तेरूक्कुत्तु : तामिळनाडू राज्यामधील पारंपरिक लोकनाट्य शैलीमध्ये तेरूक्कुत्तु या लोकनाट्य शैलीस विशेष स्थान आहे. तेरूक्कुत्तु याचा सामान्य शाब्दिक अर्थ म्हणजे रस्त्यावर सादर केले जाणारे नाट्य. हे मुख्यतः वर्षा देवी मारीयम्मन आणि द्रौपदी यांच्या वार्षिक मंदिर उत्सवावेळी सादर केले जाते. पुत्रप्राप्ती आणि शेतामध्ये चांगल्या उत्पन्नासाठी दोन्ही देव देवतांची आराधना तेरूक्कुत्तु या नृत्याच्या माध्यमातून केली जाते. पारंपरिक व पौराणिक कथा यांचे सादरीकरण सहज सोपे, स्पष्ट स्वरूपात असते. पूर्वीच्या काळी तेरूक्कुत्तु याचा विषयांमध्ये प्रामुख्याने द्रौपदी जीवनावर आधारित आठ नाट्याचे सादरीकरण केले जात असे. परंतु सद्यस्थितीत ही नाट्यछटा एका रात्रीतच तर कधीकधी आठ ते नऊ रात्रीमध्ये सादर केली जाते. तेरूक्कुत्तु हे मनोरंजन, एक विधी आणि सामाजिक शिक्षणाचे माध्यम आहे. तेरूक्कुत्तु हा शब्द तेरु (रस्ता) आणि कुट्टू (थिएटर) शब्दातून आला आहे.

नाट्याची सुरुवात गणेश वंदनेने होते. गणेशाचा मुखवटा परिधान करून एक कलाकार गणेश वंदनवेळी नृत्य प्रारंभ करतो. त्यानंतर इतर देवदेवतांची प्रतिकात्मक रुपाने आराधना केली जाते. देव-देवतांच्या आराधनेनंतर काट्टीयक्कारन हे सूत्रधाराच्या भूमिकेत प्रवेश करतात व नाटकाचा परिचय देतात. याबरोबरच राजा, राज्य आणि राज्यकारभार यासंबंधी विविध गोष्टीचे सादरीकरण करतो. सूत्रसंचालकाच्या भूमिकेनंतर नाटकातील विविध पात्र मंचावर येऊन स्वतः आपला परिचय देताना  सर्व कलाकार ‘दारु’ नृत्य सादर करतात. या नृत्य सादरीकरणातून कलाकार आपली कला साधना आणि परिपक्वता सिद्ध करतात. तेरूक्कुत्तु या नाट्यशैलीची विशिष्ट लिखित पटकथा नसल्यामुळे कलाकार अत्यल्प शब्दांच्या माध्यमातून संवाद करतात. अधून-मधून नृत्य सादर करतात. तेरूक्कुत्तुच्या संगीतामध्ये शास्त्रीय संगीताचा अधिक वापर केला जातो. शम्मुगम पिल्लई यांनी तेरूक्कुत्तुची तुलना तमिळ महाकाव्य सिलापत्तिकरमशी  केली आहे. सिलापत्तिकरम  कथा अजूनही तेरूक्कुत्तु कलाकारांद्वारे सादर केली जाते, तेरूक्कुत्तु नाटक महाभारत या महाकाव्यातील प्रत्येक कथांच्या प्रमाणेच सुरू होते आणि समाप्त होते आणि कलाकार गद्य कादंबरी यानुसार कथा सादर करतात. सिलापत्तिकरम  आणि तेरूक्कुत्तु  हे कला प्रकार पवित्रता आणि स्त्रियांच्या नैतिक सामर्थ्याभोवती केंद्रित आहेत.

