सांस्कृतिक पार्श्वभूमीचा संदर्भ घेऊन केलेला रोगपरिस्थितीविज्ञानाचा अभ्यास. समाजातील सर्व लोकांच्या वागण्या-बोलण्याची, विचारांची, भावनांची, मुल्यांची गोळाबेरीज म्हणजे संस्कृती असे म्हणता येईल. अशा सामायिक ज्ञान आणि माहितीतून संकेत, नियम, रूढी, प्रथा, परंपरा या निर्माण होऊन ते एका पिढीकडून पुढच्या पिढीला दिल्या जातात. प्रत्येक माणसाने केलेला विचार, अनुभवलेली भावना, घेतलेला निर्णय आणि केलेली कृती यांचा संस्कृतीवर परिणाम होतो. ती कृती इतरांपेक्षा जेवढी निराळी किंवा तो माणूस जेवढा समाजात मोठा, तेवढा हा परिणाम जास्त होऊ शकतो. कोणत्याही दोन माणसांच्या आंतरक्रियेतून (एकमेकांशी दृश्य किंवा अदृश्य व्यवहार करण्यातून) संस्कृती व्यक्त होते, असे म्हणता येईल; पण कोणतीच आंतरक्रिया घडली नसली, तरी मनातल्या मनात जेव्हा माणूस काहीही करतो, तेव्हा ते संस्कृतीच्या सागराला मिळणारा एक छोटासा प्रवाहच म्हणायला हवा. एकांतवासातला व्यक्ती जगाबद्दल किंवा स्वतःबद्दल काय विचार करतो, कशी भावना ठेवतो, कोणत्या मूल्यांचा स्वीकार करतो इत्यादी बाबीसुद्धा त्याच्या संस्कृतीच्या खुणाच आहेत, असे म्हणता येते.

जेव्हा एखाद्या माणसाच्या मनात किंवा इतरांशी व्यवहारात एखाद्याच्या दुखण्याबद्दल घडणाऱ्या सगळ्या घडामोडींबद्दल तो विचार करतो, तेव्हा सांस्कृतिक पार्श्वभूमीचा संदर्भ ठेवून त्याने आजाराकडे पाहिले, असे होईल. एखाद्या दुखण्याचा समाजामध्ये किती प्रसार आहे, ते दुखणे कोणत्या घटकांना किती प्रभावित केले आहे, हे दुखणे व्हायला जास्त संवेदनशील कोण आहेत, कोण मुळातूनच लवचिक पण कणखर आहेत, त्याच्यामुळे कोण बळी पडलेत, त्यापासून कोण सुटले आणि का, जे बाधित झालेत ते का झालेत अशा सगळ्यांचा त्या विशिष्ट दुखण्याबद्दलचा सामायिक व भिन्न विचार, भावना, संकल्पना, स्पष्टीकरणे, समजुती, कृतीबाबतचे संकल्प आणि प्रत्यक्ष कृती इत्यादींचा शास्त्रीय पद्धतशीर अभ्यास म्हणजे सांस्कृतिक रोगपरिस्थितीविज्ञान होय.

रोगपरिस्थितीविज्ञान आणि वैद्यकीय मानवशास्त्र : रोगपरिस्थितीविज्ञान हे मोठ्या समूहांच्या आजारांचा जास्त करून संख्यात्मक विचार करते; तर वैद्यकीय मानवशास्त्राकडे समाजातल्या प्रत्येक घटकाचा सांस्कृतिक आणि गुणात्मक अभ्यास करण्याची विद्या आहे. एकाची शक्ती दुसऱ्यात नाही आणि दुसऱ्याची विद्या पहिल्यात नाही; म्हणून ही दोन्ही शास्त्रे एकत्र केली, तर सगळ्या समाजातल्या प्रत्येक दुखण्याचा विश्वसनीय व सार्थ अशा दोन्ही गुणांनी युक्त तसेच अनेक मिती असलेले प्रारूपच तयार होईल. हेच काम नेमके सांस्कृतिक पार्श्वभूमीचा संदर्भ घेऊन सांस्कृतिक रोगपरिस्थितीविज्ञान करते.

