अत्युच्च भार किंमत निश्चिती ही किंमत ठरविण्याची अशी व्यूहरचना आहे की, ज्यामध्ये वस्तू व सेवा यांची मागणी जास्त असताना जास्त किंमत आकारली जाते आणि वस्तू व सेवांची मागणी कमी असताना कमी किंमत आकारली जाते. वेगवगळ्या कालावधीमध्ये वस्तू व सेवांची मागणी वेगवेगळी असते. उदा., सकाळी कार्यालयात जाताना व संध्याकाळी कार्यालयातून घरी परत येताना रस्त्यामध्ये खूप वाहतूक असते; तथापि रात्री उशीरा जेवण करून घरी परत येताना रस्त्यामध्ये तुरळक वाहने आढळतात. अशा रितीने सकाळी व संध्याकाळी रस्त्याची मागणी जास्त असते आणि रात्री उशीरा ही मागणी खूपच कमी असते. गर्दीच्या काळातील मागणीचे योग्य व्यवस्थापन केले नाही, तर पुरवठ्यापेक्षा मागणी जास्त होईल. क्षमतेवर अडथळे आल्यामुळे सिमांत खर्चावर दबाव येऊन तो वाढेल.

दिलेल्या आकृतीमध्ये म१ मागणी वक्र गर्दीच्या वेळेची मागणी दर्शवितो. म२ मागणी वक्र गर्दी नसतानाची मागणी दर्शवितो. सिमांत प्राप्ती ही सिमांत खर्चाइतकी असेल, त्या वेळी व्यवसाय संस्थेकडून वस्तुचे नग (पुरवठा) निश्चित केले जाते. तसेच मागणीवक्राच्या आधारे किती किंमत आकारली जाईल, हे ठरविते. मागणी जास्त असेल, त्या वेळी व्यवसाय संस्था म१ इतके उत्पादन आणि विक्री करेल. मागणी जास्त असताना क१ आणि मागणी कमी असताना क२ अशी किंमत असेल. क२ ही किंमत क१ पेक्षा कमी आहे. अशा रितीने व्यवसाय संस्था कालावधीप्रमाणे मूल्यभेद करणारी संस्था असेल. उदा., गोव्यासारख्या पर्यटन स्थळातील हॉटेल्स नोव्हेंबर ते मार्च या कालावधीमध्ये पर्यटकांकडून जास्त दर आकारतात व उरलेल्या कालावधीमध्ये कमी दर आकारतात. नोव्हेंबर ते मार्च या काळात गोव्यातील हवामान सुखकारक असते. तेथे डिसेंबर महिना महोत्सवाचा असतो. या काळात तेथे मोठ्या प्रमाणात मासे उपलब्ध होत असल्याने मासे आवडणाऱ्या लोकांना विविध प्रकारचे मासे तेथे खायला मिळतात. या विविध कारणांमुळे नोव्हेंबर ते मार्च या काळात लोकांचा गोव्याकडे जास्त ओघ असतो. त्यामुळे निश्चितच हॉटेल्सची मागणी वाढून त्याच्या किमतीही वाढतात. याउलट, गोव्यातील उन्हाळा तापदायक असतो. पावसाळ्यात अती पाऊस पडतो. त्यामुळे एप्रिल ते ऑक्टोबर या काळात फारच थोडे पर्यटक गोव्यात येतात. त्यामुळे हॉटेल्सची मागणी कमी असते. हंगाम नसलेल्या या काळात हॉटेल्सचे दरसुद्धा कमी आकारले जातात.

अत्युच्चभार किंमत निश्चिती हा मूल्यभेदाचाच एक प्रकार आहे. वीज पुरवठ्यासारख्या काही  बाबींमध्ये सरकारी संस्थाच सेवा पुरवितात. या संस्था वस्तू व सेवांची किंमत ही सिमांत खर्चाइतकी ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि सामाजिक कल्याण वाढवितात. या किंमत धोरणामुळे कार्यक्षमता वाढविता येते.

वेगवेगळ्या बाजारात मागणीची लवचिकता वेगवेगळी असते. त्यामुळेच मूल्यभेदधोरण यशस्वी होते. मागणीची लवचिकता ठरविणे कठीण असते. ग्राहक जेव्हा नवीन परिस्थितीशी वस्तू व सेवांची मागणी जुळवून घेतात, तेव्हा मागणीच्या लवचिकतेमध्ये बदल होतो. दीर्घ काळातील अत्युच्च भार किंमत निश्चिती या धोरणाचे यश अस्पष्ट आहे.

संदर्भ : Pindyck, Robert S.; Rubinfeld, Daniel L.; Mehta, Prem L., Microeconomics, 2009.

समीक्षक : दि. व्यं. जहागीरदार