तेरूक्कुत्तु या नाट्यशैलीतील सर्व पात्र विशिष्ट वेशभूषा आणि रंगभूषाद्वारे आपला परिचय देतात. नायकाचा मुकुट किंवा शिरोभूषण खूप उंच असते, ज्यामध्ये रंगीत आरसे व विविध रंग यांचा प्रयोग केला जातो. खलनायकाच्या पात्रासाठी लाल रंग उपयोगात आणला जातो, तर काळ्यापांढर्‍या टिकल्यांच्या माध्यमातून त्याच्या पात्रातील भयानकता सादर केली जाते. अन्य विदूषक पात्रांना कोमाळी म्हणतात. हे पात्र त्रिकोणी टोपी व घोळदार पायजमा घालतात. तेरूक्कुत्तु या शैलीच्या संगीत वाद्यांमध्ये नागस्वरम या वाद्याप्रमाणे असणारे वाद्य, कुरकुजा, मध्दलम आणि टाळ यांचा प्रयोग केला जातो. संगीतामध्ये शास्त्रीय संगीत आणि लोकसंगीत यांचं मिश्रण केलेले असते. नृत्याच्या मध्यंतरानंतर स्वांग या नृत्य शैलीप्रमाणे दर्शकांच्या मनोरंजनाचे कार्यक्रम सादर केले जातात. तेरूक्कुत्तु हे गीत, संगीत, नृत्य, नाटक आणि कौशल्यपूर्ण मंच प्रदर्शनाचे उत्तम संयोजन आहे.

अनेक विद्वान तेरूक्कुत्तु, यक्षगान आणि कथकली सारख्या शेजारील इतर प्रादेशिक नाटक प्रकारांमधील समानता लक्षात घेतात. सामान्यत: तेरूक्कुत्तु ही शास्त्रीय कला प्रकारांऐवजी एक लोककला मानली जाते. अलिकडच्या काळात, काही तेरूक्कुत्तु गटांनी व्यावसायिक गट म्हणून कार्य करण्यास सुरुवात केली आहे. द्रौपदीच्या भूमिकेवर भर देऊन महाभारत  कथेच्या अधिनियमात अनेक तेरूक्कुत्तु सादरीकरण करतात. रामायणा वरील तेरूक्कुत्तु नाटक मारीयम्मान उत्सवात सादर केले जातात आणि काही नाटकांमध्ये स्थानिक देवतांचा समावेश आहे.

तमिळ दिनदर्शिकेच्या पहिल्या महिन्यात चित्तराईमध्ये सुरू होणारा एकवीस दिवसीय मंदिर उत्सव यासह धार्मिक उत्सवांचा एक भाग म्हणजे तेरूक्कुत्तु होय. तेरूक्कुत्तु सादरीकरण या उत्सवाच्या मध्यात सुरू होते, आणि दंडवत या दिवसापर्यंत ते सुरू असते. तेरूक्कुत्तु नाटकांच्या मुख्य कथांमध्ये खालील कथा समाविष्ट आहेत – १. द्रौपदी कल्याणम (द्रौपदीचे लग्न), २. सुपत्तीराय कल्याणम (सुभद्राचे लग्न), ३. अल्ली अर्जुनन (अर्जुनचे अल्लीबरोबर लग्न), ४. पांचाली कॅपटम (द्रौपदीचे व्रत), ५. अर्जुनान तप (अर्जुन तप), ६. कृष्णन टीटू (कृष्णाचे कार्य), ७. अभिमन्यू कंटाई (अभिमन्यूचा पराभव), ८. कर्ण मोक्षयम (कर्णाचा पराभव), ९. पतीनेटम पोर (अठराव्या दिवसाची लढाई), १०. अरावण काळापली (रणांगणातील अरावनचे बलिदान). फ्रेंच थिएटर ग्रुप थॅट्रे डु सोइल याने तेरूक्कुत्तुच्या घटकांचा उपयोग केला ज्यामध्ये द वेप ऑफ द्रौपदी आणि कर्णाचा पराभव या दोन कथांचा त्यांच्या ए रूम इन इंडिया  या नाटकात समावेश होता.

संदर्भ :

  • Varadpande, Manohar Laxman, History of Indian Theatre, Abhinav Publications, 1990.