रिंगण : मराठी साहित्यातील संत साहित्यविषयक नियतकालिक. २०१२ साली सचिन परब आणि श्रीरंग गायकवाड यांनी संत साहित्याच्या सामाजिक, सांस्कृतिक अन्वयार्थासाठी रिंगण  हे आषाढी वार्षिक सुरू केले. रिंगण  दरवर्षी एका संतावर आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात प्रकाशित होते. आतापर्यंत संत नामदेव, संत चोखामेळा, संत जनाबाई, निवृत्तीनाथ, विसोबा खेचर, गोरा कुंभार, सावता माळी आणि सोपानदेव यांच्यावर अंक प्रसिद्ध झाले आहेत. संतपरंपरेचा सामाजिक सांस्कृतिक मागोवा घेणारे वार्षिक या घोषवाक्यासह रिंगणने महाराष्ट्राच्या साहित्यिक-सांस्कृतिक परिप्रेक्षात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. सातशे वर्षांपूर्वीच्या संतविचारांची, साहित्याची नवी मांडणी केली आणि संत अभ्यासाची नवी शैली तयार केली आहे. संतसाहित्याकडे पाहण्याची नवी दृष्टी दिली. रिंगणने संतांच्या सामाजिक सांस्कृतिक मांडणीला महत्त्व दिले. संतसाहित्य हा महाराष्ट्राचा वारसा, संचित आहे. या संचिताकडे केवळ अध्यात्माच्या अंगाने न पाहता त्याचा सामाजिक- सांस्कृतिक अन्वयार्थ शोधला पाहिजे, ही रिंगणची भूमिका राहिली आहे.

रिंगणच्या अंक हे संत कार्यकेंद्री आहेत. संतांच्या कार्यासंबंधी विविध दृष्टिकोनांची मांडणी या अंकात असते. संतांच्या गावापासून त्यांच्यावरील सिनेमांपर्यंत सगळी माहिती एकत्र उपलब्ध करून दिली आहे. त्यातील अद्ययावत अशी संदर्भसूची हे रिंगणंचे वैशिष्टय अभ्यासकांना उपयुक्त ठरते. संतविचारांवर व त्यांच्या साहित्यावर सखोल, सविस्तर, अभ्यासपूर्ण चिंतनशील मांडणी हे रिंगणचे  खास विशेष.रिंगणच्या सर्वच अंकांबरोबर संत जनाबाई वरील अंक विशेष उल्लेखनीय ठरला. संत नामदेवांची दासी, पाठराखीन प्रसंगी मार्गदर्शक बनून राहणाऱ्या जनाबाईंनी विठ्ठलाला जनसामान्यांपर्यत आपल्या कवितेतून पोहचविले. अशा उपेक्षित समन्वयवादी जनाबाईचे विचार आणि कार्य रिंगणने उलगडून दाखवले. संतसाहित्य परंपरेचा भारतीय संदर्भ शोध या अंकात आहे. महाराष्ट्रभूमी ओलांडून संतपरंपरा भारतभर पसऱल्याच्या खुणांचा मागोवा या लेखनात आहे.

 रिंगणच्या अंकात संतांच्या संबंधित गावांमधे जाऊन आज त्या संतांचा प्रभाव शोधणारे रिपोर्ताज लेखनाचा समावेश आहे. या रिर्पाताज लेखनातून तरूण लेखकांनी संतपरंपरेचा सद्यःकालीन अन्वयार्थ मांडला आहे. यामुळे संत परंपरा आजच्या काळाशी जोडली जाते. रिंगणची भाषा आजच्या पत्रकारितेची भाषा आहे. ती ओघवती, साधी, सोपी, सरळ आहे. त्यात इंग्रजी, हिंदी शब्द येतात. त्यामुळे ती सहजपणे लोकांपर्यंत पोहोचते. थेट मनाला भिडते. वाचकांच्या मनाचा ठाव घेते. पारंपरिक साचा, बाज सोडून रिंगणने नव्या पिढीच्या बोलीभाषेची मांडणी केली. चित्रकार भास्कर हांडे यांची मुखपृष्ठे हे रिंगणची वैशिष्ट्य होत. सबंध आर्टपेपरवर छापलेला हा अंक उत्तम निर्मितीमूल्य, देखणी मांडणी आणि आवर्जून काढून घेतलेले फोटो यामुळेही ओळखला जातो.

रिंगणच्या पहिल्या तीन अंकांची महानामा, जोहार चोखोबा आणि जनाई  ही पुस्तके प्रकाशित झाले आहेत. संत नामदेवांवरील पहिल्या अंकातून नामदेवांचा महाराष्ट्र ते पंजाब हा प्रवास नव्या पैलूंसह वेगळ्या अंगाने वाचकांसमोर आला. कीर्तनकारही रिंगणचे संदर्भ देतात. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे संत नामदेव, संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम या अध्यासनांनी २०१९ साली रिंगण : संतपरंपरेला भिडणारी तरुण दिशा या विषयावर एकदिवसीय चर्चासत्र आयोजित केले होते. तसेच संत नामदेवांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त मालवणच्या नाथ पै सेवांगणने संत नामदेव अंकावर २०२० साली परीक्षा घेऊन स्पर्धा आयोजित केली होती. रिंगणच्या पहिल्या अंकापासून एकूण निर्मितीप्रक्रियेशी तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात जोडलेला आहे. रिंगणच्या माध्यमातून संत साहित्य, परंपरा, विचारधारेकडे बघण्याचा तरुणाईचा दृष्टिकोन बदलत आहे.

रिंगणसाठी आतापर्यंत अनेक लेखक, विचारवंतांनी लिहिले आहे. यात भालचंद्र नेमाडे, अशोक कामत, सदानंद मोरे, श्रीपाल सबनीस, रावसाहेब कसबे, रंगनाथ पठारे, इंद्रजीत भालेराव, तारा भवाळकर, प्रतिमा जोशी, वीणा मनचंदा, मंगला सासवडे, अंजली मालकर, माधवी आमडेकर, अभय टिळक, हरी नरके, ओमश्रीश श्रीदत्तोपासक, भारतकुमार राऊत, रंगनाथ तिवारी, कल्पना दुधाळ, अमृता देसर्डा, हर्षदा परब, शर्मिष्ठा भोसले, विठोबा सावंत या तीन पिढ्यांतील प्रातिनिधिक लेखकांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. वर्तमानात समाजा-समाजाची दुभंगत चाललेली मने सांधण्यासाठी संतसाहित्य, विचार, सहिष्णुता आणि व्यापक विश्वात्मकतेची गरज आहे. अशा परिस्थितीत रिंगणद्वारे संतसाहित्याची नव्या दृष्टिकोनातून मांडणी होत आहे. सातशे वर्षांपूर्वीचे जुने संदर्भ, जुनी भाषा नव्याशी जुळत नाही. तो सांधा जुळवण्याचे काम रिंगण  करीत आहे.

संदर्भ :

  • रिंगण, संत चोखामेळा विशेषांक, २०१४.