कोठावळे, केशव विष्णू : (२१ मे १९२३-५ मे १९८३) ललित आणि दीपावली सारख्या वाङ्मयीन गुणांनी समृद्ध असलेल्या मासिकाचे संचालक, संपादक, मातब्बर प्रकाशक. पुस्तक-विक्रेते, बहुश्रुत वाचक, लॉटरी, ग्रंथजत्रा, ग्रंथप्रदर्शन, मॅजेस्टिक गप्पा इ. उपक्रमांचे प्रेरणास्थान. मॅजेस्टिक कोठावळे अशीही त्यांची  वैशिष्टपूर्ण ओळख आहे. कोल्हापूरजवळच्या पाटगाव या गावी जन्म. लहानपणापासूनच ते बुद्धीने हुशार होते. त्यांना वाचनाची  जबरदस्त आवड होती . घरच्या बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे फारसे शिक्षण घेता आले नाही. मग ते मुंबईत मुगभाटात राहणाऱ्या आत्याआजीकडे आले.

तिच्याकडे राहून ते सातवीची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. पण आर्थिक परिस्थितीवश पुढे शिकू शकले नाहीत. मग त्यांनी गिरगावातच रस्त्यावर, फुटपाथवर गोणपाट टाकून, पुस्तके विकायला सुरुवात केली. रद्दीतील पुस्तके आणायची आणि रस्त्यावर उभे राहून, ओरडत ती विकायची. अशा खडतर परिस्थितीत सुरुवातीचे दिवस त्यांनी घालविले. कुठल्यातरी इमारतीच्या जिन्याखाली, अधिक काळ तर खटाववाडीतील मौज प्रेसच्या बाहेर, कागद पसरून ते झोपत असत आणि दिवसा रस्त्यावरच पुस्तक विक्री करत.

१५ जून १९४२ रोजी गिरगावात औदुंबराच्या छायेत, मॅजेस्टिक सिनेमागृहाशेजारी, ३० चौ.फूटाच्या अगदी छोट्या जागेत त्यांनी पुस्तकाचे दुकान सुरू केले. स्वभाव भिडस्त, मितभाषी, आग्रही, शिस्तीचा, करारी, पण हे घरातील माणसांसाठी. बाकी त्यांना मित्रांची ,मित्र जमवण्याची ओढ होती. रद्दीतील पुस्तके आणून विकणाऱ्या आणि नंतर वाङ्मयीन मूल्ये असलेली गंभीर तसेच समीक्षणात्मक पुस्तके प्रकाशित करणाऱ्या कोठावळेंना लेखनाचीही आवड होती. त्यांनी लहान मुलांसाठी चंद्रकन्या, ठेंगूचे पराक्रम ,जाड्यारड्या, वासिलीचे भाग्य, विदिशेची राजकन्या अशी काही पुस्तके लिहिली आणि केशव कोठावळे प्रकाशनतर्फे १९४८ मध्ये प्रकाशित केली.

१९५२ मध्ये त्यांनी प्रकाशन व्यवसाय सुरू केला. मालतीबाई दांडेकरांचे विवाहानंतर हे मॅजेस्टिकने प्रकाशित केलेले पहिले पुस्तक. पुस्तकावर प्रेम करणाऱ्या कोठावळेंनी पाककला, सौंदर्यसाधना, जगावे कसे, ज्योतिष, अंकशास्त्र, गणिताच्या गमती अशा विविध प्रकारातील पुस्तके प्रकाशित केली. ललित आणि ललितेतर पुस्तकातील विविधता हे मॅजेस्टिकच्या पुस्तकांचे वैशिष्ट्य आहे.असंख्य पुस्तके प्रकाशित करणाऱ्या कोठावळेंनी कुठल्याही पुस्तकावर प्रकाशन क्रमांक कधीही टाकला नाही. प्रकाशनाबाबत ते अतिशय चोखंदळ होते. एखाद्या पुस्तकाच्या हस्तलिखितात दिलेल शीर्षक योग्य आहे की नाही ? यावर ते भरपूर विचार करीत. विचारविनिमय आणि चिकित्सकपणे चर्चाही करीत. शीर्षक सुटसुटीत, समर्पक, ग्रंथविषय नेमका सूचित व्हावा आणि आधीच प्रकाशित झालेल्या दुसऱ्या एखाद्या पुस्तकाच्या शीर्षकाशी साम्य नसावं अशा अनेक गोष्टींवर, अनेक पर्यायांवर ते विचार करीत असत. एकूणच पुस्तकाची निर्मिती चांगली, दर्जेदार व्हावी. याबद्दल ते विलक्षण जागरूक असत.

