महाराष्ट्रातील प्राचीन अवशेषांचे एक स्थळ. ताम्रपाषाणयुगीन सावळदा संस्कृती ते जोर्वे संस्कृती या दरम्यानच्या सांस्कृतिक कालखंडांची सलग माहिती येथे मिळत असल्याने, तसेच सिंधू संस्कृतीच्या उत्तर हडप्पा काळातील सर्वांत दक्षिणेकडील पुरातत्त्वीय स्थळ असल्याने दायमाबादला भारतीय पुरातत्त्वीय इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे.

दायमाबाद येथील ब्राँझच्या वस्तू.

गोदावरीची उपनदी असलेल्या प्रवरा या मोठ्या नदीच्या डाव्या तीरावर अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर या शहरापासून १८ किमी. अंतरावर आग्नेय दिशेस दायमाबाद असून त्या ठिकाणी सध्या वसती नाही. या स्थळाचा शोध भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाचे बी. पी. बोपर्डीकर यांनी लावला. दायमाबाद येथे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणातर्फे १९५८-५९ (नेतृत्व : म. न. देशपांडे), १९७४-७५ (नेतृत्व : एस. आर. राव) व पुन्हा १९७५-७६ व १९७८-७९ मध्ये (नेतृत्व : एस. एस. साळी) असे एकूण चार वेळा उत्खनन करण्यात आले असून या उत्खननांमधून ताम्रपाषाणयुगीन दायमाबाद विषयी भरपूर माहिती मिळाली आहे. दायमाबाद येथील पहिली दोन उत्खनने मर्यादित स्वरूपाची होती व नंतर मिळालेल्या पुराव्यांमुळे त्या वेळी काढलेल्या निष्कर्षांमध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे.

पहिल्या उत्खननात एकूण तीन कालखंडांतील वसाहतीचे पुरावे मिळाले होते. पहिल्या कालखंडाच्या निक्षेपात जास्त प्रमाणात मिळालेली मृद्भांडी राखाडी रंगांची होती. या मृद्भांड्यांत व ब्रह्मगिरी (कर्नाटक) येथे मिळालेल्या मृद्भांड्यांमध्ये साम्य होते. दुसऱ्या कालखंडांत माळवा संस्कृतीची मृद्भांडी आढळली होती, तर तिसऱ्या कालखंडात जोर्वे संस्कृतीची मृद्भांडी मिळाली होती; परंतु १९७५-७६ व १९७८-७९ मध्ये शंकर साळी यांनी केलेल्या उत्खननात दायमाबादला एकूण पाच कालखंडांत वसाहत झाल्याचे दिसून आले. या उत्खननानुसार शंकर साळी यांनी दिलेला सांस्कृतिक कालक्रम खालीलप्रमाणे आहे :

कालखंड – ५      जोर्वे संस्कृती

कालखंड – ४      माळवा संस्कृती

कालखंड – ३      दायमाबाद संस्कृती (फिकट तपकिरी-पिवळसर रंगाची मृद्भांडी)

कालखंड – २      उत्तर हडप्पा संस्कृती

कालखंड – १      सावळदा संस्कृती

दायमाबादच्या नमुन्यांच्या रेडिओकार्बन तिथी उपलब्ध असून त्यांमधील काही सर्वसाधारणपणे इनामगावसारख्या इतर पुरातत्त्वीय स्थळांवरील रेडिओकार्बन तिथींशी मिळत्याजुळत्या आहेत. काही रेडिओकार्बन तिथी संदूषणामुळे परस्परविरोधी होत्या.

दायमाबाद येथील चित्रित भांडे.

सावळदा कालखंड :

दायमाबादची पहिली वसाहत सावळदा संस्कृतीच्या लोकांची होती; परंतु वसाहतीचा विस्तार मर्यादित म्हणजे अंदाजे ३ हेक्टर होता व ही वसाहत नदीकाठच्या काळ्या मातीच्या अरुंद पट्ट्यात होती. या कालखंडातील घरे मातीच्या भिंतीची असून घरांमध्ये एक, दोन किंवा तीन खोल्या आढळल्या. एक खोली असणारे सर्वांत छोटे घर ३. ४ मी. लांब व १.६ मी. रुंदीचे होते. तर सर्वांत मोठे घर ७ मी. लांब व ५ मी. रुंदीचे होते. घरातील जमीन काळी-पिवळी माती वापरून बनवत असत. काही घरांमध्ये सुशोभिकरणासाठी गोड्या पाण्यातील शिंपल्यांचा वापर केला असल्याचे दिसते.