वैशिष्ट्यपूर्ण अशा माहितीच्या संकलनाच्या व मापनाच्या तंत्रांमुळे सांस्कृतिक पार्श्वभूमीच्या संदर्भाने साथीचे रोग अथवा महामारीच्या पद्धतींचा वापर करून एखाद्या चलाची वारंवारिता आणि तीव्रता या एकाच अंकामध्ये व्यक्त करता येणे शक्य होते. त्यामुळे अशक्तपणाच्या तक्रारींची त्वचारोग विभागातील रुग्णांना वाटणारी कारणे आणि आयुर्वेद विभागातील रुग्णांना वाटणारी कारणे यांची संख्यात्मक व गुणात्मक अशी दोन्ही अंगांनी तुलना ही केवळ दोन विशिष्ट अशा भारित सरासरीच्या किंवा संख्यांच्या तुलनेने करता येते. त्यावरून आपल्याला या दोन विभागातल्या रुग्णांना समजून घेण्यासाठी आपला दृष्टीकोन कसा वेगळा असला पाहिजे, त्यांना आरोग्य शिक्षण देताना कोणत्या वेगळ्या गोष्टींवर किती भर दिला पाहिजे आणि आवाहन करणाऱ्या संदेशांचा गाभा व शब्दरचना कसे असायला पाहिजे हे ठरविता येते. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने विचार केला, तर माहितीचे संकलन, विश्लेषण, रोगनिवारण आणि आरोग्याच्या भरीव विकासासाठीचे उपाय हे निर्दोष शास्त्रीय पायावर उभारलेले असणे अत्यावश्यक आहे. त्यामध्ये रुग्णांच्या प्रत्यक्ष बोलल्या/लिहिल्या गेलेल्या शब्दांनाही रुग्णांची संख्या आणि त्यांची अंकांमधील उत्तरे यांच्याइतकेच महत्त्व आहे. म्हणून अशा प्रकारच्या संशोधनाला ‘मिश्र पद्धतीने केलेले संशोधन’ अथवा संख्यात्मक आणि गुणात्मक असे म्हणने संयुक्तिक ठरते.

गुणात्मक विश्लेषणाची तंत्रे : कोणतीही मुलाखत ध्वनिमुद्रित करून नंतर भाषांतर करून संगणकात विशिष्ट मृदुजालाच्या (सॉफ्टवेअर) साह्याने अभ्यासता येते. बोलण्यातले शब्द, त्यांचे अर्थ, चढ-उतार, वाक्यांवर किंवा विषयांवर दिलेला जोर, विषयांची मांडणी, हाताळलेले विषय, त्यातून ध्वनित होणारे अर्थामागचे अर्थ किंवा एकूणच एखाद्या प्रश्नाच्या पैलूंची व्याप्ती किंवा आवाका यांचा पाहिजे तितका सखोल अभ्यास करता येतो; पण सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे सांख्यिकीय विश्लेषण आणि गुणात्मक मसुदा यांच्यात अंतर्विरोध तर नाही ना, असेल तर किती, तो कोठून येतो, का येतो असे सर्व मुद्दे विचक्षणपणे तपासले, तर माणसाच्या अनुभवाचे अधिक साकल्याने आकलन करता येते.

वैद्यकीय कारणांशिवाय येणारा थकवा व अशक्तपणा हे अशाच एका जटील प्रश्नाचा सखोल अभ्यास करून भविष्यातल्या संशोधनाची सोय करून ठेवलेली आहे. त्या आधी मिरगी, उदासिनता, छिन्नमानसाचा (मनोभाजन) आजार, जुलाबांच्या आजारांची प्रकरणे, कुष्ठरोग, क्षयरोग अशा अनेक दुखण्यांमध्ये या संशोधनांनी मोलाची मदत केली आहे. शिवाय आत्महत्या, दारुच्या व्यसनाचा आजार, झोपडपट्ट्यांमध्ये दिसणारे मानसिक आरोग्याचे प्रश्न, वेगवेगळ्या परिस्थितीतल्या अनुभवाला येणारे नाकारलेपणा अशा मानासिक आणि सामाजिक आरोग्याच्या प्रश्नांचा अभ्यासही या शास्त्रानुसार केल्यास निव्वळ मानसिक किंवा वैद्यकीय शास्त्रांमधून जेथे समाधानकारक आणि परिणामकारक उपाय सापडत नाहीत, तेथे या संशोधनातून दिशादर्शक उत्तरे मिळतात. आफ्रिकेतल्या काही देशांमध्ये दूषित पाणी, जंत, कृमी यांसारख्या जीवघेण्या आजारांवरसुद्धा मोलाचे संशोधन या मार्गाने झालेले आहे. ‘कोविड-१९’च्या पार्श्वभूमीवर ‘आयवरमॅक्टिन’ या औषधासाठी पूर्वी आफ्रिकेतल्या काही देशाच्या सरकारकडून निधी मिळविण्यात या संशोधनाचा मोलाचा वाटा होता.

आजारांवरील उपचार आणि आरोग्याचे रक्षण करण्याबरोबरच सरकारी सेवा अनोख्या पद्धतीने बांधण्याचाही यशस्वी प्रयोग प. बंगालमध्ये राबविण्यात आला. शिवाय शैक्षणिक आणि संशोधनाच्या पद्धतींमध्ये भरीव सुधारणांवरील तंत्रांनी करण्यात यश आले आहे. सामाजिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीचे संदर्भ लक्षात घेऊन लोकांकडून अधिक मोलाची माहिती त्यांना न दुखविता कशी आणि किती मिळविता येईल, हे समाजशास्त्रज्ञ, वैद्यकशास्त्रज्ञ आणि मानवशास्त्रज्ञ यांच्या समोर नित्याचे आव्हान असणार आहे. या माहितीवर वैद्यकीय समस्या आणि सामाजिक प्रश्न सोडविण्यातली परिणामकारकता तर ठरतच असते; पण या अनेक विषयांमधील ज्ञान वाढविण्याचे कामसुद्धा सांस्कृतिक रोगपरिस्थितीविज्ञान हे शास्त्र करित असते.

समीक्षक : शौनक कुलकर्णी