हिमालय पर्वतातील उंच भाग सतत बर्फाच्छादित असतात. हिमालय हा संस्कृत शब्द असून हिम म्हणजे बर्फ आणि आलय म्हणजे वास्तव्य किंवा घर. यावरून बर्फाचे वास्तव्य किंवा घर असलेला प्रदेश म्हणजे हिमालय अशी व्युत्पत्ती केली जाते. पूर्वीचे भूगोलज्ञ या श्रेणीचा इमाउस किंवा हिमाउस व हेमोदास असा उल्लेख करीत असत. यांपैकी इमाउस किंवा हिमाउस हे नाव गंगेच्या उगमाच्या पश्चिमेकडील म्हणजे हिमालयाच्या पश्चिमेकडील भागास, तर हेमोदास हे पूर्वेकडील भागासाठी वापरलेले असावे. संस्कृत हिमवत किंवा प्राकृत हेमोटा म्हणजे बर्फाळ, यावरून हेमोटस हा शब्द वापरलेला असावा.

संस्कृत ग्रंथांत या पर्वताला हिमवत, हिमवान, हिमाचल, हिमाद्री, हैमवत अशी नावे आहेत. ऋग्वेद, अथर्ववेद, यजुर्वेद, ऐतरेय ब्राह्मण  या ग्रंथात त्याचा उल्लेख हिमवत व हिमवंत असा केलेला आहे. महाभारतात नेपाळच्या पश्चिमेकडील प्रदेशाला हिमवत प्रदेश असे नाव दिले असून त्यातून गंगा, यमुना व सतलज या नद्या वाहतात, असे म्हटले आहे. अर्जुन व बलरामाची यात्रा, भीम व दुर्योधन यांचे गदायुद्ध, पांडवांचे निर्वाण या घटना हिमालयातच घडल्याचे मानले जाते. गीतेत श्रीकृष्णाने स्वतःला ‘स्थावराणां हिमालयः’ असे म्हटले आहे. पुराणांत हिमालय हा वर्षपर्वत किंवा मर्यादापर्वत असल्याचे सांगितले आहे. मार्कंडेय व कूर्म पुराणांत हिमालयाचे वर्णन आहे. कालिका पुराणात त्याला पर्वतांचा राजा म्हटले असून मत्स्य पुराणात हिमालयातील फल-पुष्प संपदेचे वर्णन आहे. महाकवी कालिदास यांना हिमालयाने विशेष मोहिनी घातली होती. त्यांच्या काव्यात हिमालयातील अनेक स्थळांचा निर्देश आढळतो.

वसिष्ठ, वाल्मीकी, कण्व, व्यास इत्यादी अनेक तपस्वी ऋषींचे आश्रम हिमालयात होते. पुराण काळातील ऋषींप्रमाणेच आधुनिक काळातील स्वामी रामतीर्थ व स्वामी विवेकानंद यांनाही तपश्चर्येसाठी हिमालयाचा परिसर योग्य वाटला; कारण या पवित्र भूमीवरील वातावरणाचा मनावर मंगलमय प्रभाव पडतो. ते वातावरण मनःशांतीसाठी अनुकूल ठरते. म्हणूनच आजही अनेक साधुसंत, बैरागी परमेश्वराच्या प्राप्तीसाठी किंवा आत्मसाक्षात्कारासाठी हिमालयात जाऊन तप करीत असतात. धर्म, संस्कृती, देवता, साहित्य, कला इत्यादी जीवनाच्या सर्व अंगांवर हिमालयाचा प्रभाव गेली हजारो वर्षे पडलेला आहे. तो केवळ दगडमातीचा डोंगर नसून हिंदूंचे ते पूज्य देवालयच आहे. महाभारतात द्विगर्त, त्रिगर्त, मद्र इत्यादी पर्वतीय राज्यांचा निर्देश आढळतो. कामरूप, नेपाळ, काश्मीर या प्रदेशांतही हिंदू राज्ये त्या काळी होती व ती समृद्ध आणि सुस्थित होती. शबर यांनी हिमालयात अनेक गिरिदुर्ग उभारले होते. ते हिमालयातील पहिले वसाहतकार असावेत, असे मानले जाते.

समीक्षक : माधव चौंडे