सावळदा संस्कृतीचे लोक तांब्याच्या वस्तू कमी प्रमाणात वापरत असावेत. या काळातल्या पुरावशेषांमध्ये दगडाचे पाटे-वरवंटे, कार्नेलियन व अगेटचे मणी, तीराग्रे व गारगोटीपासून बनवलेली सूक्ष्मास्त्रे यांचा समावेश आहे. सावळदा कालखंडातील मृद्भांडी मध्यम पोताची व कमी गतीच्या चाकावर बनवलेली आहेत. त्यांच्यावर तपकिरी अथवा  चॉकलेटी रंगाचा दाट लेप दिलेला आढळतो. मृद्भांड्यांवर प्रामुख्याने लाल रंगात हत्यारे, अवजारे, हरिण, मासे, वनस्पती व भौमितिक आकार असे विविध चित्रण केलेले दिसते. काही मृद्भांड्यांवर काळ्या व पांढऱ्या रंगांत चित्रे आहेत. या मृद्भांड्यांना सावळदा मृद्भांडी असे म्हणतात. या मृद्भांड्यांखेरीज तकाकी आणलेली करडी व हाताने बनवलेली जाड तांबडी मृद्भांडी देखील मिळाली आहेत. सावळदा कालखंडातील लोक अनेक धान्ये पिकवत असत.  या काळातल्या निक्षेपात बार्ली (सातू), वाटाणे, मसूर, हरभरा व कुळीथ यांचे अवशेष मिळाले आहेत.

उत्तर हडप्पा कालखंड :

उत्तर हडप्पा कालखंडात दायमाबादच्या वसाहतीचा आकार वाढलेला दिसतो. तो २० हेक्टर असावा, असा अंदाज बांधण्यात आला आहे. या कालखंडाचे वैशिष्ट्य म्हणजे दायमाबादला प्रथमच कच्च्या विटांचा उपयोग सुरू झाला. एका फुटलेल्या कच्च्या विटेची लांबी ३० सेंमी. व जाडी ८ सेंमी. असल्याचे दिसून आले आहे. कच्च्या विटांची भिंत बनवताना विटा सांधण्यासाठी काळ्या मातीचा वापर केला होता. थडग्यांसाठीही कच्च्या विटांचा वापर केला गेला होता. थडग्यांसाठी वापरलेल्या विटांचे दोन आकार आढळले. या दोन्ही प्रकारच्या विटांच्या लांबी, रुंदी व जाडीचे गुणोत्तर ४:२:१ असेच होते.

उत्तर हडप्पा कालखंडात जाड, दणकट, जलद चाकावर बनवलेली आणि उत्तम पोताची तांबडी मृद्भांडी मिळाली. या मृद्भांड्यांचा गाभा लाल अथवा विटकरी रंगाचा असून मऊ मातीत रेती व चुना मिसळून ही तयार केली असल्याचे दिसते. बाहेरच्या बाजूस तपकिरी अथवा लाल रंगाचा दाट लेप दिलेला आहे. या मृद्भांड्यांवर काळ्या रंगाने अनेक प्रकारची चित्रे काढलेली आहेत. या मृद्भांड्यांचे आकार विविध असून त्यात मणिसम काठ असणारे घडे, सपाट बुडाचे घडे, स्टँडवरच्या थाळ्या व वाडगे यांचा समावेश आहे.

