हिमालय पर्वतात शेकडो सुंदर सरोवरे आहेत. जगातील सर्वाधिक उंचीवरील सरोवरांमध्ये येथील सरोवरांचा समावेश होतो. वाढत्या उंचीनुसार सरोवरांचा आकार कमी होताना दिसतो.
येथील सरोवरांच्या निर्मितीची कारणे वेगवेगळी आहेत. हिमोढांच्या संचयनामुळे, हिमनद्यांच्या अडथळ्यांमुळे, भूस्खलनामुळे, कडे कोसळल्यामुळे किंवा हिमप्रपातांमुळे निर्माण झालेल्या बांधांमुळे तसेच भूहालचालींमुळे येथील सरोवरांची निर्मिती झालेली आहे. काही सरोवरे तात्पुरत्या स्वरूपाची असतात. अनेक सरोवरे हिवाळ्यात गोठलेली असतात. अधिक उंचीच्या भागात विखुरलेल्या स्वरूपात अनेक सरोवरे आढळतात. अनेक सरोवरे हिरव्यागार दाट वनश्रीने आच्छादलेल्या टेकड्यांनी किंवा हिमाच्छादित पर्वतश्रेण्यांनी वेढलेली आहेत. त्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने ती प्रसिद्ध असून त्यांतील काही सरोवरे पवित्र स्थळे म्हणून महत्त्वाची आहेत.
हिमालयाचा अगदी पश्चिम भाग जम्मू व काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांनी व्यापला असून या भागांत अनेक सरोवरे आहेत. त्यांपैकी श्रीनगर येथील दल सरोवर तर जगप्रसिद्ध पर्यटन केंद्र आहे. झेलम नदीच्या पात्रात प्रसिद्ध वुलर सरोवर आहे. काश्मीर खोऱ्यात मानसबल, गंगाबल, गडसर (येमसर), शेषनाग, विशनसार, कृष्णसार, निगीण; जम्मू खोऱ्यात मान्सर व सुरिनसार सरोवरे आणि लडाखमध्ये पंगाँग त्सो, त्सो मोरिरी (मोरिरी), त्सो कर, यारब त्सो, क्यागर त्सो ही सरोवरे आहेत. लडाख आणि रूप्शू प्रदेशातील सॉल्ट सरोवर, पंगाँग त्सो (सरोवर) व त्सो मोरारी ही सरोवरे सातत्याने आटत असून त्यांचे पाणी दिवसेंदिवस मचूळ बनत आहे. पहलगामवरून अमरनाथकडे जाणाऱ्या मार्गावर असलेले शेषनाग सरोवर हिमोढाच्या संचयनामुळे निर्माण झालेले आहे. कोलहोई (५,४२५ मी.) शिखरापासून बाहेरच्या बाजूस पसरलेल्या लहान खोऱ्यांमध्ये असणारी हर नाग व दूध नाग ही सरोवरे याच प्रकारची आहेत. लडाखमधील पंगाँग सरोवरातून भारत आणि तिबेट (चीन) यांदरम्यानची प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (लाइन ऑफ अॅक्चुअल कंट्रोल – एलएसी) जाते. येथे भारत-चीनमध्ये सीमावाद आहे. हे निसर्गसुंदर सरोवर हिवाळ्यात पूर्णपणे गोठलेले असते. याला ‘हाय ग्रासलँड लेक’ असे संबोधले जाते. काश्मीरमधील श्योक नदीच्या खोऱ्यात अनेकदा हिमनदीच्या अडथळ्यामुळे तात्पुरत्या स्वरूपाची सरोवरे निर्माण होतात.
हिमाचल प्रदेश या राज्यातील हिमालयाच्या भागात रेणुका, रेवलसर, मचीआल (मच्याल), सूरजताल (सूर्यताल), चंद्रताल, दशैर, धनकर, ब्रिघू, महाकाली, लामा दल, चंदर नौन
(चंद्रनहान) ही प्रमुख सरोवरे आहेत. राज्याच्या सिरमौर जिल्ह्यात रेणुका सरोवर असून त्याच्या परिसरात रेणुका अभयारण्य व राखीव जंगल आहे. मंडी जिल्ह्यातील रेवलसर व मचीआल ही दोन पवित्र मानली जाणारी सरोवरे आहेत. झास्कर पर्वतश्रेणीतील बारा लाचा ला खिंडीच्या खालील भागात लेह-मनाली महामार्गालगत सूरजताल सरोवर आहे. लाहूल व स्पिती या जिल्ह्यांत चंद्रताल सरोवर असून पाण्याचा बदलता रंग हे याचे वैशिष्ट्य आहे. कुलू व लाहूल जिल्ह्यांना जोडणाऱ्या रोहतांग खिंडीजवळ दशैर व स्पिती या जिल्ह्यांत धनकर सरोवर आहे.
उत्तराखंड राज्यातील हिमालयात नैनिताल, भीमताल, हेमकुंड, रूपकुंड (मिस्टरी/स्केलेटन्स), सत्ताल, केदारताल, दोदीताल, देवरिया ताल, भुलाताल, खुर्पाताल, सातोपंथताल, नौकुचिआताल इत्यादी सरोवरे आहेत. नैनिताल जिल्ह्यात अनेक सरोवरे असल्यामुळे त्याला ‘सरोवरांचा जिल्हा’ असे म्हटले जाते. सत्ताल ही गोड्या पाण्याच्या सात सरोवरांची मालिका आहे. चामोली जिल्ह्यातील हेमकुंड सरोवर हिमाच्छादित सात टेकड्यांनी वेढलेले आहे. त्यामुळे त्याला बर्फाचे सरोवर (लेक ऑफ स्नो) असे म्हटले जाते. चामोली जिल्ह्यातच असलेल्या रूपकुंड सरोवराला स्थानिक लोक अद्भुत किंवा सांगाड्यांचे सरोवर असे म्हणतात; कारण या सरोवराच्या काठावर शेकडो मानवी सांगाडे सापडले होते. अचानक आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे येथे आलेले यात्रेकरू मृत्युच्या तावडीत सापडले असावेत. त्यांचेच हे सांगाडे असावेत.
