे व चर्चचे संबंध याला त्याच्या ग्रंथांत विशेष महत्त्व नाही. देवनगरी म्हणजे चर्च नव्हे आणि पार्थिवनगरी म्हणजे राज्य नव्हे. पार्थिवनगरीमध्ये स्वतःवरचे प्रेम आणि सत्तेची लालसा हे प्रभाव पडतात, उलट देवनगरीमध्ये देवभक्ती स्वतःचा धिक्कार करूनही महत्त्वाची ठरते आणि त्या देवभक्तीतून सुव्यवस्था निर्माण होते. मानवजातीचे या दोन जीवनपद्धतींप्रमाणे दोन विभाग पडतात. मानवी व्यवहार आणि देवभक्तीचा व्यवहार असे दोन व्यवहार या विश्वात चालतात. माणसांमध्ये या दोन नगरींचे रहिवासी देवाने निवडलेले व झिडकारलेले एकमेकांत मिसळलेले आढळतात. जे देवानेच निवडलेले ते ईश्वराच्या सान्निध्यात शाश्वत काळ राहतात आणि देवाने झिडकारलेले शाश्वत काळपर्यंत नरकनिवासी होतात. मनुष्य आणि देव यांचा सुसंवाद असला म्हणजे माणसा-माणसातल्या संबंधात न्यायाचा व्यवहार होत असतो आणि देवाच्या शाश्वत राज्याचा नागरिक मनुष्य बनतो. देवाच्या भक्तीतून आणि सेवेतून या न्यायाला आकार येतो. या देवनगरीच्या तत्त्वाचे सूचक लक्षण म्हणजे चर्च होय. देवनगरीचाच चर्च हा भाग असतो. पार्थिवनगरी राज्यसंस्थेत प्रतिबिंबित झालेली असते. अपवित्र माणसांचा सामाजिक आणि राजकीय व्यवहार हा पार्थिवनगरीचा व्यवहार होय. राज्य नागरिकांमध्ये शांततेची स्थापना करते व ही शांतता देवाच्या सेवेला लावायची असते, नाहीतर राज्याची शांतता ही मर्यादित कालापुरतीच टिकते. त्या शांतीचा देवसेवेकरिता उपयोग करायचा असतो. सेंट ऑगस्टीनने प्लेटोचे न्याय हे राजकीय उद्दिष्ट व कल्याणमय जीवन हे ॲरिस्टॉटलचे राजकीय उद्दिष्ट, ख्रिश्चन धर्मीय दृष्टिकोनातून मांडले आहे.

संदर्भ :

  • जोशी, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री, राज्यशास्त्र, मराठी विश्वकोश  चौदावा खंड.