दायमाबादच्या वसाहतीचा उत्तर हडप्पा संस्कृतीशी असणारा संबंध स्पष्ट करणारे पुरावे दोन घरांमध्ये मिळाले आहेत. घर क्रमांक १६ मध्ये गुंडीच्या आकाराची मातीची मुद्रा मिळाली. या मृण्मुद्रेवर सिंधू संस्कृतीच्या लिपीतले एक चिन्ह आहे. त्याचप्रमाणे बाजूच्या घर क्रमांक १७ मध्ये अशाच प्रकारची सिंधू लिपीतील दोन चिन्हे असणारी मृण्मुद्रा मिळाली. या खेरीज मृद्भांड्यांच्या तीन तुकड्यांवर सिंधू लिपीतील चिन्हे आढळली. या कालखंडात मृद्भांड्यांचा वैशिष्ट्यपूर्ण तुकडा मिळाला. या चंद्रकोरीसारख्या आकाराच्या तुकड्याच्या कडा घासून गोलाकार केल्या आहेत. या तुकड्यावर वाघ म्हैस/रेड्यावर पाठीमागून हल्ला करत असल्याचे चित्रण आहे. या खेरीज तांबे अथवा ब्राँझची कुऱ्हाड व सोने-शिसे यांचा एक मणीदेखील उत्तर हडप्पा संस्कृतीच्या निक्षेपात मिळाले आहेत.

रेडिओकार्बन तिथींच्या साक्षेपी अभ्यासावरून असे दिसते की, उत्तर हडप्पा कालखंड अपेक्षेनुसार इ. स. पू. १८०० (१७६० अधिकउणे २१०) होता.

माळवा संस्कृतीचा कालखंड :

या कालखंडातील (कालखंड-३) निक्षेपात वैशिष्ट्यपूर्ण अशा फिकट तपकिरी-पिवळसर रंगाच्या मृद्भांड्यांचे अवशेष मिळाले आहेत. ही या संस्कृतीची ओळख पटवणारी खूण आहे, असे उत्खननकर्ते शंकर साळी यांचे मत असले, तरी ते इतर अभ्यासकांनी ग्राह्य मानलेले नाही. ही मृद्भांडी मध्यम पोताची, कमी गतीच्या चाकावर बनवलेली व कमी भाजलेली आहेत. ही भांडी तयार करण्यासाठी बनवलेल्या मातीत वनस्पतीजन्य पदार्थांचा वापर केलेला आहे. बाह्य लेप अतिशय पातळ असून अनेक ठिकाणी लेपाचे पोपडे निघालेले दिसतात. या मृद्भांड्यांवर काळ्या रंगाने अनेक प्रकारची चित्रे काढलेली दिसतात. दायमाबादला तिसऱ्या कालखंडात मिळालेल्या मृद्भांड्यांच्या प्रकारावरून या कालखंडाचे दायमाबाद संस्कृतीचा कालखंड असे नामकरण करण्यात आले असले, तरी या संस्कृतीची फारशी माहिती उपलब्ध नाही. आता ही वेगळी संस्कृती आहे, हे मत कालबाह्य झालेले असून शंकर साळी यांनी दायमाबाद संस्कृतीचा म्हणून वर्णन केलेला थर हा माळवा संस्कृतीचा प्रारंभिक थर आहे, असे आता मानले जाते.

माळवा संस्कृतीच्या निक्षेपात अनेक घरांचे अवशेष मिळाले आहेत. माती व कुडाची घरे या काळात प्रचलित होती. तसेच आयताकृती आकाराची ही घरे प्रशस्त असून दरवाजासमोर आयताकृती अथवा अर्धचंद्राकाराच्या पायऱ्या असत. घरांच्या भिंतींची जाडी ८ ते ३० सेंमी. असल्याचे दिसून आले. माळवा संस्कृतीच्या वैशिष्ट्यपूर्ण  मृद्भांड्यांशिवाय या काळातील निक्षेपात काळी-लाल व राखी रंगाची चकचकीत मृद्भांडी मिळाली आहेत. या काळात मिळालेल्या अनेक घरसदृश रचना यांचा संबंध धार्मिक बाबींशी असावा, असे त्यात मिळालेल्या अग्निकुंडांवरून मानले जाते. तसेच एका घरात दोन चुली व एक तांब्याचे पाते मिळाले असल्याने ते तांबटकाम करणाऱ्याचे घर असावे, असे मानले गेले आहे.

