आधुनिक व्यावसायिक संस्था वापरत असलेली किंमत निश्चितीची एक पद्धत. मागणीची लवचिकता ही संज्ञा अनेकदा सर्वसामान्य व्यावसायिकांना समजत नाही. अशा वेळी सरासरी खर्च पद्धत वापरण्यासारखी असल्याने व्यावसायिक संस्था व हिशोबनीस यांना ती परिचित होते. ही पद्धत वापरल्यामुळे एकाच प्रकारचा कच्चा माल वापरून अनेकविध वस्तू बनविणाऱ्या व्यावसायिक संस्थांना ही पद्धत उपयोगी पडते. अशा संस्थांना अनेकविध वस्तुंची किंमत लवचिकता मोजणे हे क्लिष्ट तसेच खर्चिक असल्याने सरासरी खर्च पद्धत सोपी ठरते. अनेकदा व्यवसाय मंडळे आपापल्या वस्तुमालिकेच्या खर्चाविषयी माहिती जाहीर करतात व त्यांच्या सभासदांसाठी खर्च हिशोबाचे मानक ठरवून देतात. हे मानक बाजारात समान किंमत ठरविण्यास उपयोगी ठरते. सरासरी खर्च पद्धत ही बाजारातील अनिश्चितता दूर करण्यास तसेच बाजाराचा समन्वय करण्यास उपयुक्त ठरते; परंतु ती सर्वसाधारण नियम म्हणून वापरली गेली पाहिजे. म्हणजे ती बाजाराचा समन्वय करणारी ठरू शकेल.
सर्वसाधारणपणे विना नफा उद्योगात सरासरी खर्च पद्धत मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. ज्या उद्योग संस्थांना सरकार उद्योगसंस्था सुरू ठेवण्यासाठी अनुदान देत नाही, अशा उद्योगांत सरासरी खर्चाच्या पातळीवर किंमत ठरविली जाते. सरासरी खर्च पद्धतीमध्ये वाजवी नफा अंतर्भूत असतो. त्यामुळे सरासरी खर्च पद्धती वापरल्यास उद्यागसंस्थांना वाजवी नफा मिळतो. वाजवी नफा म्हणजे उद्योगसंस्थांना तिच्या व्यवसायांत टिकून राहण्यासाठी मिळणारा किमान नफा होय. सरासरी खर्च पद्धतीमध्ये उद्योगसंस्था ही नफ्याचे महत्तीकरण करित नसली, तरी भांडवलदार वाजवी व सर्वसाधारण नफा मिळवीत असतात. या पद्धतीत उद्योगसंस्थेची संपूर्ण आर्थिक कार्यक्षमता वापरली जात नाही. तरीसुद्धा सीमांत खर्च किंमत निर्धारण पद्धतीच्या खालोखाल सरासरी खर्च निर्धारण पद्धती वापरली जाते.
अनेकदा उद्योगसंस्था आपल्या कामगारांना जास्त पगार देऊन तसेच व्यवस्थापकांना अनेक सोयी-सुविधा देऊन आपल्या मालाची सरासरी किंमत वाढवितात व आपण नफ्याविना वस्तू विकत असल्याचा भास निर्माण करतात; मात्र अशा परिस्थितीत किमती विनाकारण वाढविल्या जातात. त्यामुळे साधनांच्या वाटपात आर्थिक अकार्यक्षमता येऊ शकते. अनेकदा उद्योगसंस्था आपल्या संस्थेची अकार्यक्षमता लपविण्यासाठी जास्त सरासरी खर्च दाखवून किमती उच्च पातळीवर नेऊन ठेवतात. अशा वेळी जरी उद्योगसंस्था ना नफा या तत्त्वाचा उद्योग करित असल्याचे भासवीत असले, तरी प्रत्यक्षात त्याचा भार ग्राहकांवर येऊ शकतो. विशेषत: शासकीय उद्योगसंस्था सरासरी किंमत जास्त दाखवून आपली अकार्यक्षमता झाकण्याचा प्रयत्न करित असल्याचे आढळून येते. सरासरी खर्च पद्धती वापरल्यामुळे बाजारातील अनिश्चितता दूर ठेवता येऊ शकते.
समीक्षक : ज. फा. पाटील