जयवंत दळवी, मधु मंगेश कर्णिक, वसंत सरवटे, ज्ञानेश्वर नाडकर्णी या लेखक मित्रांच्या प्रेरणेने १९६४ मध्ये त्यांनी ललित मासिक सुरू केले. या ललित मासिकाने साहित्य आणि साहित्यिक यांच्याविषयीचं कुतूहल वाढविण्याचे कार्य केले आहे. ग्रंथप्रेमी मंडळाच्या या मासिकाने मराठीत ग्रंथप्रेमाच्या प्रसाराचे काम केले. मराठी पुस्तकांच्या जाहिराती, प्रथमच नाटकांच्या जाहिरातीसारख्या ललितमध्ये झळकू लागल्या. नव्या-जुन्या लेखकांचे परिचय, आठवणी, वाङ्मयविषयक विचारांची देवघेव, गेल्या महिन्यात प्रकाशित झालेली पुस्तके, त्यांची यादी आणि जोडीला ठणठणपाळाचे सदर यामुळे ते मराठीतील महत्वाचे वाङ्मयविषयक नियतकालिक ठरले.नव्या विषयाचा, लेखकांचा, साहित्याचा शोध घेत राहण्याचे काम ललितने सातत्याने केले. ललितभोवतीही जयवंत दळवी, मधु मंगेश कर्णिक, बा.भ.बोरकर,चिं.त्र्यं.खानोलकर, ज्ञानेश्वर नाडकर्णी, श्री. ज. जोशी, शं. ना. नवरे, आनंद साधले, वि.वा.शिरवाडकर, वसंत सबनीस इ. फार मोठा मित्र परिवार जोडला गेला. १९४५ मध्ये चित्रकार दीनानाथ दलाल यांनी  दीपावली हे नियतकालिक सुरू केले. तेही लोकप्रिय ठरले. १९६९ पासून ते मासिकाच्या स्वरूपात आणि दलालांच्या निधनानंतर ते वार्षिक स्वरूपात प्रसिद्ध होत असते. १९७० मध्ये केशवरावांनी महाराष्ट्र लॉटरीच्या वितरणास सुरुवात केली. या दूरदर्शीपणातून बऱ्यापैकी पैसा त्यांच्या हाती आला. पुढे पुण्यामध्ये वास्तव्यास जाऊन, तिथेही त्यांनी प्रकाशनाचा व्याप सांभाळला. स्वत:ची वास्तूही बांधली.

ललित, दीपावली ही नियतकालिके, लॉटरी आणि मुख्य म्हणजे मॅजेस्टिक प्रकाशनाबरोबर लेखक-वाचकातील सुसंवाद वाढावा, भेटी व्हाव्यात म्हणून एक नवीन ‘मॅजेस्टिक साहीत्यिक गप्पां’हा उपक्रम केशवरावांनी पुण्यातील शनिवार पेठेतील स्वत:च्या वास्तूत सुरू केला (१९७३).

पुणे येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ : गणोरकर,प्रभा,डहाके,वसंत,आबाजी आणि अन्य (संपा),संक्षिप्त मराठी वाङमयकोश (१९२०-२००३),मुंबई,२००४.