जोर्वे संस्कृतीचा कालखंड :

दायमाबाद येथील वसाहतीचा हा शेवटचा कालखंड असून त्यात जोर्वे संस्कृतीची नमुनेदार मृद्भांडी मिळाली आहेत. त्यांचा रंग गडद लाल असून त्यांच्यावर चित्रे काढलेली दिसतात. या कालखंडात वसाहतीचा आकार वाढून तो ३० हेक्टर एवढा झाला असला, तरी एकूण आकृतीबंधात फारसा फरक पडलेला दिसत नाही. उपलब्ध पुराव्यांचा विचार करता, माळवा संस्कृतीच्या मृद्भांड्यांमधून जोर्वे संस्कृतीची मृद्भांडी उत्क्रांत झाली, असे मत मांडण्यात आले आहे. जोर्वे सांस्कृतिक थरांमध्ये पाच काळातील रचना मिळाल्या आहेत. यातील चौथ्या रचनेत फक्त गोलाकार घरे होती; तर इतर मात्र चैाकोनी अथवा आयताकृती होती. पूर्वीच्या काळामधील पिके या काळातही घेतली जात होती. तसेच या थरांमध्येही सूक्ष्मास्त्रे मिळतात. जोर्वे थरात एक दंडगोलाकृती मुद्रा मिळाली असून त्यावर घोडा जोडलेल्या रथाचे चित्रण आहे. तसेच मातीच्या एका वस्तूवर ऋषीचे व त्याच्या शिष्यगणाचे चित्रण असल्याचे उत्खनन करणाऱ्यांचे मत असले, तरी ते सर्वमान्य झालेले नाही.

ब्राँझच्या वस्तू :

दायमाबादला जमिनीत खणत असताना काही मेंढपाळांना योगायोगाने ब्राँझच्या चार वस्तू (एकूण वजन ६० किग्रॅ.) मिळाल्या. या वस्तू (बैल जुंपलेला रथ, रेडा, गेंडा व हत्ती) आता ’दायमाबाद ब्राँझेस म्हणून ओळखल्या जातात. या चार वस्तू अत्यंत सुस्थितीत असून त्यांना चाके आहेत. या अत्यंत कलात्मक बनावटीच्या वस्तू कोणत्या काळातील आहेत, याबद्दल संशोधकांमध्ये एकमत नाही. मधुकर केशव ढवळीकर त्यांना हडप्पा संस्कृतीच्या मानतात. या वस्तूंमध्ये अर्सेनिक या मूलद्रव्याचे प्रमाण अधिक आहे. त्यावरून डी. पी. अग्रवाल यांनी या वस्तूंच्या हडप्पा सांस्कृतिक संदर्भाबद्दल शंका व्यक्त केली आहे. उपलब्ध पुराव्यांचा अभ्यास करून दिलीप चक्रवर्ती यांनी दायमाबादच्या ब्राँझच्या वस्तू अरवली पर्वताराजीच्या प्रदेशातून दख्खनमध्ये आल्या असाव्यात, असे म्हटले आहे.

संदर्भ :

  • Agrawal, D. P.; Krishnamurthy, R. V. & Kusumgar, Sheela, ‘New Data on Copper Hoards and the Daimabad Bronzesʼ, Man and Environment,  II : 41-46, 1978.
  • Chakrabarti, D. K. India – An Archaeological History, Oxford University Press, New Delhi, 1999.
  • Deshpande, M. N. & Sali, S. A. ‘Daimabadʼ Encyclopaedia of Indian Archaeology (A. Ghosh Ed.), New Delhi: Munshiram Manoharlal, 1989.
  • Dhavalikar, M. K. Indian Protohistory, Books and Books, New Delhi, 1997
  • Sali, S. A. Daimabad 1976-79, Archaeological Survey of India, New Delhi, 1986.
  • देव, शां. भा. महाराष्ट्राचा इतिहास  (खंड १, भाग १), महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई, २००२.

                                                                                                                                                                                      समीक्षक : सुषमा देव