पश्चिम बंगाल राज्याच्या हिमालयीन प्रदेशातील दार्जिलिंग जिल्ह्यात मिरिक (सुमेंदू), तसेच सेंचाल व जोरपोख्री (दोन जुळी सरोवरे) ही सरोवरे आहेत. भारतातील सिक्कीम राज्याचे स्थान हिमालयीन पर्वतश्रेण्यांमध्येच असून येथेही अनेक सरोवरे आहेत. ती पर्यटकांची प्रमुख आकर्षणे असून त्यांपैकी काही पवित्र स्थळे आहेत. स्तॉमगो, मेनमेचो, गुरुडोंगमर, खेचीओपाल्री, क्रोज, त्सो ल्हामो (चोलामू), समिती, लँपोकारी, ग्रीन लेक ही येथील प्रमुख सरोवरे आहेत. राजधानी गंगटोकपासून सुमारे ४० किमी.वरील त्सॉमगो (त्साँगमो) किंवा चांगु हे हिमानीय सरोवर आहे. हे सरोवर नथुला खिंडीजवळ असून गंगटोक-नथू ला हा महामार्ग येथून जातो. गुरुडोंगमर हे निळ्या पाण्याचे सरोवर हिमाच्छादित शिखरांनी आणि हिमनद्यांनी वेढलेले असते. हिवाळ्यात ते गोठलेले असते, तर उन्हाळ्यात तिस्ता नदीला मिळणाऱ्या प्रवाहांपैकी एक प्रवाह या सरोवरातून गेलेला आहे. बौद्ध आणि शिख लोकांचे हे पवित्र स्थळ आहे. खेचीओपाल्री सरोवराला हिंदू व बौद्ध धर्मीय पवित्र मानतात. अरुणाचल प्रदेशातील हिमालयाच्या भागात सेला खिंडीजवळ सेला सरोवर असून गोम्बू लात्सो (ग्याकर सिन्यी) किंवा गंगा हे दुसरे महत्त्वाचे सरोवर आहे.
हिमालय पर्वतराजीत स्थित असलेल्या नेपाळमध्ये तिलिचो त्सो, रारा, फेवा, गोसाइकुंड, गोक्यो, फोक्सुंदो, पोखरी, बडीमालिका, विरेंद्र इत्यादी सरोवरे आहेत. त्यांपैकी मानांग
जिल्ह्यातील अन्नपूर्णा गिरिपिंडात असणारे तिलिचो त्सो (४,९१९ मी.) हे जगातील सर्वाधिक उंचीवरील सरोवरांपैकी एक आहे. रारा हे देशातील सर्वांत मोठे व खोल सरोवर असून याच्या परिसरात रारा राष्ट्रीय उद्यान आहे. येथील १,५८३ हेक्टर क्षेत्र रामसर परिसर म्हणून घोषित केले आहे (२००७). मौंट एव्हरेस्ट शिखराच्या परिसरात सस.पासून ४,७०० ते ५,००० मी. उंचीच्या प्रदेशात गोक्यो ही निळसर पाण्याची सरोवर मालिका आहे.
हिमालय पर्वतराजीत स्थान असलेल्या भूतान या देशात पर्वतांतर्गत तसेच हिमोढांच्या अडथळ्यांमुळे आणि हिमानीय क्रीयेतून निर्माण झालेल्या प्रमुख सरोवरांची संख्या सुमारे पन्नासपेक्षा अधिक आहे. फक्त चार सरोवरे २,००० मी.पेक्षा कमी उंचीवर असून बाकीची त्यापेक्षा अधिक उंचीवर आहेत. तापमान वाढीमुळे हिमनद्या मागेमागे सरकत असून नव्याने काही सरोवरांची निर्मिती होत आहे. काही सरोवरांचा आकार वाढत आहे. येथील हिमानीय सरोवरांना येणारे पूर अनेकदा आपत्तीकारक ठरतात. थॉरथॉर्मी, लुग्ये, चुब्दा, राफस्ट्रेंग, जिमिलांग, डंगत्शो, तरिना, सिम्कोत्रा, जान्ये त्सो ही भूतानमधील प्रमुख सरोवरे आहेत.
हिमालयाच्या मुख्य पर्वतश्रेणीच्या पलीकडे उत्तर भागात तिबेटच्या पठारावर मान सरोवर, राक्षसताल, यामड्रॉक त्सो ही प्रसिद्ध सरोवरे आहेत. त्यांपैकी हिमालयाच्या कैलास पर्वताजवळ सस.पासून ४,५९० मी. उंचीवर असणारे जगप्रसिद्ध मानसरोवर हिंदू व बौद्ध धर्मीयांचे पवित्र स्थान आहे. मानसरोवराच्या पश्चिमेस १० किमी.वर राक्षसताल सरोवर आहे. ही दोन्ही सरोवरे एका जलमार्गाने एकमेकींना जोडलेली आहेत; परंतु त्यांच्या पाण्याचे गुणधर्म वेगवेगळे आहेत. मानसरोवराचे पाणी स्वच्छ व गोड, तर राक्षसताल सरोवराचे पाणी कडवट व तुरट आहे.
समीक्षक : माधव चौंडे